Monday 2 January 2023

Legislative Council Elections : विधानपरिषदेच्या रिक्त 23 पैकी 5 जागांसाठी निवडणुका जाहीर; काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपबरोबर लढत

विधानपरिषद निवडणुकांच्या रिंगणातून शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक बाहेरच


केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात राज्यातील २ पदवीधर आणि ३ शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. नाशिक आणि अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्यामुळे निवडीसाठी जोरदार तयारी सुरु आहे मात्र या निवडणुकीच्या रिंगणातून शिवसेना खुर्द अर्थात (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना बुद्रुक अर्थात (बाळासाहेबांची) हे गट बाहेरच राहणार आहेत. युती व आघाडी केल्याने पक्ष विस्तार करण्याची संधी नसल्याने या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर जाहीर होणाऱ्या 6 जागांसाठी देखील अशीच परिस्थिती राहणर आहे त्यामुळे केवळ बघ्याची भुमिका घेण्याची वेळ शिवसेनेच्या दोन्ही गटांवर आलेली आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या रिक्त 23 पैकी 5 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून यामध्ये नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघ या 2 आणि कोकण, औरंगाबाद व नागपूर शिक्षक मतदारसंघ या 3 अशा एकूण 5 जागांवर मतदान होणार आहे. या 5 मतदारसंघातून निवडणूक आलेले श्री. सुधीर तांबे (काँग्रेस) नाशिक पदवीधर मतदारसंघ, श्री. विक्रम काळे (राष्ट्रवादी) औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ, श्री. बाळाराम पाटील (शेतकरी कामगार पक्ष) कोकण शिक्षक मतदारसंघ, श्री. रणजित पाटील (भाजप) अमरावती पदवीधर मतदारसंघ, श्री. नागो गाणार (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भाजप समर्थित) नागपूर शिक्षक मतदार संघ यांचा समावेश आहे. ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या संदर्भात ५ जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. पदवीधरचे दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही पार पडणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे. काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्नेही मेहुणे आणि युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार होते. त्यांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या मतदारसंघात देखील निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने दोन वर्षांपूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात देखील विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर, अमरावती पदवीधरमध्ये भाजपने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच रणजीत पाटीलला उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपसाठी देखील या मतदारसंघातील विजय महत्त्वाचा असेल. अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार रणजित पाटील यांची उमेदवारी याआधीच भाजपने जाहीर केली आहे. तर नागपूर शिक्षक मतदार संघासाठी अनेक इच्छुक उमेदवार असतानाही सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वर्गमित्र विद्यमान आमदार नागो गाणार यांची उमेदवारी भाजपतर्फे निश्चित मानली जात आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात परंपरागत विरोधक भाजप व काँग्रेसमध्ये सामना आहे. भाजपने सुमारे वर्षभरापासून नियोजन केले असून उमेदवारी देखील जाहीर केली. त्यामुळे विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील तिसऱ्यांदा पदवीधरच्या रिंगणात राहतील. काँग्रेसने पदवीधरच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीवर जोर दिला मात्र, काँग्रेसने अद्याप उमेदवाराच्या नावाचे पत्ते उघडले नाहीत. २०१७ मध्ये भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील पदवीधर मतदारसंघासाठी दंड थोपाटले होते. ऐनवेळी मतदार यादी रद्द करण्यात आल्यानंतर ४५ दिवसांत नव्याने मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्यात आली. काँग्रेसने संजय खोडके यांना उमेदवारी देऊन भाजपला लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने एकतर्फी विजय मिळवला होता. आता सहा वर्षांनंतर पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. त्या दृष्टीने भाजप व काँग्रेसकडून तयारीवर जोर दिला जात आहे. डॉ. रणजीत पाटील तिसऱ्यांदा निवडणुकीला समोरे जातील. पक्षाने तयारीचे आदेश दिल्यामुळे त्यांनी सुमारे वर्षभरापासून भेटीगाठी घेत मतदार नोंदणीसाठी अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत. २०१७ च्या तुलनेत २०२३ मध्ये होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. पदवीधर विचारवंत मतदार म्हणून गणला जातो. पदवीधरमध्ये डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक, शिक्षक आदींसह सर्वच उच्चशिक्षितांचा समावेश आहे. मात्र, गठ्ठा मतदारांमध्ये शिक्षक, प्राध्यापकांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष केंद्रीत केले जाते. डॉ. रणजीत पाटील यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केल्याने त्यांना पक्षाचे संघटनात्मक पाठबळ मिळाले. डॉ. पाटील यांच्यापुढे अंतर्गत कलह व मतभेदाचे मोठे आव्हान असेल. अकोल्यातून त्यांना टोकाचा विरोध आहे. इतर जिल्ह्यातील भाजप नेते व लोकप्रतिनिधींना एकसंध ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागेल. भाजपची शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख आहे. पक्षाचा आदेश हा अंतिम समजला जातो. त्यामुळे निवडणुकीत पक्षांतर्गत विरोध होणार नाही, असा कयास व्यक्त केला जात आहे. संघटनात्मक पातळीवरून तालुका पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसने देखील ही निवडणूक गांभीर्याने घेतली. काँग्रेसकडून अकोल्यातील डॉ. सुधीर ढोणे यांचे नाव अग्रक्रमाने समोर आले. त्यांनी सुमारे वर्षभरापासून भेटीगाठी व मतदार नोंदणी सुरू केली, तर अमरावती जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख आदी काही मातब्बर नेत्यांची नावे देखील काँग्रेसकडून चर्चेत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊन पदवीधर निवडणुकीचा आढावा घेतला. २०१७ मध्ये आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला होता. आता मविआ मध्ये देखील हा मतदारसंघ आपल्याकडेच असल्याचे गृहीत धरून काँग्रेसने तयारी सुरू केली. नाना पटोलेंनी इच्छुकांना तयारीच्या सूचना केल्या. पदवीधर मतदारसंघाचे पाच जिल्ह्यांचे मोठे भौगोलिक क्षेत्र आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण 78 जागा 5 मतदारसंघ गटातून निर्वाचित होतात. यामध्ये विधासभा सदस्यांद्वारा निर्वाचित 30 जागा, स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारा निर्वाचित 22 जागा, पदवीधरांद्वारा निर्वाचित 7 जागा, शिक्षकांद्वारा निर्वाचित 7 जागा आणि राज्यपाल नामनियुक्त 12 जागा अशाप्रकारे निर्वाचन केले जाते. सन 2023 या वर्षात 11 विधानपरिषद सदस्य पदासाठी निवडणुका होणार आहेत त्यापैकी रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच निवडणूक जाहीर केली असून ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारा निर्वाचित 22 पैकी 6 जागा 5 डिसेंबर 2022 रोजी रिक्त होऊनही निवडणुका होऊ शकणार नाहीत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच या निवडणुकांना मुहूर्त लागणार आहे. स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारा निर्वाचित रिक्त झालेल्या जागांमध्ये कॉंग्रेसच्या 2, भाजपच्या 2 तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 1 जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये श्री. अनिल भोसले (राष्ट्रवादी) पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था, श्री.दुष्यंत सतीश चतुर्वेदी (शिवसेना) यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था, श्री.मोहन श्रीपती कदम (कॉंग्रेस) सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी संस्था, श्री. अमरनाथ अनंतराव राजूरकर (कॉंग्रेस) नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था, श्री. चंदूभाई विश्रामभाई पटेल (भाजप) जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था, डॉ परिणय रमेश फुके (भाजप) भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था यांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी मतदार म्हणून नोंदणीसाठी मतदाराची पदवी प्राप्त होऊन तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तर शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार म्हणून नोंदणीसाठी मतदाराने मागील सहा वर्षांत किमान तीन वर्षे माध्यमिक संस्थेत शिकवलेले असावे अशी मतदारांसाठी नोंदणीची अट असते. दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण 78 जागांमध्ये राष्ट्रवादी- 9, कॉंग्रेस- 7 , शिवसेना- 11, भाजप- 21, अपक्ष- 5 तसेच जनता दल, शेकाप, रासप प्रत्येकी 1 जागा असे पक्षीय बलाबल आहे. अन्य रिक्त जागांपैकी 5 जागांवर निवडणूक जाहीर झालेली असून राज्यपाल नियुक्त 12 आणि स्थानिक प्राधिकृत संघातील 6 जागा रिक्त आहेत.  

निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे -
निवडणुकीची अधिसूचना - ५ जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - १२ जानेवारीपर्यंत 
अर्ज माघारी घेण्याची मुदत - १६ जानेवारीपर्यंत 
मतदान - ३० जानेवारी
मतमोजणी - २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.