Friday 9 March 2018

रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक ते मंत्री-पतंगराव कदम यांचा झंझावती प्रवास; डॉ.पतंगराव कदम यांनी लढविलेल्या निवडणुका व सविस्तर निकाल

रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक ते मंत्री-पतंगराव कदम यांचा झंझावती प्रवास


                       डॉ.पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

१९८० च्या सुमारास त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत ते अवघ्या ८६ मतांनी पराभूत झाले. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भरभक्कम होती, तेव्हा अपक्ष निवडणूक लढविण्याचे धाडसच होते. १९८५ मध्ये पुन्हा लढत दिली आणि ते प्रथम आमदार झाले. १९९५ च्या निवडणुकीत ७२६५ मतांनी दुसऱ्यांदा पराभूत झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा निवडून आले. 

असा होता राजकीय प्रवास 


  • जून 1991 -मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री
  • मे 1992 - 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)
  • ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
  • नोव्हेंबर 2004 पासून पुढे - पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री
  • प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
  • डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण
  • मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते
  • नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग
  • 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन 






सांगली जिल्ह्यातील एका लहान शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयात महिना ७० रुपये पगाराची नोकरी करायला सुरुवात केली आणि त्यांच्यातला राजकारणी आकार घेत गेला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी पतंगराव कदम यांनी पावले उचलली आणि वाटेत येणाऱ्या अनेक अडचणींवर ते मात करत गेले. रयत शिक्षण संस्थेत महिना ७० रुपये पगाराची नोकरी करून आयुष्य सुरु करणारे पतंगराव कदम सध्याच्या घडीला १८४ संस्थांचे संचालक होते. १९६८ मध्ये त्यांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात झाली. यशवंत राव मोरे आणि शंकरराव मोरे या दोघांनाही पतंगराव कदम गुरुस्थानी मानत. त्याआधी १९६४ मध्ये पुण्यातील कसबा पेठ भागात असलेल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. या खोलीत एक जुने टेबल, एक खुर्ची आणि जुने कपाट इतकेच सामान होते. पुण्यातील अनेक वृत्तपत्रांनी एका बोळामध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ बोळातच विसर्जित होणार अशी टीकाही त्यावेळी केली. मात्र पतंगराव कदम यांनी ध्यास सोडला नाही. त्याचाच परिणाम म्हणून या विद्यापीठाने सुवर्ण महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठला. तसेच १९९६ पासून या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जाही प्राप्त झाला. या विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. तर सेवकांची संख्या हजारांच्या घरात आहे. या विद्यापीठामुळे अनेकांना शिक्षण तर मिळालेच पण अनेकांच्या रोजगाराचाही प्रश्न सुटला.काहीतरी वेगळे करण्याची उर्मी बाळगलेले पतंगराव कदम यांनी गावात चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यावर कुंडल या ठिकाणी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात आल्यावर द्विपदवीधर झाले. शिक्षकही झाले. त्यांच्या नावापुढे डॉक्टरेटही लागली. शिक्षणाचा प्रसार सुरु होताच त्याच वेळी १९८० च्या सुमारास त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काँग्रेस पक्षात जायचे हा त्यांचा विचार त्यावेळी पक्का झाला होता. मात्र या निवडणुकीत ते पराभूत झाले. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भरभक्कम होती, तेव्हा अपक्ष निवडणूक लढविण्याचे धाडसच आहे. पराभव झाला म्हणून खचून जाणारे ते पतंगराव कदम नव्हते. १९८५ मध्ये पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा निवडून आले. राजकारणात यशामागून यश मिळत असताना गावातली कामे करणे त्यांनी कधी सोडले नाही. १९९९ मध्ये उद्योग आणि जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. १९९९ ते २००३ या काळात विलासराव देशमुख आणि २००३-०४ या कालावधीत सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. मात्र त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठीही पतंगराव कदम यांच्या नावाची चर्चा झाली होती. सहा वेळा आमदार म्हणून ते निवडून आले आणि १८ वर्षे ते मंत्री होते. वन खाते, उद्योग, मदत आणि पुनर्वसन अशी खाती त्यांनी सांभाळली. विद्यार्थी दशेपासून सुरु झालेल्या एका झंझावताची अखेर झाली आहे. पलूस-कडेगाव या मतदारसंघातून पतंगराव कदम १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा सहा वेळा निवडणुकांमध्ये जिंकले. या मतदारसंघाचे आमदार म्हणून २९ वर्षे त्यांची कारकीर्द होती. १९९९ च्या निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष शरद पवारांनी स्थापन केला. त्यावेळी काँग्रेसमधले काही नेते शरद पवारांच्या पक्षात गेले. मात्र पतंगराव कदम यांनी काही काँग्रेस पक्ष सोडला नाही.  सांगलीतील वांगी-भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत.   डॉ. पतंगराव कदम राजकीय वर्तुळात दिलदार, पण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीला शक्य ती मदत करण्यास ते अजिबात मागेपुढे पाहत नसत. मात्र, रोखठोकपणामुळे काही वेळा अडचणीतही येत. गेल्या ५३ वर्षांत संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा-कॉलेजेस असून, त्यात तब्बल दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. त्यामध्ये दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी कॉलेजांची स्थापना केली आहे. त्यांच्या या योगदानाची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. लोकश्री, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल मानवता सेवा अवॉर्ड, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल मराठा विश्वभूषण पुरस्कार, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे एक्सलन्स अॅवॉर्ड इन एज्युकेशन, कोल्हापुरातील उद्योगभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. शिक्षणासह सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. भारती सहकारी बँक, सोनहिरा सरकारी साखर काररखाना, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी, सोनहिरा कुक्कुटपालन संघ, कृष्णा-येरळा सूतगिरणी यांसह पुणे, सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे. भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे. एका लहान खेड्यात जन्म घेऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. पतंगराव कदम हे मूर्तिमंत उत्साही व्यक्तिमत्व होते. खेड्यातील मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये गणित व इंग्रजी शिकवावे, या उद्देशाने त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. पक्ष-विचार यांचा कोणताही भेद न करता सर्व क्षेत्रांतील गोरगरीब आणि विद्यार्थ्यांना त्यांनी आयुष्यभर भरभरून मदत केली. त्यांच्या या स्वभावामुळेच सर्वच पक्षांत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य मोठे आहे. एका छोट्या संस्थेपासून अभिमत विद्यापीठापर्यंतची वाटचाल त्यांनी भारती विद्यापीठाच्या मार्फत करून दाखविली. शिक्षण क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या  डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली.



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.