Wednesday 1 June 2022

राज्यसभा निवडणूक-2022; निवडणूक लढविण्याचा छंद जोपासणाऱ्या अपक्षांचे अर्ज बाद

78 वयाच्या पुणेकर आजोबांनी लढवल्या लोकसभा निवडणुका आता राज्यसभेसाठी लगबग

महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अक्षय सानप (मुंबई) व शामराव कदम (पुणे) यांनी दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले यामुळे उमेदवारांची संख्या ९ झाली होती. उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली यामध्ये अपूर्ण व त्रुटीयुक्त नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने निवडणूक लढविण्याचा छंद जोपासणाऱ्या अपक्षांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. राज्यसभेच्या सहा जागांमध्ये सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झालेली असताना घोडेबाजाराची चर्चा झडत असताना अशा स्थितीत बेताची व जेमतेम आर्थिक असलेल्या छंदीक उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्य सूचक व अनुमोदक यांची सही असणे अनिवार्य असताना मोघमपणे या निवडणूक लढविण्याचा छंद जोपासणाऱ्या अपक्षांनी अर्ज दाखल केले होते. 75 वय वर्षाच्या वरील व्यक्तींना आगामी लोकसभा निवडणूक उमेदवारी न देण्याचा खल भाजप पक्षामध्ये सुरु असतानाच 78 वयाच्या आजोबांनी राज्यसभा निवडणूक लढविण्यासाठी लगबग सुरु केली आणि भले बाद का होईना पण अर्ज दाखल केला होता. निवडणूक लढविण्याचा छंद जोपासणाऱ्या पुणेकर आजोबा श्री. शामराव पिराजी कदम (वय-78) यांनी यापूर्वी 2 लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणूक देखील लढवलेली आहे. श्री. शामराव पिराजी कदम हे प्राधिकरण निगडी येथे राहत आहेत. सन 1969 साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. सिव्हील पदवी प्राप्त केलेल्या श्री.कदम यांनी सन 1998 मधील लोकसभा निवडणूक लढवली होती. अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या त्यावेळी पंढरपूर मतदारसंघातून अखिल भारतीय हिंदू महासभाचे उमेदवार म्हणून श्री. शामराव पिराजी कदम यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांना 2984 इतकी मते मिळाली होती. तर सन 2009 मधील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक व तदनंतर सार्वत्रिक विधानसभा निवडणूक देखील अपक्ष म्हणून लढवली होती. सन 2009 मध्ये 44-सांगली लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन विजयी उमेदवार प्रतिक पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत श्री.कदम यांना 3926 मते मिळाली होती तर सन 2009 मध्ये 281-मिरज या राखीव विधानसभा मतदारसंघातून श्री.कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना केवळ 258 मते मिळाली होती. राज्यसभेसाठी मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरला असला तरी पुणेकर आजोबांना मात्र निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचा आनंद अधिक वाटतो. 
           दरम्यान, घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा शिवसेनेने आरोप केला असून भाजपने मात्र आपल्याकडे संख्याबळ पुरेसे असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (मुंबई), माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (मोर्शी, अमरावती) आणि सहाव्या जागेसाठी साखर कारखानदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल (भंडारा) यांचा अर्ज भरला. संजय राऊत (मुंबई) आणि संजय पवार (कोल्हापूर) यांचे अर्ज शिवसेनेने यापूर्वीच दाखल केले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. तर अर्ज मागे घेण्यासाठी ३ जून शेवटचा दिवस आहे. राज्यसभा निवडणुकीचे पसंतीक्रमाचे मतदान असते. पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे एक क्रमांक टाकायचा व दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावापुढे दोन व तीन क्रमांक टाकायचे अशा पद्धतीने आमदारांना मतदान करावे लागते. मतदानासाठी निवडणूक आयोगाने पुरवलेला जांभळ्या शाईचा स्केचपेन वापरावा लागतो. अन्य पेनने केलेले मतदान हे बाद ठरते. भाजपकडे स्वत:चे १०६, अपक्ष ५ आणि मनसे १ व जनसुराज्य १ असे ११३ संख्याबळ आहे. मविआकडे स्वत:चे १५२, अपक्ष ८ आणि छोटे पक्ष ११ असे १७१ संख्याबळ आहे. एमआयएम, सीपीआय असे ३ सदस्य तटस्थ राहू शकतात. भाजपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या १३ मतांची गरज आहे. आघाडीकडे तिसरा उमेदवार निवडून देऊन पहिल्या पसंतीची २६ मते शिल्लक आहेत. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते प्राप्त करून तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांना जिंकून आणण्याची भाजपची रणनीती आहे. महाडिक आणि पवार दोघेही कोल्हापूरचे आहेत. माजी खासदार महाडिक हे साखर कारखानदार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार सामान्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे महाडिक हे अपक्ष व छोट्या पक्षांना कसे गळाला लावू शकतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, ३ जून रोजी सायंकाळी निवडणूक होणार की बिनविरोध याविषयी चित्र स्पष्ट होईल. 
विधानसभा पक्षीय बलाबल- काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३, शिवसेना ५५, भाजप १०६, अपक्ष १३, छोटे पक्ष - १६ (बविआ ३, सपा २, एमआयएम २, प्रहार २, मनसे १, सीपीआय १, स्वाभिमानी १, आरएसपी १, जनसुराज्य १, शेकाप १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १ )= एकूण - २८७
अपक्ष कुणाकडे ?- मविआ : मंजुळा गावीत (साक्री), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), आशिष जयस्वाल (नागपूर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), गीता जैन (मीरा- भाईंदर), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ), संजय शिंदे (करमाळा).
भाजप : रवी राणा (बडनेरा), राजा राऊत (बार्शी), विनोद अग्रवाल (चंद्रपूर), प्रकाश आवाडे (इचलकरंजी).
छोटे पक्ष कुणाकडे ? महाआघाडी : बविआ (०३), समाजवादी (०२), प्रहार (०२), स्वाभिमानी (०२), आरएसपी (०१), शेकाप (०१), क्रांतिकारी शेतकरी पक्ष (०१)
भाजप : मनसे (०१), जनसुराज्य (०१).
तटस्थ : एमआयएम (०२), सीपीआय (०१).
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.