Saturday 11 June 2022

महाविकास आघाडीच्या बहुमताची वज्रमुठ सैल करण्यात भाजपला यश

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत धाकधूक

गोयल, पटेल, राऊत पुन्हा राज्यसभेवर तर महाडिक, बोंडे यांना संधी 

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या बहुमताची वज्रमुठ सैल करण्यात भाजपला यश मिळाले असल्याने आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीतील भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत धाकधूक वाढली असून काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी आघाडीतील नेत्यांवर दबाव वाढला आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे नेते संजय राऊत पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागली असून भाजपचे कोल्हापूरचे धनंजय महाडिक आणि माजी कृषी मंत्री बोंडे यांना राज्यसभेवर संधी मिळाली आहे. भाजपच्या या विजयात अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. मात्र आजपर्यंतचा एकूण प्रघात पाहता राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीत लहान पक्ष किंवा अपक्ष आमदार हे सहसा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान करतात. मात्र, यंदाच्या राज्यसभा निवडणुकीने किमान महाराष्ट्रात तरी हा समज पार धुळीस मिळाला आहे. राज्याची सत्ता हातात असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला अपक्षांना आपल्या बाजूने वळवता आले नाही, ही काहीशी चिंताजनक बाब आहे. विधानपरिषद निवडणुकीतही अपक्षांनी हाच कित्ता गिरवल्यास महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानपरिषदेसाठी गुप्त पद्धतीने मतदान होते. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर मविआच्या गोटातील धाकधुक वाढली आहे. भाजपने विधानपरिषदेच्या पाच जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. एवढेच नव्हे तर सहाव्या जागेवर सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून त्यांच्या पाठिशी भाजपची ताकद उभी करण्यात आली आहे. या निवडणुकीतही आपले सर्व उमेदवार निवडून आणू, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. विधानपरिषद निवडणुकीचा पॅटर्नही राज्यसभेप्रमाणेच आहे. या निवडणुकीतही पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या आधारे उमेदवारांची निवड होते. तसेच हे मतदान गुप्त पद्धतीने होते. राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या खेळात आपला हातखंडा असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी राज्यसभेप्रमाणेच अचूक नियोजन करून विधानपरिषदेच्या पाचव्या आणि सहाव्या जागांवर चमत्कार करुन विजय खेचून आणला तर ती महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी नामुष्की ठरेल. त्यामुळे आता महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधानपरिषदेत सुधारणार का, हे पाहावे लागेल. विधानपरिषद निवडणुकीसाठी होणारे गुप्त पद्धतीचे मतदान ही महाविकास आघाडी सरकारसाठी आणखी एक डोकेदुखी ठरू शकते. राज्यसभा निवडणुकीत केवळ अपक्षांना गुप्त पद्धतीने मतदान करण्याची मुभा होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत गुप्त राहणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटातील नाराज आमदारांची भाजपकडून फोडफोडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

4 राज्यांमधील 16 जागांवरील राज्यसभा निवडणुकीत नाट्यमय घडामोडी

राज्यसभेच्या 57 जागांसाठी नुकत्याच द्विवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आणि उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि उत्तराखंडमधील सर्व 41 उमेदवार गेल्या शुक्रवारी बिनविरोध निवडून आले. मात्र, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 16 जागांसाठी मतदान घेण्यात आले कारण उमेदवारांची संख्या रिक्त जागांपेक्षा जास्त होती. राज्यसभेच्या 16 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आणि धक्कादायक निकाल हाती आले. मतमोजणीनंतर कर्नाटकात भाजपला तीन तर काँग्रेसला एक जागा मिळाली. राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन तर भाजपला एक जागा मिळाली. हरियाणात भाजपचे कृष्णलाल पनवार आणि भाजप-जेजेपी समर्थित उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जिंकली. तर महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. पियुष गोयल यांना सर्वाधिक 48 मते, अनिल बोंडे यांनाही 48 मते, धनंजय महाडिक यांना 27+14 (41) मिळाली आहेत. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेनेच्या संजय पवारांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला. 
-------------------------------------------

कर्नाटकात 4 पैकी 3 ठिकाणी भाजपची बाजी, एका जागेवर काँग्रेस

कर्नाटकमध्ये झालेल्या राज्यसभेच्या चार जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे तीन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या निवडणूक लढवत होत्या, त्यांना पहिल्या पसंतीची 46 मते मिळाली. तर काँग्रेसचे जयराम रमेशही निवडून आले आहेत.

कर्नाटकातील विजयी उमेदवार-
निर्मला सीतारमण - भाजप 46 मते
जग्गेश- भाजप 46 मते
लहर सिंह सिरोया- भाजप 33 मते
जयराम रमेश- काँग्रेस 46 मते

(क्रॉस वोटिंगमुळं जेडीएसचे नुकसान)
-------------------------------------------

राजस्थानमध्ये काँग्रेसला 4 पैकी 3 जागांवर यश

राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने 4 पैकी 3 जागा जिंकत भाजपला धक्का दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
राजस्थानमध्ये उमेदवारांना खालीलप्रमाणे मते मिळाली-

रणदीप सुरजेवाला यांना 43 मते मिळाली.
मुकुल वासनिक यांना 42 मते मिळाली.
घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली.
प्रमोद तिवारी यांना 41 मते मिळाली.
डॉ. सुभाष चंद्रा यांना 30 मते मिळाली.

-------------------------------------------

हरियाणामध्ये 2 पैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर विजयी

हरियाणात भाजपचे कृष्ण पाल पंवार आणि भाजप-जेजेपी समर्थित कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जिंकली आहे. दुसऱ्या जागेसाठी पुन्हा मतमोजणी करून कार्तिकेय विजयी झाले. तर, काँग्रेसच्या अजय माकन यांचा फेरमतमोजणीत पराभव झाला आहे. त्यांचे एक मत फेरमोजणीत रद्द झाले आहे. हरियाणातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी झाली. काँग्रेसच्या किरण चौधरी आणि बीबी बत्रा यांनी मतांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार पाठवली होती.

हरियाणा मधील उमेदवार-
भाजप - कृष्ण पाल पंवार- 31
अपक्ष - कार्तिकेय शर्मा -
काँग्रेस - अजय माकन- पराभूत

-------------------------------------------
महाराष्ट्रात 6 जागांपैकी 3 भाजप तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 3 जागा भाजपला तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. भाजपने आपला तिसरा उमेदवार विजयी करत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीमध्‍ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. मविआ कडून संजय राऊत, प्रफुल्‍ल पटेल आणि कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी वियजी झाले आहेत. त्‍याचबरोबर भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. दरम्यान शिवसेनेच्‍या सुहास कांदे यांचे मत ग्राह्य न धरता बाकी मतांची मोजणी सुरु करण्‍याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेजची पाहणी केल्‍यानंतर सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले होते. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नसल्‍याचे व्हिडिओमध्‍ये स्‍पष्‍टपणे दिसते म्‍हणून आयोगाने कांदे यांचे मत ग्राह्य न धरता इतर मतांची मोजणी करण्‍याचे निर्देश दिले होते. त्यामुळे शिवसेनेच्या संजय राऊत यांना एक मत निर्धारित कोट्यापेक्षा कमी मिळाले. 

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मते
संजय राऊत- 41 (विजयी)
प्रफुल्ल पटेल- 43(2) (विजयी)
ईम्रान प्रतापगडी- 44(3) (विजयी)
संजय पवार- 33 (पराभूत)
भाजपच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीचे मते
अनिल बोंडे- 48 (7) (विजयी)
पियुष गोयल- 48 (7) (विजयी)
धनंजय महाडिक 27 (+14) (विजयी)

-------------------------------------------

असे आहे महाविकास आघाडीचे पक्षीय बालाबल-:

आघाडी + - 167
शिवसेना - 55; राष्ट्रवादी - 51 (दोन सदस्य तुरुंगात); काँग्रेस - 44
अपक्ष - 9 -किशोर जोरगेवार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भाईंदर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), आशिष जयस्वाल (रामटेक), संजय शिंदे (करमाळा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), मंजुळा गावित (साक्री), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ).
छोटे पक्ष - 8 - समाजवादी पार्टी - 2, प्रहार जनशक्ती पार्टी - 2, माकप - 1, शेकाप - 1, स्वाभिमानी पक्ष - 1, क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1

-------------------------------------------
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.