Thursday 2 February 2023

नागपूरमध्ये भाजपला धक्का तर कोकण विभागातील शेकापचे अस्तित्व संपुष्टात

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय तर नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी


नागपूरमध्ये भाजपला धक्का बसला असून पुरस्कृत उमेदवाराला पराभवास सामोरे जावे लागले आहे तर कोकण विभागातील महाविकास आघाडीचा पाठींबा असलेल्या शेकापच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाल्याने शेकापचे  अस्तित्व संपुष्टात आले आहे याचा आगामी काळातील निवडणुकांवर विपरीत परिणाम होणार आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रें तर नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६८३ मते मिळाली आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. त्यांना १०९९७ मते मिळाली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी दि. ३० जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली पार पडली. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोलंकी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपायुक्त मनोज रानडे आदी उपस्थित होते. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण ९९ मतपेट्या मध्ये मतपत्रिका होत्या. मतमोजणी साठी एकूण २८ टेबल ठेवण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण ३५ हजार ०६९ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ३३ हजार ४५० मते वैध ठरली तर १६१९ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी १६७२६ इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता. येथे 8 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्यात झाली. पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. येथे म्हात्रे यांनी बाजी मारली. इतर उमेदवारांमध्ये धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), उस्मान इब्राहिम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), देवरुखकर रमेश नामदेव (अपक्ष), प्रा.सोनवणे राजेश संभाजी (अपक्ष), संतोष मोतीराम डामसे रिंगणात होते. दरम्यान, माझा विजय हा सर्व शिक्षकांचा आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे. 

मतदानाची अंतिम आकडेवारी

ज्ञानेश्वर म्हात्रे - 20683( विजयी उमेदवार भाजप), बाळाराम पाटील -10997( महाविकास आघाडी), धनाजी पाटील -1490, उस्मान रोहेकर -75, तुषार भालेराव - 90, रमेश देवरुखकर- 36, राजेश सोनावणे - 63, संतोष डामसे -16, नोटा आणि बाद - 1619, एकूण मतदान - 35069, मोजली गेलेली मते - 33450

नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांना धूळ चारली. अडबाले यांना 16500 मते मिळाली, तर गाणार यांना 6366 मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत अडबाले यांना 14071 मते मिळाली. तर गाणार 6309 मतांवर राहिले. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला. नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजपचे नागो गाणार आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात झाली. अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करणारे सतीश ईटकेलवारही रिंगणात होते. मात्र, बंडखोरी केल्यामुळे ईटकेलवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली होती. या अटीतटीच्या लढतीमध्ये अडबाले यांनी गाणार यांच्यावर जवळपास सात हजार मतांनी विजय मिळवला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत घोळ घालीत अखेर काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर करून त्यांच्या समर्थनार्थ नेत्यांनी सभाही घेतल्या. यामुळे दोन टर्म या मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले या तिघांमध्ये थेट सरळ लढत झाली. विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 34 हजार 360 पत्रिकांपैकी 28 हजार मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतामधील एक हजार 99 मते अवैध ठरली तर 26 हजार 901 मते वैध होती. 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी 19 जणांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.  दरम्यान, नागपूरमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली ? "दया कुछ तो गडबड है" असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. भाजपाच्या या पराभवानंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नागपूरमधील भाजपाचा पराभव हा फडणवीस आणि बावनकुळेंचा पराभव असल्याचे ते म्हणाले. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे कि, “ती जागा गेली याला काही भाजपाचे अपयश नाही म्हणता येणार. भाजपाचा एबी फॉर्म नाही, भाजपाचा उमेदवार नाही. जर भाजपा उमेदवार असता तर अजून काही वेगळं चित्र असते. त्यामुळे मला वाटते, यावर हुरळून जाण्याची काही गरज नाही.” कोण आहेत सुधाकर अडबाले- सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते असून मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. गणिताचे शिक्षक असलेले अडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत. गेले अनेक वर्ष ते या निवडणुकीची तयारी म्हणून शिक्षकांसाठी काम करत होते. जुनी पेन्शन साठी त्यांनी अनेक आंदोलन केली असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला मोठा मोर्चा काढून त्याचे नेतृत्व केले होते. जरी महाविकास आघाडी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी खूप उशीर लावला असला, तरी अडबाले आधीपासूनच सर्व तयारी करून होते. परिस्थितीचा अंदाज घेऊनच काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने त्यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला होता. नागूपर, कोकण आणि औरंगाबाद या तीन शिक्षक मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात विद्यमान आमदारांना फटका बसल्याचं चित्र आहे. कोकण मतदारसंघात शेकापच्या बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. तर, नागपूरमध्येही नागो गाणार यांना अँटीइन्कबन्सीचा फटका बसला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेली एकजूट आणि जुन्या पेन्शनचा मुद्दा सुधाकर अडबाले यांच्या विजयात महत्त्वाचा ठरला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन देता येणार नाही, असे म्हटले होते. जुन्या पेन्शनवरुन शिक्षकांमध्ये याबद्दल रोष होता. त्याचाही फटका नागो गाणार यांना बसला आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.