Monday 20 February 2023

kasba peth by-election 2023; कसबापेठ मतदारसंघातील यादीत 15 हजार 914 फोटो नसलेले मतदार; बोगस मतदानाची भीती!

कसबापेठ मतदारसंघात 15 हजार 914 फोटो नसलेले मतदार


सबापेठ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची तब्बल 15 हजार 914 मतदारसंख्या असून या मतदारांच्या नावे बोगस मतदान होण्याची भीती राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात आहे. 
      पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतदारसंख्या असलेला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात पोटनिवडणुकीत एकूण मतदारसंख्या 2 लाख 75 हजार 428 इतकी आहे. 1 लाख 36 हजार 873 पुरुष मतदार, 1 लाख 38 हजार 550 स्त्री मतदार आणि 5 तृतीयपंथी मतदार याप्रमाणे आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 15 हजार 255 ची घट झाली आहे. 
      मतदारयादीत वय 80 च्या वरील मतदारांची संख्या 19 हजार असून जेष्ठ मतदारांना पोस्टल टपाली मतदानाचा अधिकार असून त्यासाठी अत्यल्प प्रतिसाद प्रशासनाला मिळाला त्यामुळे मतदानाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची तब्बल 15 हजार 914 मतदारसंख्या असल्याने बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
       कसबापेठ मतदारसंघात अतिशय चुरशीची निवडणूक होत आहे. धंगेकर विरुद्ध रासने अशी प्रमुख लढत मानली जात असल्याने अटीततटीत वैयक्तिक तुलनात्मक दृष्ट्या कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या नावाला मतदारसंघात पाठींबा व पसंती मिळत असल्याचे चित्र असल्याने भाजपकडून सदरील लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी पक्षीय असल्याचे स्पष्टीकरण द्यावे करावे लागत आहे. वैयक्तीक उमेदवारांच्या नावाऐवजी दोन राजकीय पक्षांची लढत असल्याचे बिंबवले जात आहे. मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या तुलनेने जास्त असल्याने सदरील मतदारांच्या नावे अन्य कोणतीही असंबंधित व्यक्ती ती स्वतः मतदार आहे म्हणून मतदान बोगस करू शकते अशी भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे. 
       मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची ४६८ पानांची यादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये सदरील मतदारांची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. कसबापेठ विधानसभा मतदारसंघात मागील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वसाधारण सरासरी 62 ते 70 टक्के मतदान होत असते.मात्र पोटनिवडणुकीत मतदानाचे प्रमाण तुलनेने अत्यल्प होत असते त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर होत असतो. या मतदारसंघात चुरशीच्या निवडणुकीमुळे एकएका मताला महत्व असल्याने बोगस मतदानाची भीती व्यक्त केली जात आहे. 
        मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची योग्य पडताळणी केल्याशिवाय मतदान करू देऊ नये अशाप्रकारच्या सूचना पोलिंग एजंटला देण्यात येणार असल्याचे राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांनी म्हंटले आहे. ही निवडणूक खूप गांभीर्याने महाविकास आघाडी आणि भाजप युतीने घेतली असून भाजपने प्रदेश पातळीवरुन संपूर्ण राज्यभरातील जिल्हा आणि मंडळ कार्यकारणीला कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदार शोध मोहीमेसाठी कामाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. परिचयाचे मतदारांचा शोध घेण्याच्या सुचना राज्यभरातील जिल्हा तसेच मंडळ कार्यकारणीला देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून किमान काही प्रमाणात अर्ज भरुन दिले जावेत असा फतवा काढण्यात आला असून परिचयाच्या मतदारांशी स्वत: संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. 
       कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्र आहेत यामधील 30 मतदान केंद्रावर प्रत्येक निवडणुकीत अत्यल्प मतदान होत असते. एकूण मतदारसंख्येतील मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची 15 हजार 914 मतदारसंख्या तर 80 वयापेक्षा जास्त वय असणारे 19 हजार मतदार असून त्यांनी टपाली मतदानास प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे या 34 हजार 914 मतदारांचे मतदानाला फार महत्व आलेले आहे. 2 लाख 75 हजार 428 एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत सरासरी कमाल 60 टक्के मतदान झाले तर 1 लाख 65 हजार 256 इतके मतदान होऊ शकते तर किमान 40 टक्के मतदान झाले तर 1 लाख 10 हजार 171 इतके मतदान होऊ शकते. 
         कमी मतदान झाल्यावर कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला त्याचा फटका बसणार हे सर्व जाणून आहेत. त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढवणे देखील आवश्यक आहे. प्रमुख पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना पालिका निवडणुकीत त्यांच्या प्रभागात हमखास मतदान देखील काही प्रमाणात होत असते त्यातुलनेत 40 टक्के मतदान झाल्यास विजयी उमेदवाराच्या मताधिक्यावर परिणाम होणार आहे. कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली असून वरिष्ठ नेते राजकीय प्रचाराच्या आखाड्यात उतरलेले आहेत यावरूनच या निवडणुकीतील चुरस किती आहे हे मतदारांना दिसून येत आहे.   

१५ कसबा पेठ मतदारसंघ– मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची यादी- खालील लिंकवर पहा-:

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.