Thursday 16 February 2023

Pune bypolls: कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकांमध्ये प्रचारातील सहभागावरून बेबनाव कशासाठी?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या 18 आणि 19 तारखेला पुणे दौऱ्यावर


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ व १९ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेले 'मोदी अॅट २०' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी पुण्यातील आंबेगाव येथील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. म्हात्रे पुलाजवळील पंडित फार्म येथे १८ फेब्रुवारीला 'मोदी अॅट २०' पुस्तकाचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी शिवसृष्टीचे देखील अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर त्यांचे छोटे काही कार्यक्रम आहेत. दोन दिवशीय दौऱ्यानंतर ते कोल्हापूर येथे त्यांच्या सासरवाडीला देखील जाणार असल्याची माहीती मिळत आहे.
    पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात पोट निवडणुकांच्या प्रचाराची ऐन रणधुमाळी सुरु असतानाच या कालावधीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येत आहेत. अर्थातच चर्चा तर होणारच, कसबा पेठ मतदारसंघातील ओंकारेश्वर मंदीरात त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे. कसबा पेठ मतदारसंघात येत असले तरी प्रचारात सहभागी होणार नाहीत असे भाजपच्या शहराध्यक्ष यांनी भुमिका स्पष्ट केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोट निवडणुकांच्या प्रचारात सहभागी होणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व प्रकारची तयारी व नियोजन केले जात आहे. प्रत्यक्षात प्रचारात सहभागी होणार नाही मात्र निवडणूक मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राबाहेर दोन्ही मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची देखील माहिती प्राप्त होत आहे. 
    चिंचवड व कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकांच्या प्रचारातील प्रत्यक्ष सहभाग आणि पाठींबा मात्र सक्रीय प्रचारातील सहभाग नाही अशास्वरूपाच्या राजकीय पक्ष व नेत्यांच्या भुमिका जाहीरपणे घेतल्या जात आहेत यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकांमध्ये प्रचारातील सहभागावरून बेबनाव कशासाठी केला जात आहे याचा खरा प्रश्न मतदारांना पडला आहे. चिंचवड व कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकांमध्ये मनसेने भाजपयुतीला पाठींबा जाहीर केला आहे मात्र प्रचारात सक्रिय सहभाग कार्यकर्त्यांचा नसेल असे स्पष्ट केले आहे यामागील राजकीय गणित काय आहे असा प्रश्न देखील उपस्थितीत केला जात आहे. तर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येत आहेत मात्र प्रचारातील प्रत्यक्ष सहभाग घेणार नाहीत असे स्पष्ट केले तरी मतदारसंघातील मंदीरात पूजाअर्चा करणार आहेत आणि मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर निवडक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
     पोटनिवडणुकांमध्ये प्रचारातील सहभागावरून स्थानिक पातळीवर देखील बेबनाव सुरु आहे. अर्थात केवळ भाजपमध्येच नाही तर महाविकास आघाडीत देखील असेच चित्र आहे. प्रचाराच्या प्रारंभी कार्यक्रमाला सर्व नेतेमंडळींनी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली मात्र दुसऱ्या दिवसापासून सर्व गायब झाल्याचे चित्र दिसून आले. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव व रुसवेफुगवे सुरूच असताना भाजप महायुतीत देखील त्यास्वरुपाची स्थिती आहे. कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष लोकप्रतिनिधीत्व केलेले भाजप खासदार गिरीश बापट यांनी निवडणूक घोषित झाली त्याच दिवशी रूग्णालयातून थेट कार्यालयात उपस्थिती दर्शवली. त्यानंतर कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी निवडीच्या प्रक्रीयेत चर्चा विचारविनिमय व सहभागी त्यांना केले नाही अशास्वरूपाच्या बातम्या झळकल्या आणि नाराजीची चर्चा सुरु झाली. नंतर वरिष्ठ नेत्यांनी व  मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. निवडणुकीवर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान देखील त्यांनी प्रचारात लक्ष असून भाजपचा विजय नक्की मिळेल असा आत्मविश्वासाने सांगितले त्यानंतर दोन दिवसांनी काय झाले त्यांनी सरळ पत्रक प्रसिद्धीला दिले आणि प्रकृती स्वास्थ्य मुळे सक्रीय प्रचारात सहभागी होणार नसल्याचे नमूद केले त्यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे प्रसारमाध्यमांमधून वृत्त झळकले. 

     उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार बापट यांच्या तब्बेतीची विचारपूस करून त्यांचा प्रचारातील व्हर्चुअल सहभागाबाबत भुमिका स्पष्ट केली होती. तरीही भाजपने प्रत्यक्षात सभेद्वारे त्यांचा सक्रीय सहभाग असल्याचे दर्शवून कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रकृती अस्वस्थता असूनही त्यांनी भाषण करून कसबा मतदारसंघात पक्षाचा विजय होईल आणि पक्षात गद्दारीला थारा नसल्याचे ठणकावून सांगितले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र अशा अस्वस्थेत त्यांना प्रचारात आणावे लागणे दुर्दैवी असून भाजपवर निशाना साधला आहे. तर महाविकास आघाडीत देखील सर्व काही अलबेल आहे असे नाही. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी सक्रीय प्रचारात दिसून येत नाहीत तर अन्य घटक मित्र पक्षांचा देखील सहभाग दिसत नाही. प्रचाराचा सहावा दिवस आहे अजून आठवडाभर प्रचारातील खरी रणधुमाळी आहे त्यामध्ये कोणाचे वर्चस्व राहील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.       

Modi@20: Dreams meet Delivery या मराठी अनुवाद पुस्तकाचे प्रकाशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेले 'मोदी अॅट २०' या मराठी अनुवाद पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. मूळ पुस्तकाचे दिनांक 11 मे 2022 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते Modi@20: Dreams meet Delivery या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. रूपा पब्लिकेशनने या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सुधा मूर्ती यांच्यापर्यंत बावीस क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेल्या एकवीस प्रकरणांचा हा संग्रह त्यामध्ये आहे. प्रथम गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री आणि नंतर दोन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वीस वर्षांच्या राजकीय प्रवासाबद्दल हे पुस्तक आहे. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देशाची सेवा केली. हे पुस्तक खूप अभ्यासपूर्ण आहे आणि त्यात देशाच्या प्रगतीबद्दल अगदी सूक्ष्म तपशील आहेत आणि त्या माणसाच्या प्रवासाचा समावेश आहे, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या देशातील लोकांसाठी समर्पित केले आहे. दूरदृष्टी, दीर्घकालीन नियोजन आणि आपल्या शब्दांवर खरा असणारा माणूस, ज्याला कधीही अपयशाचा सामना करावा लागला नाही. 2021 मध्ये, मोदीजींनी सरकारच्या प्रमुखपदाची सतत वीस वर्षे पूर्ण केली आणि या पुस्तकात मोदीजींचे कर्तृत्व, गुजरातचे राज्य पातळीवरील मूलभूत परिवर्तन आणि मोदीजींच्या शासनाच्या अद्वितीय मॉडेलमुळे राष्ट्रीय स्तरावर भारताचा विकास यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणाविषयी एक आकर्षक अध्याय लिहिला आहे. या पुस्तकात मोदीजींच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र धोरणे, जी सुरक्षेवर केंद्रित आहेत, मुत्सद्देगिरी जी अधिक विकासावर केंद्रित आहे, परराष्ट्र धोरणे जी लोककेंद्रित आहेत. जुन्या टपाल कार्यालयांचा पासपोर्ट संकलन केंद्र म्हणून वापर करण्यासाठी मोदीजींनी दिलेल्या कल्पनांचाही त्यात समावेश आहे. या पुस्तकात मोदीजींच्या नेतृत्वाखाली किमान सरकार आणि जास्तीत जास्त कारभारावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑपरेशन गंगा, वंदे भारत, देवी शक्ती, इंद्रधनुष अशा विविध मोहिमा पुस्तकात स्पष्ट केल्या आहेत.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.