Wednesday 14 March 2018

उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला झटका

लोकसभा पोटनिवडणुकीत अतिआत्मविश्वासामुळे भाजपचा पराभव


* उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणूक: फुलपूरमधून सपा उमेदवार नागेंद्र प्रतापसिंह पटेल ५९ हजार ६१३ मतांनी विजयी 
* लोकसभा पोटनिवडणुकीत अतिआत्मविश्वासामुळे आमचा पराभवः योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशच्या लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मान्य केला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. आम्ही उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला कौल मान्य करतो. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. नागरिकांच्या इच्छेनुसार विजयी उमेदवार राज्याच्या विकासामध्ये योगदान देतील अशी अपेक्षा आहे असे योगी म्हणाले. हा निकाल आमच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आहे. कुठे कमी पडलो त्याचा आढावा घेऊ. बसपा आणि समाजवादी पार्टीचे एकत्र येणे ही राजकीय सौदेबाजी असून देशाच्या विकासाला बाधित करण्यासाठी ही सौदेबाजी झाली आहे. या आघाडीचा सामना करण्यासाठी आम्ही आमची रणनिती बनवू असे योगी म्हणाले. राजकीय सौदेबाजी, स्थानिक मुद्दे आणि अति आत्मविश्वास यामुळे आमचा पराभव झाला असे योगी म्हणाले. गोरखपूरमध्ये झालेला पराभव हा योगी आदित्यनाथांसाठी मोठा धक्का आहे.गोरखपूर हा योगींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. योगी राज्याचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते गोरखपूरमधून खासदार होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि योगी आदित्यनाथ विधानसभेत आल्यामुळे या दोन जागांवर पोटनिवडणूक झाली. फुलपूरमध्ये समाजवादी पार्टीचा उमेदवार ५९ हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आले.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर फूलपूर मतदारसंघात निवडणूक होत आहे. इथेही भाजपवर मोठ्या फरकाने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. या मतदारसंघात भाजपचे कौशलेंद्र पटेल आणि सपाचे नागेंद्र पटेल यांच्यात सामना रंगला आहे.बसपाने गोरखपूर आणि फूलपूर या दोन्ही जागांवर आपले उमेदवार दिलेले नाहीत. बसपाने सपाच्या उमेदवारांना समर्थन दिलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कामाची पोचपावती समजल्या जाणाऱ्या ह्या पोटनिवडणुकीतील झटक्यामुळे भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा हा मोठा पराभव असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे, 2014मध्ये दोन्ही जागांवर सपा आणि बसपाला जेवढी मतं मिळाली होती, त्यापेक्षा भाजपला जास्त मतं होती. ते अंतर संपवून पुन्हा मोठा विजय मिळवणं, म्हणजे सपा-बसपाच्या भविष्यातील आघाडीच्या शक्यतेला आणखी मजबुती मिळते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने सपा आणि बसपासोबत युती केली नव्हती. त्यामुळे जर 2019 मध्ये काँग्रेसही महायुतीमध्ये सहभागी झाली तर भाजपला कडवी टक्कर देण्याच्या स्थितीत विरोधक असतील.योगी आदित्यनाथ यांची उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तर केशवप्रसाद मौर्य यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर दोघांनीही खासदारकीचा राजीनामा दिला होता. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तर केशवप्रसाद मौर्य हे फुलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. या दोन्ही जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. फुलपूरमध्ये ३८ टक्के तर गोरखपूरमध्ये ४७ टक्के मतदान झाले होते. गोरखपूरमधून भाजपाकडून उपेंद्र दत्त शुक्ला, काँग्रेसकडून सुरीता करिम, समाजवादीकडून प्रवीण निशाद रिंगणात होते. तर फुलपूरमधून भाजपाकडून कौशलेंद्र सिंह पटेल, समाजवादी पक्षाकडून नागेंद्र प्रतापसिंह पटेल तर काँग्रेसकडून मनीष मिश्रा रिंगणात आहेत.पोटनिवडणुकीत बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाला पाठिंबा जाहीर करत नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. बिहारमधील अरारिया या लोकसभा मतदारसंघातील तसेच बभुआ आणि जेहनाबाद या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक पार पडली. या दोन्ही जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. नितीशकुमार यांनी भाजपाशी युती केल्यानंतरची ही निवडणूक आहे.

बिहारमध्ये एक लोकसभा व दोन विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आररिया लोकसभा मतदारसंघातून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) उमेदवार सर्फराज आलम यांनी 61 हजार 788 मतांनी विजय मिळवला आहे. आरजेडीचे सर्फराज आलम यांना 5 लाख 9 हजार 334 मते मिळाली. तर भाजपचे प्रदीप सिंह यांना 4 लाख 47 हजार 546 मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार प्रदीप सिंह यांच्यावर आलम यांनी दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार तस्लीमुद्दीन यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

गोरखपूर, महंतांना निवडून देणारा मतदारसंघ

खासदारांमध्ये गोरखपूरच्या मठाच्या महंतांची संख्या जास्त आहे.पूर्व उत्तरप्रदेशातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गोरखपूर मतदारसंघ ओळखला जातो. 1952 पासून आजवरच्या येथील खासदारांमध्ये गोरखपूरच्या मठाच्या महंतांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक काळ या मठातील महंतांना या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. 1952 साली पहिल्या लोकसभेसाठी सिंहासन सिंग येथून निवडून गेले. त्यानंतर 1957, 1962 असे पुन्हा दोन वेळेस ते लोकसभेत याच मतदारसंघातून गेले.1967 साली दिग्विजयनाथ गोरखपूर मठाचे महंत अपक्ष म्हणून लोकसभेत गेले तर 1970 साली महंत अवदेयनाथ अपक्ष म्हणून येथे विजयी झाले. 1971 साली नरसिंग नारायण पांडे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेले. आणीबाणी संपेपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. त्यानंतर 1977 साली जनता लाटेमध्ये भारतीय़ लोकदलाचे हृषिकेश बहादूर विजयी झाले. 1980 साली हृषिकेश बहादूर काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेले. आठव्या लोकसभेसाठी काँग्रेसने गोरखपूरमधून मदन पांडे यांना संघधी दिली आणि ते विजयी झाले. 1989 साली महंत अवदेयनाथ हिंदू महासभेच्या तिकिटावर लोकसभेत गेले. तर 1991 आणि 1996 असे दोनवेळेस ते भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले. त्यानंतर वयाच्या केवळ २६ व्या वर्षी योगी आदित्यनाथ यांना खासदार होण्याची संधी मिळाली आणि सलग पाच वेळा खासदार होत त्यांनी 2014 सालच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी हा गड सोडला नाही. 2017 साली त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद सोडेपर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापुर्वी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या ओळखीबद्दल लोकसभेतील आपल्या भाषणात एक मजेशीर आठवण सांगितली. गोरखपूर हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अत्यंत वाईट समजले जायचे. 26 वर्षाचे आदित्यनाथ जेव्हा पहिल्यांदा निवडून गेले तेव्हा ते एका कामासाठी तत्कालीन रसायन आणि उर्वरक मंत्रालयाचे मंत्री सुरजितसिंग बर्नाला यांना भेटायला गेले. बर्नाला यांना हा तरुण महंत गोरखपूरचा खासदार असेल यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी तीनवेळा तुम्ही खरंच गोरखपूरचे खासदार आहात का असे त्यांना विचारुन खात्री करुन घेतली. तुम्ही अशी खात्री का करुन घेत आहात असे आदित्यनाथांनी विचारल्यावर बर्नाला यांनी एक जुनी आठवण सांगितली. मी एकदा सभेसाठी गोरखपूरला गेलो तेव्हा चारही बाजूंनी दगडफेक, बॉम्बफेक सुरु झाली, तेव्हापासून मी गोरखपूरला कधीच गेलो नाही असं त्यांनी आदित्यनाथांना सांगितलं. ही कायदा आणि सुव्यवस्थेची खराब परिस्थिती आपण सुधारली असा दावा आदित्यनाथ करतात. मात्र आता होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये त्याचे कोणतेही प्रतिबिंब दिसत नाही.

फुलपूर: पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांना लोकसभेत पाठवणारा मतदारसंघ

उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. भारताला पहिले पंतप्रधान देणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. आज केशवप्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. अनेक फुलपूरची ओळख अनेक पोटनिवडणुकांना सामोरे जाणार मतदारसंघ अशीही आहे.1952 साली पहिल्या लोकसभेत पं. जवाहरलाल नेहरु यांनी याच मतदारसंघातून प्रवेश केला होता. त्यानंतर 1957 आणि 1962 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही पं. नेहरु याच मतदारसंघातून विजयी झाले होते. १९६४ साली पं. जवाहरलाल नेहरु यांचे निधन झालेल्या पोटनिवडणुकीत विजयालक्ष्मी पंडित विजयी झाल्या. त्यानंतर 1967 साली त्या पुन्ही विजयी झाल्या. 1969 साली पुन्हा पोटनिवडणुकीत संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर जनेश्वर मिश्रा विजयी झाले.1971 साली व्ही. पी. सिंग काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेले. प्रथमच लोकसभेत जाणाऱ्या व्ही. पी. सिंग यांना वाणिज्य मंत्रालयाचे उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1976 साली त्यांच्याकडे मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आली. 1980 साली ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तर 1989-90 या एका वर्षाच्या काळासाठी ते भारताचे पंतप्रधान होते. 1977 साली भारतीय लोकदलाच्या तिकिटावर कमला बहुगुणा यांना फुलपूरच्या खासदार झाल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या त्या पत्नी होत्या. 1980 साली झालेल्या निवडणुकीमध्ये जनता दलाचे बी. डी. सिंग यांनी विजय मिळवला. त्यानंतर 1996 आणि 1998 असे सलग दोनदा समाजवादी पार्टीचे जंग बहादूर पटेल विजयी झाले. त्यानंतर 1999 साली समाजवादी पक्षाचे धर्मराज पटेल आणि 2004 साली अतिक अहमद यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्तव करण्याची संधी मिळाली. 2009 साली येथून कपिलमुनी करवारिया हे बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत गेले आणि 2014 साली पहिल्यांदाच भाजपाला केशव प्रसाद मौर्य यांच्या निमित्ताने ही जागा आपल्याकडे घेता आली. उत्तर प्रदेशातील बहुतांश सगळ्या महत्त्वाच्या पक्षांना या मतदारसंघाने आजवर एकदा तरी संधी दिली आहे. पंतप्रधान, पंतप्रधानांची बहिण, भावी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची पत्नी, भावी उपमुख्यमंत्री यांना लोकसभेत पाठवणारा हा एकमेवाद्वितीय मतदारसंघ असावा.


खा. विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट कापले

उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर संबंधित आंदोलनात महत्त्वाची भूमिका असलेले खासदार विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट कापण्यात आले आहे. कटियार हे भाजपचे पाच वेळा खासदार राहिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागा आहेत, पण भाजपने कटियार यांना उमेदवारी दिली नाही. 1984 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजप केवळ दोन लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित होती, 1989 मध्ये भाजपला 85 जागांवर पोहोचवण्याच्या यशात त्यांचेही मोलाचे योगदान आहे. कटियारांना वगळून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ सहकाऱ्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. राम मंदिर निर्माणासाठी अडवाणी यांना पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींवर दबाव आणण्यात आला या निर्णयामुळे त्यांचे तिकीट कापले गेले अशी चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये चालू असल्याचे कळते.2006 पासून कटियार हे राज्यसभा सदस्य आहेत. येत्या 2 एप्रिलला त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपेल. उत्तर प्रदेशमधील फैजाबादमधून ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. पण तिकीट कापल्यामुळे इतक्या वर्षांनी प्रथमच ते संसदेत जाऊ शकणार नाहीत. काही वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे.अरूण जेटली, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, कांता कर्दम, अनिल जैन, जीव्हीएल नरसिम्हा राव, हरनाथसिंह यादव, अशोक वाजपेयी या नेत्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. जेटली आणि राव हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. तर अशोक वाजपेयी हे समाजवादी पक्ष सोडून भाजपात आले आहेत. इतर पाच नेते हे उत्तर प्रदेशमधील स्थानिक नेते आहेत. त्यामुळे हे सर्व नेते हे कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत.कटियार हे 1970 मध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जोडले गेले. 1984 मध्ये त्यांनी बजरंग दलाची स्थापना केली. कटियार हे उत्तर प्रदेशमधील ओबीसी समाजातील चेहरा आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.