Friday 17 November 2017

राज्यातील 734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबर २०१७ रोजी मतदान ; पुणे जिल्ह्यांतील ९९ ग्रामपंचायतींसाठी मतदान

    राज्यातील 734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबर २०१७ रोजी मतदान
                      थेट सरपंचपदासाठी देखील होणार मतदान

    पुणे जिल्ह्यांतील ९९ ग्रामपंचायतींसाठी मतदान


पुणे : राज्यात जानेवारी व फेब्रुवारी 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 734 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 26 डिसेंबर २०१७  रोजी मतदान होणार आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यांतील ९९ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. माहे जानेवारी-फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सर्व सदस्य व सरपचं पदासाठी सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यकम जाहीर करण्यात आला आहे

734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान

राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमधील 734 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असून 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल
जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 12 डिसेंबर 2017 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2017 असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 26 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल; परंतु गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी 3 पर्यंत असेल. 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
      निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 31, पालघर- 39, रायगड- 11, रत्नागिरी- 10, सिंधुदुर्ग- 16, नाशिक- 2, जळगाव- 100, नंदुरबार- 13, अहमदनगर- 67, पुणे- 99, सोलापूर- 64, सातारा- 19, सांगली- 5, कोल्हापूर- 12, औरंगाबाद- 2, बीड- 162, नांदेड- 4, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, लातूर- 5, अमरावती- 13, अकोला- 3, वाशीम- 2, बुलडाणा- 43, वर्धा- 3, गोंदिया- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 734.

तीन ते चार मते देणे आवश्यक

थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणावर मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल; तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीदेखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही.

सरपंचपदासाठी फिकी निळी मतपत्रिका

पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा; तर नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असेल.

…तर 7 वी उत्तीर्ण आवश्यक

सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान 7 वी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना 7 वी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक राहील.


आचारसंहिता लागू

या सर्व ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यांत एकूण ग्रामपंचायतींपैकी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. त्याचप्रमाणे ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील; परंतु निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाही. त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाच्या दिवशी संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करतील.

पुणे जिल्ह्यातील मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतीचा तालुका व गावे खालील प्रमाणे..

1) हवेली - (9 गावे) - भिलारवाडी, फुलगाव, गुजर निंबाळकरवाडी, कोलवडी साष्टे, जांबुळवाडी- कोडवाडी, खामगाव मावळ, मांगडेवाडी, वाडेबोल्हाई, वाघोली
2) मावळ - (7 गावे) - साळुंब्रे, आढले बुद्रुक, डोणे, मळवंडी ढोरे, बेबड ओव्हळ, आंबळे, शिंळींब,
3) आंबेगाव - (9 गावे) - चांडोली खुर्द, जारकरवाडी, पहाडदरा, कुशीरे बुद्रुक, निरगुडसर, जाधववाडी, कोलतावडे, पिंपरगणे, चास
4) दौंड (1 गाव) -  मलठण
5) वेल्हे ( 4 गावे) - आंबवणे, कांदवे, करण बुद्रुक, मानगाव
6) बारामती (15 गावे) - मानाप्पाची वाडी, धुमाळवाडी, डोर्लेवाडी, पारवडी, मुढाळे, सिध्देश्वर निंबोडी, मेडद, पवईमाळ, काटेवाडी, आंबी बुद्रुक, गुणवडी, कऱ्हावागज, करंजेपुल, गाडीखेल, चौधरवाडी
7) मुळशी - (15 गावे) - वांतुडे, भांबर्डे, शेडाणी, जामगाव, बेलावडे, भादस बुद्रुक, जातेडे, धामण ओव्हळ, आंबवणे, मुगाव, डावजे, वाद्रे, खुबवली, कोंढावळे, वडगाव,
8) भोर ( 10 गावे) - कांबरे बुद्रुक, जयतपाड, नांदगाव, वडतुंबी, टिटेघर, पळसोशी, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख, कुरुंजी, माळेगाव,
9) शिरुर (1 गाव) - राजंणगाव सांडस,
10) खेड (2 गावे) - होलेवाडी, निघोज,
11) पुरंदर (2 गावे) - गुळुंचे, कर्नलवाडी
12) जुन्नर (22 गावे) - पांगरी त.मढ., आंबेगव्हाण, बांगरवाडी, बुचकेवाडी, धालेवाडी, डुंबरवाडी, गुळुंचवाडी, कांदळी, खामगाव, खटकाळे, नारायणगाव, निमगिरी, पाडळी, पिंपळवंडी, पिंपरी कावळा, राळेगण, सागणोरे, शिरोली तर्फे आळे, सुकाळवेढे, उंब्रज नं 1, मानमळा, वडगाव आनंद..


               पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
Political Research & Analysis Bureau (PRAB)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.