Tuesday 14 February 2023

kumbi-kasari cooperative sugar factory Election; कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘नरके पॅनल’ चा दणदणीत विजय

माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा चौकार


कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सलग चौथ्यांदा यश मिळवून विजयाचा चौकार ठोकला. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सलग चौथ्यांदा सत्ता ताब्यात ठेवत कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणावरील आपली पकड घट्ट असल्याचे विरोधकांना त्यांनी दाखवून दिले. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. नरके यांच्या ताब्यातील साखर कारखाना काढून घेण्यासाठी आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद पणाला लावली होती. परंतु, सभासदांनी नरके घराण्याकडेच कारखाना सुरक्षित राहू शकेल या भावनेने मतदान केल्याने एवढ्या अटीतटीच्या लढतीतही चंद्रदीप नरके यांच्याकडे सत्ता कायम राहिली. चंद्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई सोपी झाली. गेले पंधरा-वीस दिवस आरोप-प्रत्यारोप झाल्याने निकालाबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती.
         कोल्हापुरात सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर ज्याची पक्कड त्या लोकप्रतिनिधीला आपले वर्चस्व ठेवणे सहज शक्य होते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक सहकारी संस्थेवर आपल्या गटाची सत्ता असावी, यासाठी प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर कुंभी साखरची पंचावार्षिक निवडणूक पार पडली. कुंभी साखरच्या निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण काही प्रमाणात विस्कळीत झाले असून एकीकडे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्यासोबत कुंभीसाठी लढा सुरु केला. तर गोकुळसाठी विरोधात लढलेले आमदार पी. एन. पाटील व बाजीराव खाडे यांनी कुंभीसाठी एकत्र लढण्याची भुमिका घेतली आहे. गोकुळसाठी बाजीराव खाडे गट व आमदार सतेज पाटील यांनी एकत्र लढा दिला आहे, तेच आता कुंभीसाठी वेगळ्या भुमिकेत आहेत. तर यांच्या विरोधात माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी हात मिळवणी करत कुंभीसाठी लढा दिला आहे. त्यामुळे आमदार पाटील व माजी आमदार नरके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 
       कुंभी कारखान्यासाठी (ता. १२) रोजी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या २३ हजार ४३१ इतकी होती त्यापैकी १९ हजार ३१९ मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत एकूण ८२.४५ टक्के मतदान झाले होते. १०५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. दरम्यान तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली यामध्ये पहिल्या फेरीत कुडित्रे, वाकरे, कोपार्डे, कळंबे तर्फ कळे, भामटे तर्फ कळे, चिंचवडे, सांगरुळ, म्हारुळ, आमशी, खाटांगळे, पासार्डे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, बहिरेश्वर, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला गावांतील मतदान केंद्रावरील मतमोजणी होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीत चाफोडी, आरळे, घानवडे, महे, कोगे, खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, पाडळी बुद्रुक, दोनवडे, शिंगणापूर, पाडळी खुर्द, यवलूज, माजगाव, आळते, पुनाळ, काटेभोगाव आणि तिसऱ्या फेरीत कसबा ठाणे, दिगवडे, तिरपण, कोलोली, नणंद्रे, पोहाळे, वाळोली, बोरगाव, चव्हाणवाडी, बाजार भोगाव, किसरुळ, पाटपन्हाळा, पोर्ले तर्फ बोरगाव, देसाईवाडी, माळापुडे, पाली, कसबा कळे, घरपण, निवडे, मांडुकली, सावर्डे तर्फ असंडोली, पणोरे, आकुर्डे, पणुत्रे, मासुर्ली आणि कुडित्रे (कारखाना साईट) या ठिकाणी घेतलेल्या मतदान केंद्रावर ३५ टेबलवर आणि तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.  
निवडणूक सचांलक मंडळाची मुदत असून संचालक मंडळावरील २५ प्रतिनिधींची निवड उत्पादक सभासदांचे मार्फत गुप्त मतदान केली जाते. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, इतर मागासवर्गीय व भटकी विमुक्त जाती प्रतिनिधी वगळता राहिलेल्या २१ संचालकांची निवड गट पद्दतीने घेतली जाते. त्यासाठी कार्यक्षेत्रातील गांवाचे पांच गट पाडलेले असून मतदार संघ एक आहे. तसेच संस्था प्रातिनिधींची निवड गुप्त मतदान पद्दतीने घेतली जाते. वरील निवड्णूक सहकारी निवडणूक कायद्यातील तरतूदींनूसार घेतली जाते. कारखान्याचे संचालक मंडळ खालील प्रमाणे असून त्यामध्ये खालील प्रतिनिधीत्व आणि प्रतीनिधींचा समावेश आहे. यामध्ये उत्पादक सभासद प्रतिनिधी- 18, संस्था प्रतिनिधी- 01, मागासवर्गीय प्रतिनिधी- 01, आर्थिक दुर्बल घटक- 01, महिला प्रतिनिधी- 02, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी- 01, भटकी विमुक्त प्रवर्ग जाती प्रतिनिधी- 01, प्रादेशिक सहसंचालक - साखर राज्य सरकारचा प्रतिनिधी- 01, महाराष्ट्र राज्य सहकारी बैंकेचा प्रतिनिधी- 01, कामगार प्रतिनिधी-02 यांचा समावेश आहे.
        नरके गटाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- अनिल पाटील, भगवंत पाटील, बाजीराव शेलार, राहुल खाडे, किशोर पाटील, दादासो लाड, उत्तम वरुटे, सर्जेराव हुजरे, विश्वास पाटील, सरदार पाटील, संजय पाटील, अनिष पाटील, प्रकाश पाटील, बळवंत पाटील, वसंत आळवेकर, प्रकाश पाटील, राऊ पाटील, विलास पाटील, धनश्री पाटील, प्रमिला पाटील, युवराज शिंदे, कृष्णात कांबळे.
       चंद्रदीप नरकेंची पकडस्वर्गीय डी. सी. नरके यांच्या निधनानंतर चंद्रदीप नरके यांनी २००४, २००९, २०१५ व २०२३ अशा चारही निवडणुकीत एकतर्फी सत्ता ताब्यात ठेवली आहे. त्यामुळे त्यांची ‘कुंभी’च्या राजकारणावरील पकड घट्ट आहे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शिवसेनेने चंद्रदीप नरके यांना मागील टर्म विधानसभेची उमेदवारी देवून विधानसभेत पाठवले. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. पण निवडणुकीनंतर मविआ सरकार सत्तेत आले आणि शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी घुसमट सुरू झाली होती. जिल्ह्यातील इतर पाच शिवसेनेच्या पराभूत आमदारांची हीच अवस्था निर्माण झाली होती. विशेषतः जे पराभूत झाले त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेसच होती त्यामुळे सत्तांतरामुळे काही प्रमाणात त्यांना पुढील राजकीयदृष्ट्या समीकरणे जुळवणे शक्य होत असल्याचे समर्थकांचे मत आहे.
      कै. डी. सी. नरके व त्यांच्या सहकार्यांनी (प्रवर्तक) १९५४ मध्ये कुंभी-कासारी साखर कारखान्याचा प्रस्ताव तयार केला. २० जून १९६० रोजी अथक प्रयत्नांतून कारखान्याची स्थापना करण्यात आली. प्रथमतः प्रतिदिन एक हजार मे.टन गाळपाचे लायसंस मिळविले. १९६२-६३ मध्ये प्रथम गळीत हंगाम घेतला. सहकारी संस्था [को-ऑपरेटिव्ह ऑर्गनायझेन] म्हणून 1964 सालापासून कार्यरत असून भागधारकांची एकूण संख्या - 23 हजार 741 तर एकूण भाग - 24 हजार 764 इतके आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण गावांची संख्या - 179 असून  कारखान्याचे कार्यक्षेत्र 5 तालुक्यांमध्ये व 109 गांवामध्ये विस्तारलेले आहे. 5 तालुक्यांमध्ये करवीर-45,  पन्हाळा-76, गगन बावडा-31, शाहुवाडी-19, राधानगरी-08 या गावांचा समावेश आहे. कारखान्याचे 23,741 अ-वर्ग भागधारक सभासद, 393 ब-वर्ग सभासद आहेत. अ-वर्ग भागधारक कारखान्याचे ऊस उत्पादक आहेत तर विकास सेवा संस्था व पाणी पुरवठा संस्था ह्या कारखान्याच्या ब-वर्ग सभासद आहेत. क-वर्ग सभासदांमध्ये (नाममात्र सभासद) व्यक्ती, व्यापारी पेढ्या, कंपन्या यांचा समावेश आह. प्रत्येकी रुपये दहा हजार दर्शनी किंमतीचे एकूण रुपये 25 कोटी भाग उत्पादक सभासदांकरिता राखीव तर प्रत्येकी रुपये दहा हजार दर्शनी किंमतीचे एकूण रुपये 40 लाखांचे भाग सहकारी संस्था व बिगर उत्पादक सभासदां करिता राखीव आणि प्रत्येकी रुपये दहा हजार दर्शनी किंमतीचे एकूण रुपये 5 कोटी 50 लाखांचे महाराष्ट्र सरकारला दिलेले अग्रहक्काचे परतफेडीचे भाग आहेत. या कुंभी-कासारी साखर कारखान्याला अनेक पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.