Sunday, 29 January 2023

कसबा विधानसभा पोटनिवडणूक-2023; खासदार गिरीश बापट यांच्या भूमिकेवरच भाजपचे यश अवलंबून!

भाजप अंतर्गत उमेदवारीवरून धुसफूस; टिळकांना विरोध



पुणे-
कसबा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजप अंतर्गत उमेदवारीवरून धुसफूस असून टिळकांच्या पक्षीय राजकारणातील असक्रीय सहभाग आणि आगामी राजकारणाशी निगडीत संभाव्य स्थितीमुळे त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असून खासदार गिरीश बापट यांच्या भूमिकेवरच भाजपचे यश अवलंबून असल्याचा ठाम विश्वास त्यांचे समर्थक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेवरून थेट चुरशीची निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. खासदार गिरीश बापट याच्या मार्गदर्शनाखाली कसबा पेठ निवडणूक होईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती मात्र कृतीतून दिसून येत नाही असे समर्थकांचे मत आहे. दरम्यान 
कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवली जाणार असून इच्छुकांपैकी माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यास चुरशीची लढत निर्माण होईल असा अंदाज कार्यकर्त्यांकडून वर्तविला जात आहे. भाजपप्रमाणे कॉंग्रेस मध्येही पक्षांतर्गत उमेदवारीवरून वाद-विवाद असून काँग्रेसमध्ये प्रमुख ५ नावांची चर्चा आहे. त्यामध्ये अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, कमल व्यवहारे, संगिता तिवारी, बाळासाहेब दाबेकर यांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये अरविंद शिंदे यांना शहरातील वरिष्ट पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तर अन्य उमेदवार आर्थिक व सक्रीय लोकप्रियतेच्या निकषात बसत नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसने निवडणूक लढविल्यास रविंद्र धंगेकर यांच्या नावाचा विचार करावा लागेल असा तर्क काढून भाजपमधील इच्छुकांनी आपण कशी लढत देऊन यश संपादन करू शकतो हे सर्व मार्गांनी पटवून देण्याचे काम केले जात आहे. वरिष्ठांकडून तथाकथित सर्वेक्षणाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्याचा देखील आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली त्यादिवशीच खासदार गिरीश बापट यांनी रुग्णालयातून थेट पक्ष कार्यालय गाठून आपणच या मतदारसंघाचा निर्णय घेवू शकतो असा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे डावलने भाजपला धोक्याचे ठरू शकते. बापट कसबा कार्यालयात पोहोचल्याची बातमी कार्यकर्त्यांना समजताच बघता बघता कार्यालय परिसरात हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. इच्छुकांपैकी खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांच्या नावाचा शहर पातळीवरील पदाधिकार्यांनी विचार केला नाही तसेच त्यांना विश्वासातही घेतले नसल्याने समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एखाद्या मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते तेव्हा सहानुभूतीमुळे एक वातावरण निर्माण होते मात्र कसबा विधानसभा मतदारसंघ याला अपवाद आहे. त्यामुळे अल्प कालावधीसाठी तरी संधी या निवडणुकीत मिळावी व आगामी काळात तरी आपल्या नावाचा विचार व्हावा यासाठी इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत, परंतु बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आता धूसर आहे. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमधून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक व मुलगा कुणाल टिळक यांच्यासह माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांचेही नाव चर्चेत होते मात्र भाजपने केंद्रीय निवड समितीकडे ५ नावांचा शिफारस प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पुढे येत आहे. यात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील २ नावांची चर्चा आहे. शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच नाव पाठवण्यात आली असून त्याचबरोबर धीरज घाटे, हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांच्या नावाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. येत्या 3 दिवसांत यांच्या पैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कसबा पेठ मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत शिंदे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली होती. त्यापूर्वीच्या दोन निवडणुकांत धंगेकर मनसेतर्फे लढले होते. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत धंगेकर काँग्रेसतर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रभागाचा मोठा भाग या मतदारसंघात समाविष्ट आहे. कॉंग्रेसकडून धंगेकर यांना उमेदवारी दिल्यास माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो मात्र त्यांच्या नावाला भाजप अंतर्गत विरोध असून पालिका निवडणुकीत धंगेकर यांच्याकडून पराभव पत्करला तर विधानसभा निवडणुकीत वेगळे काय होणार असा प्रतिप्रश्न निर्माण करून पक्षांतर्गत अन्य इच्छुकांकडून नकारात्मक चर्चेचे अभियान राबविले जात आहे. तसेच त्यांचा पालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लावून पुन्हा महापालिकेत प्रवेश दिला. त्यानंतर सभागृह नेते पदाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. नुकतीच त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत त्यांना भरपूर संधी दिली मिळाली असल्याचेही प्रतिस्पर्धी उमेदवारांचे म्हणणे आहे. हेमंत रासने यांनाही पक्षाकडून अनेकदा संधी मिळाली आहे. त्यांनी सलग चारवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. कसबा मतदार संघात त्यांचा संपर्क चांगला आहे. माजी सभागृह नेते धीरज घाटे हे आक्रमक व कट्टरवादी असल्याने त्यांना अन्य समाजघटकांकडून विरोध आहे. दीड वर्षाच्या काळाचा आमदार होण्यासाठी संभाव्य खर्चाच्या दृष्टीकोनातून आर्थिकदृष्ट्या देखील कूवतेची चाचपणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, विशाल धनवडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रूपाली ठोंबरे-पाटील इच्छुक आहेत. दरम्यान भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांकडून तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. मतदान पूर्वी जाहीर केलेल्या 27 फेब्रुवारीऐवजी 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

कसबा पेठ मतदारसंघ निवडणूक- २०१९ 

2019 मधील विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला होता. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एकूण 290724 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १५००६९ होती. या जागेवरून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुक्ता शैलेश टिळक विजयी होऊन आमदार झाल्या. त्यांना एकूण 75492 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे एकूण ४७२९६ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांचा 28196 मतांनी पराभव झाला होता.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जाहीर : 31 जानेवारी 2023
अर्ज दाखल करण्याची मुदत : 7 फेब्रुवारी 2023
अर्जांची छाननी : 8 फेब्रुवारी
अर्ज मागे घेण्याची मुदत : 10 फेब्रुवारी
मतदान : 26 फेब्रुवारी
निकाल : 2 मार्च

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.