Thursday 16 February 2023

कसबापेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२३; ज्येष्ठ नागरिकांची टपाली मतदानाकडे पाठ; प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ

आजपासून टपाली मतदानास सुरुवात; स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांची दिशाभूल



सबापेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी प्रथमच दिलेल्या सुविधेकडे पाठ फिरवल्याचे नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे. आजपासून टपाली मतदानास आजपासून सुरुवात झाली. कसबा मतदार संघात 19 हजार मतदार हे 80 पेक्षा जास्त वय असणारे मतदार आहेत. आतापर्यंत केवळ 299 ज्येष्ठ नागरिक व 4 दिव्यांग मतदारांनी टपाली मतदान करण्यासाठी अर्ज सादर करून नोंदणी केली आहे. या मतदारांना टपाली मतदान स्वरुपात म्हणजे प्रत्यक्ष घरी राहून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 16 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत ही कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी आठ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. 
       80 पेक्षा जास्त वय असणारया 19 हजार मतदारांपैकी केवळ 299 ज्येष्ठ नागरिक मतदारांनी घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधेचा लाभ घेतला आहे यावरून प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत केवळ प्रसिद्धीचा स्टंट केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर राजकीय पक्षांनी देखील या सुविधा मोहीमेला प्रतिसाद दिला नसल्याचे आकडेवारीमुळे दिसून येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार सुविधा केंद्रात निवडणुकांवर भर दिला जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, शारीरिक विकलांग नागरिक आदींना मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती पोहोचवण्यात प्रशासन व राजकीय पक्षांचे प्रयत्न कमी पाडले आहेत. प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून ’नमुना 12-डी’ अर्ज भरून घेतला त्यांनाच या कालावधीत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात येत आहे.
         मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी 80 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या, तसेच शारीरिक विकलांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी जनजागृती करीत असल्याचा केवळ आभास निर्माण केल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे.
       कसबापेठ विधानसभा मतदारसंघाची 2 लाख 75 हजार 428 याप्रमाणे मतदार संख्या आहे. सर्वसाधारणपणे 60 ते 65 टक्के मतदानाचे सरासरी प्रमाण आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 270 मतदान केंद्रे आहेत. प्राब संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना मागील निवडणुकीत अल्प मतदान केंद्र व अत्यल्प मतदानावर आधारीत दिलेल्या अहवालानुसार त्यामधील मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काही मतदानकेंद्रात 40 टक्के पेक्षा कमी मतदान तर काही केंद्रावर अत्यल्प मतदान होत असलेली 30 मतदानकेंद्र आहेत. 
     2 लाख 75 हजार 428 या एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत प्रशासनाने जाहीर केलेप्रमाणे या मतदारसंघात 80 पेक्षा जास्त वय असणारया मतदारांची संख्या 19 हजार इतकी आहे म्हणजे एकूण मतदारसंख्येच्या 6.89 टक्के मतदार आहेत. त्यापैकी केवळ २९९ ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग मतदारांनी घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधेचा लाभ घेतला आहे. सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा पोटनिवडणुकांमध्ये अत्यल्प मतदान होत असते. त्यामुळे कमी प्रमाणात मतदान झाले तर त्याचा लाभ कोणाला आणि तोटा कोणाला होणार याची देखील दखल उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी घेणे आवश्यक आहे.
     कसबा पेठ मतदारसंघातील प्रमुख भागामध्ये सर्वाधिक मतदारसंख्या सदाशिवपेठ मध्ये आहे तर सर्वाधिक कमी मतदारसंख्या दांडेकरपूल भागात आहे. प्रमुख भागामध्ये मतदारसंख्या उतरत्या क्रमाने पाहिल्यास सदाशिव पेठ, त्याखालोखाल भवानीपेठ, महात्मा फुले पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, घोरपडे पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, गणेश पेठ, सेनादत्त पेठ, रास्ता पेठ, नारायण पेठ, दत्तवाडी, आणि अत्यल्प आंबीलओढा, नवीपेठ, दांडेकर पूल अशा प्रमाणे मतदारसंख्येचा क्रम आहे. सर्व प्रमुख भाग हे मतदारयादीच्या प्रमाणे आहेत. अशी वस्तूस्थिती असताना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून वरिष्ठ नेत्यांना चुकीची व दिशाभूलकारक माहिती देऊन आपले महत्व वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्याचा विपरीत परिणाम निवडणूक नियोजनावर होत आहे. 
       विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे दरवेळी निवडणूक विषयक कामे जवळून पाहणाऱ्यांना बेदखल केल्याचा परिणाम प्रचारातील विस्कळीतपणावर झाल्याचे दिसून येत आहे. उमेदवाराच्या निगडीत एका सहकारी बँकेचे कर्मचारीच प्रत्यक्ष प्रचारात सहभागी असल्याचे दिसून येतात यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. स्थानिक पातळीवरील बेबनाव टाळणे प्रमुख उमेदवारांच्या राजकीय पक्षांना प्रचाराच्या सहाव्या दिवशीही शक्य होत नाही.
         बारावी दहावीच्या परीक्षांचे प्रात्यक्षिके सुरु असून  बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होत असल्याने या मतदारसंघात सर्वाधिक महाविद्यालय आहेत. त्यांच्या परिसरात प्रचार फेरीने वाहतूककोंडी, ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजीचा प्रचार राजकीय पक्षांच्या विरोधातील नकारात्मकताच मतदारांमध्ये निर्माण होत आहे. 
       ज्येष्ठ नागरिकांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी 16 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जावून त्यांचे मतदान घेण्यासाठी एकूण ८ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामध्ये पथकप्रमुख तथा मतदान अधिकारी क्र. १ म्हणून सेक्टर ऑफीसर, मतदान अधिकारी क्र. २ म्हणून महसूल कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. या कामकाजावर निरीक्षण ठेवण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक, या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी छायाचित्रकार व पोलीस कर्मचारी यांचा पथकामध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.