Thursday, 9 June 2022

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; 18 जुलै रोजी होणार मतदान

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; 18 जुलैला मतदान


निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यानुसार, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाही. राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा यांच्यासह राज्यांच्या विधानसभा, केंद्रशासित दिल्ली व पुदुच्चेरी यांच्या विधानसभांचे सदस्य हे मतदार असतात. विधानसभांचे 4120 आमदार, लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार असे एकूण 4893 मतदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेज मतदान मोजले जाते. राज्यातील विधानसभा सदस्यांच्या एकूण संख्येला लोकसंख्येने भागाकार केला जातो. या भागाकारात एक हजार पटीने जी संख्या येईल ती त्या राज्यातील आमदारांचे मत मूल्य असणार आहे. देशभरातील 4120 आमदारांचे एकूण मत मूल्य हे 5,49,495 इतके आहे. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकूण संख्येला आमदारांच्या मूल्याने भागकार केला जातो. लोकसभेत 543 आणि राज्यसभेचे सदस्य 233 असे एकूण 776 खासदार  आहेत. आता  संसदेतील प्रत्येक सदस्याचे मूल्य हे 5,49,495/776 = 708  इतके होते. खासदारांची एकूण मते ही 776 आहेत. या संख्येला 708  या मत मूल्याने गुणाकार केल्यास हे मत मूल्य 5,49,408 इतके होते. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीतील आमदार आणि खासदारांची एकूण मते ही 10,98,903 इतकी होतात. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निकष आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा भारतीय नागरीक असावा आणि त्याचे वय 35हून अधिक असावे. त्याशिवाय, त्याला किमान 100 आमदार, खासदारांचा पाठिंबा असावा. यामध्ये 50 सूचक आणि 50 अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करतात. हे आमदार, खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत. एका उमेदवाराला अधिकाधिक चार नामांकने दाखल करता येतात. 

निवडणूक कार्यक्रम-

नोटिफिकेशन जारी – १५ जून २०२२
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – २९ जून २०२२
अर्ज छाननी – ३० जून २०२२
अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस – २ जुलै २०२२
मतदानाचा दिवस – १८ जुलै २०२२
मतमोजणी – २१ जुलै २०२२

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.