Friday 6 January 2023

पुणे जिल्ह्यात 79 लाख 51 हजार 420 मतदार

विधानसभा मतदारसंघांची यादी जाहीर, 74 हजार 470 मतदार वाढले


पुणे- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत एक जानेवारी 2023 या दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 79 लाख 51 हजार 420 मतदार इतकी एकूण मतदारसंख्या असून यादीत 74 हजार 470 मतदारसंख्येची भर पडली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासन मार्फत शुक्रवारी देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2022 पासून राबवण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 74 हजार 470 इतक्या मतदारांची वाढ झालेली असून त्यात पुरुष मतदार संख्या 35 हजार 598 इतकी, महिला मतदार संख्या 38 हजार 721 इतकी व तृतीयपंथी मतदार संख्या 151 ने वाढलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदार संघात एकूण 79 लाख 51 हजार 420 इतके मतदार समाविष्ट आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 41 लाख 66 हजार 265, महिला मतदारांची संख्या 37 लाख 84 हजार 660 व तृतीय पंथी मतददारांची संख्या 495 इतकी आहे. अंतिम मतदार यादी पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन दिलेली असल्याने नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. तसेच https://www.nvsp.in व https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने छायाचित्र नसलेली मतदार यादी उपलब्ध असून मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव अंतिम मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. मतदार यादीत अद्यापही नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी https://www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावे किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म नं. 6 भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले आहे.

मतदारसंघनिहाय मतदार- जुन्नर-3,08,202, आंबेगाव -2,98,022, खेड-आळंदी-3,36,320, शिरूर -4,12,896, दौंड-3,04,545, इंदापूर-316305, बारामती-357993, पुरंदर-409709, भोर-393142, मावळ-359962, चिंचवड-566415, पिंपरी- 357207, भोसरी-5,13,761, वडगाव शेरी-433022, शिवाजीनगर-2,74,103, कोथरूड-3,91,520, खडकवासला-5,08,172, पर्वती-3,30,819, हडपसर-5,36,397, पुणे कॅन्टोमेंट 2,67,480 आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 2,75,428 मतदार आहेत.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.