Tuesday 14 February 2023

Gangapur Sahakari Sakhar Karkhana Election-2023; बंद पडलेल्या गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या प्रशांत बंब यांना पराभवाचा धक्का

शिवसेना(ठाकरे) पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलचा विजय; विधानसभेला राजकीय समीकरण बदलणार

बंद पडलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना पराभवाचा धक्का बसला असून त्यांचा लासूर गटातून पराभव झाला आहे. त्यांच्या शेतकरी सभासद कामगार विकास पॅनेलचा दारूण पराभव झालेला आहे. शिवसेना(ठाकरे) पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व जागांवर विजय मिळवला असल्याने या निवडणुकीमुळे गंगापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे याचा आगामी विधानसभेसह अन्य निवडणुकांत राजकीय समीकरण बदलणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला देखील इशारा आहे. गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचा पराभव करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला. बंब यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. 
       गंगापूर तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीने काही दिवसांपासून स्थानिक राजकीय वातावरण तापले होते. या कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असून, अनेक वर्षांपासून बंद असणारा हा कारखाना सुरू करून दाखवू, असे आश्वासन दोन्ही बाजूंकडून देण्यात आले होते. निवडणुकीतील एक जागा बिनविरोध आली होती, तर उर्वरित २० जागांसाठी प्रशांत बंब यांचे शेतकरी सभासद कामगार विकास पॅनेल व कृष्णा डोणगावकर यांचे शिवशाही शेतकरी विकास पॅनेलचे एकूण ४० उमेदवार रिंगणात होते. गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकांच्या निवडीसाठी रविवारी १० जून रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण 54 टक्के मतदान झाले होते. एकूण 14 हजार 66 मतदार सभासदांपैकी 7 हजार 598 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर एकूण 21 संचालकांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने 20 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते. 
       गंगापूर तालुक्यातील ऊसउत्पादक सभासदांकरिता मतदानासाठी ३५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यात प्रत्येक मतदाराला मतपत्रिकांवर २० ठसे मारण्याचा अधिकार होता. २१ वा प्रतिनिधी सहकारी सोसायट्यांमधून निवडून द्यावयाचा असल्याने गंगापूर येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. या मतदारसंघात ७२ मतदार होते. गटातून निवडून द्यावयाच्या १५ उमेदवारांसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका तर महिला राखीवमधील निवडावयाच्या दोन उमेदवारांसाठी गुलाबी रंगाची, ओबीसीसाठी पिवळ्या रंगाची मतपत्रिका, एस.सी.एस.टी प्रवर्गासाठी हिरव्या रंगाची तर विमुक्त भटक्या प्रवर्गातील उमेदवार निवडीसाठी निळ्या रंगाची मतपत्रिका होती. गंगापूर सहकारी साखर कारखान्यासाठी या मतदान केंद्रांवर मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती यामध्ये जामगावजि.प. प्रशाला खोली क्र.१ २, ममदापूर बगडी जि.प. प्रशाला ममदापूर, नेवरगाव हैबतपूर जि.प. प्रशाला खोली क्र. २, वाहेगाव वरखेड जि.प. प्रशाला वरखेड, मुद्देशवाडगाव हकिकतपूर, आलमगिरपूर, सिद्धपूर, संजरपूर, फाजलपूर, जाखमाथा जि.प. प्रशाला मुद्देशवाडगाव, रांजणगाव नरहरी अकोलीवाडगाव जि.प. प्रशाला रांजणगाव, मांजरी माउली पिंपरी शिंगी जि.प. प्रशाला मांजरी, काटेपिंपळगाव, अमिनाबाद, खडकवाघलगाव, झोडेगाव जि.प. प्रशाला काटेपिंपळगाव मालुंजा भालगाव, सिरजगाव आदी मतदान केंद्राचा समावेश होता.
       सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासून कृष्णा डोणगावकर यांचे शिवशाही शेतकरी पॅनेल आघाडीवर राहिले. कृष्णा डोणगावकर, संजय जाधव, सुरेश मनाळ, प्रवीण वालतुरे, कचरू शिंदे, बाबुलाल शेख, मधुकर साळुंके, शेषराव साळुंके, अप्पासाहेब गावंडे, मनोहर दुबिले, प्रल्हाद निरफळ, तुकाराम कुंजर, शेषराव पाटेकर, दिलीप बनकर, कारभारी गायके, दादासाहेब जगताप, काशिनाथ गजहंस, माया दारुंटे, शोभा भोसले, नामदेव दारुंटे, देवचंद राजपूत हे संचालक निवडून आले आहेत. निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर डोणगावकर समर्थकांनी घोषणा देत गुलाल उधळून फटाक्याची आतिषबाजीने जल्लोष साजरा करून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली.
      गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे गंगापूर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते. आमदार प्रशांत बंब व कारखान्याचे माजी अध्यक्ष कृष्णा डोणगावकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत बंब यांना धक्का देत कृष्णा डोणगावकरांनी कारखान्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत आपल्या बाजूने निकाल घेणारे आमदार बंब यांची जादू यावेळी चालली नाही. त्यांच्यासह पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. या निकालामुळे भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.
    गंगापूर सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षांपासून बंद पडलेला आहे. कारखान्यावर ३५ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने सहकारी बँकेने कारखाना विक्रीसाठी काढला होता. त्यानंतर सोलापुरच्या जयहिंद शूगरला हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्यात आला होता. परंतु त्यात अद्यापही कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे आता बंद पडलेल्या कारखान्याची निवडणूक पार पडल्यानंतर आता तरी कारखाना सुरू होईल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.