Wednesday 18 January 2023

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर; मतदान २७ फेब्रुवारीला मतदान

ऐन बारावी परीक्षेच्या कालावधीत मतदान


पुण्यामधील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. याबरोबरच त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निवडणुकींच्या घोषणा देखील केली. महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी आहे. कसबा पेठ मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर दोन्ही मतदरासंघांमधील जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांवर आता पोटनिवडणुका पार पडणार आहेत. कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघांमधील पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचा घाट भाजपने घातला आहे मात्र अन्य राजकीय पक्ष काय भुमिका घेतात यावर अवलंबून असेल. दरम्यान ऐन बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत निवडणूक होणार असल्याने स्थानिक पातळीवर प्रशासकीय व्यवस्थेवर ताण आणि मतदारांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे यामध्ये 27 फेब्रुवारीला भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाची लेखी परीक्षा होणार आहे. कसबा मतदारसंघात बहुतांश महाविद्यालये असून ऐन परीक्षेच्या कालावधीत मतदान झाल्यास नियोजन करण्यास प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.  पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. मुक्ता टिळक बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ५९ वर्षीय जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये सत्ताधारी भाजपाच्या दोन आमदारांचे निधन झाल्याने सर्व पक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणुकांबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु होती. आज निवडणूक आयोगाने यासंदर्भातील घोषणा केल्याने येथील निवडणुकांमध्येही कोणाला उमेदवारी मिळते की निवडणुकी बिनविरोध होतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी कसबा पेठ मतदारसंघातून पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुखांनी रुपाली यांच्या विधानावर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया देताना निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भातील विधान केले होते. त्यामुळे आता या दोन्ही मतदारसंघांमध्ये सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाकडून कोणते उमेदवार दिले जातात, महाविकास आघाडीकडून या निवडणुकीमध्ये उमेदवार दिले जातात की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. कसब्यात रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारीसाठी भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
दरम्यान देगलूर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि पंढरपूर कवठेमहाकांळचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. भाजपने आपले उमेदवार देत या निवडणुकीत चुरस निर्माण केली. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी ही बाब लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे मात्र अंधेरीतील पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी विनंती शरद पवार यांनी भाजपला केली. यावेळी आपला उमेदवार निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे भाजपने मुरजी पटेल यांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास लावली. पवारांची विनंती आपण मान्य केल्याचे दाखवून दिले होते. दरम्यान स्व. लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तर जागेसाठी 12 एप्रिल रोजी यासाठी मतदान झाले होते. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला होता. 

कसबा पेठ मतदारसंघ निवडणूक- २०१९ 

2019 मधील विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला होता. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एकूण 290724 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १५००६९ होती. या जागेवरून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुक्ता शैलेश टिळक विजयी होऊन आमदार झाल्या. त्यांना एकूण 75492 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे एकूण ४७२९६ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांचा 28196 मतांनी पराभव झाला होता.

पिंपरी चिंचवड मतदारसंघ निवडणूक- २०१९ 

पिंपरी चिंचवड मतदारसंघात 2019 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी हॅट्रिक करत विजय संपादन केला होता. मात्र अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण 518480 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या २७८२३१ होती. या जागेवरून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगताप लक्ष्मण पांडुरंग विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण 150723 मते मिळाली. अपक्ष उमेदवार कलाटे राहुल तानाजी एकूण 112225 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा 38498 मतांनी पराभव झाला होता.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जाहीर : 31 जानेवारी 2023
अर्ज दाखल करण्याची मुदत : 7 फेब्रुवारी 2023
अर्जांची छाननी : 8 फेब्रुवारी
अर्ज मागं घेण्याची मुदत : 10 फेब्रुवारी
मतदान : 27 फेब्रुवारी
निकाल : 2 मार्च

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निवडणुकांचाही धुराळा

उत्तर पूर्वेतील ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, मेघालय आणि नागालँड राज्यात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, तिन्ही राज्यांची मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे, आता पुढील महिन्यात देशातील या तीन राज्यांत राजकीय धुरळा उडणार आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नागालँडमध्ये 12 मार्च, मेघालयमध्ये 15 मार्च आणि त्रिपुरामध्ये 22 मार्चला विधानसभेचा कार्यकाळ संपतो. त्यामुळे फेब्रुवारीअखेर निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे.

मेघालय विधानसभा, जागा- 60, बहुमत- 31

मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ 2 जागा मिळू शकल्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) 19 जागा मिळाल्या. पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले. त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स (MDA) ची स्थापना केली. गेल्या तीन महिन्यांपासून येथील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने 40 आणि एनपीपीने 58 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे. 

त्रिपुरा विधानसभा, जागा- 60, बहुमत- 31 

राज्यात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणुका झाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. 35 जागा मिळाल्या. डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला होता. यापूर्वी बिप्लब देव यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, परंतु मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

नागालँड विधानसभा, जागा-60, बहुमत-31

नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सरकार आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. 2018 मध्ये दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. त्यानंतर एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या. यानंतर NDPP ने NPP आणि JDU सोबत सरकार स्थापन केले होते.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.