Friday, 13 January 2023

लक्षद्विपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहंमद फैझल यांची खासदारकी संपुष्टात

राष्ट्रवादीच्या नेत्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने खासदारकी रद्द


क्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवणारी अधिसूचना लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. खासदार मोहम्मद फैजल यांना नुकतेच केंद्रशासित प्रदेशातील एका न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यामुळे मोहम्मद फैजल याचे ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे. लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने बुधवारी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, फैजलला कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या कलम 102 (1) (ई) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 मधील तरतुदींनुसार घेण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, “लक्षद्वीप, कावरत्तीच्या सत्र न्यायालयाने खटला क्रमांक ०१/२०१७ मध्ये दोषी ठरवल्यामुळे मोहम्मद फैजल पी.पी. भारत राज्यघटनेच्या कलम १०२(१) अन्वये लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाच्या लक्षद्वीप संसदीय मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. e) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम आठ अन्वये दोषसिद्धीच्या तारखेपासून म्हणजेच ११ जानेवारी 2023 पासून लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्यात आले आहे. २००९ साली घडलेल्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच चारही आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेत त्यांनी लक्षद्विपच्या प्रश्नांवर अनेकदा रोखठोक भूमिका मांडली आहे. फैजल हे लोकसभेत निवडून आलेले सदस्य आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान झालेल्या वादाशी संबंधित आहे. लक्षद्वीपचे माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी.एम. सईद यांचे जावई असलेले काँग्रेस नेते मोहम्मद सल्लेह यांच्यावर एका व्यक्तीने क्रूरपणे हल्ला केला होता. २००५ मध्ये निधन होण्यापूर्वी सईद यांनी १० वेळा लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व केले. या क्रूर हल्ल्यात सल्लेह गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना विमानाने कोची येथील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्विपमधील खासदार आहेत. ते १६ व्या लोकसभेत सदस्य म्हणून निवडून आलेत. २०१४ मध्ये फैजल यांनी मुहम्मद हमदुल्ला सईद यांना हरवले होते. राष्ट्रवादीचे लोकसभेतील सदस्य संख्या घटली असून एकूण 5 खासदार निवडून आलेले असून आता खासदारांची संख्या 4 इतकी राहिली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कायम राहण्यासाठी पक्षाला आगामी निवडणुकांत अपेक्षित कामगिरी करावी लागणार आहे. भारतात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकांमध्ये किमान तीन राज्यांमध्ये 2 टक्के जागा जिंकून याव्या लागतात किंवा किमान 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये 6% मतं आणि लोकसभेच्या 4 जागा मिळवाव्या लागतात किंवा 4 राज्यांमध्ये त्या पक्षाला राज्य पातळीच्या पक्षाचा दर्जा मिळवावा लागतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अन्य राज्यांत पुढील काळात प्रयत्न करावे लागणार आहेत. लक्षद्वीप हा भारताच्या अति दक्षिणेकडील शेवटचा व सर्वात लहान लोकसभा मतदार संघ आहे. १९५७ ते १९६७ या कालावधीत या बेटांसाठी निवडणूकच घेण्यात येत नव्हती, राष्ट्रपती थेट खासदाराची नेमणूक करीत होते. के. नल्ला कोया थंगल हे लक्षद्वीपचे पहिले व शेवटचे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. जवळपास ३९ बेटांचा समूह असलेल्या या मतदारसंघाचे एकूण क्षेत्रफळ आहे अवघे ३२.६९ वर्ग किमी. या ३९ पैकी केवळ १० बेटांवर लोकवस्ती आहे. एकच जिल्हा आहे व जिल्ह्याचे ठिकाण कवरत्ती आहे. हीच राजधानी सुद्धा आहे. सर्वात मोठे बेट अँड्रॉथ (अपुऱ्या जैविक संसाधनांमुळे या बेटावर पर्यटकांना प्रवेश नाही). या मतदारसंघाची एकूण लोकसंख्या आहे जवळपास ७८ हजार (२०११ च्या जनगणनेनुसार ६४,४२९) त्यापैकी ४९,९२२ मतदार आहेत. या बेटांवर सर्वात मोठा धर्म आहे इस्लाम. तब्बल ९६% लोक इस्लामचे अनुयायी आहेत. इतर धर्मियांचे अस्तित्व नगण्य आहे. ८३% लोक मल्याळम वंशाचे तर १७ टक्के लोक माल्ह वंशाचे आहेत. १९६७ पासून ते २००४ पर्यंत या बेटांचे लोकसभेत पदनाथ मोहम्मद उर्फ पी. एम. सईद यांनी प्रतिनिधित्व केले. १९६७ साली ते लोकसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले व १९७१ च्या पुढील सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. त्यावेळी ते बिनविरोध निवडून गेले होते. तेव्हा पासून २००४ ला जनता दल (संयुक्त) च्या पुकून्ही कोया यांच्याकडून ७१ मतांनी पराभूत होईपर्यंत विक्रमी सलग १० वेळा तेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. २००९ मात्र त्यांचे पुत्र मोहम्मद हमदुल्लाह सईद यांनी ही जागा जिंकली, पण २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहम्मद पी. पी. फैजल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा विद्यमान खासदार फैजल यांनाच संधी दिली होती त्यांनी जागा कायम राखली होती. महाराष्ट्रात मित्रपक्ष असणारी राष्ट्रवादी केरळ व लक्षद्वीपमध्ये काँग्रेसची कट्टर विरोधक आहे. भाजपने इथे नेहमीपेक्षा खूप जास्त ताकद लोकसभा निवडणुकीत लावलेली होती. भाजपने या ठिकाणी अब्दुल खदिर हाजी यांना उमेदवारी आलेली होती.भाजप उमेदवार अब्दूल हाजी यांना केवळ १०३ मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या फैजल यांना यावेळी एकूण २२ हजार ७९६ इतकी मते पडली. तर काँग्रेसचे उमेदवार सईद यांना २१ हजार ९८० एवढी मते मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एकूण ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष तर जनता दल, सीपीआईएम आणि सीपीआई या पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. आता लक्षद्विप या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.