Tuesday 14 June 2022

पालिका निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्ये 8 जागांसाठी विधानपरिषद निवडणुका होणार

विधानपरिषद पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक; शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांचे वर्चस्व 

बीसी आरक्षणावरून लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर अखेर होणार असून त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या 8 जागांसाठी नोव्हेंबरमध्ये विधानपरिषद निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांच्या निकालावरून 8 विधानपरिषदेच्या जागांचे भवितव्य ठरणार आहे. ज्या राजकीय पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील अर्थात त्या पक्षाच्या प्रतिनिधी विधानपरिषदेवर वर्णी लागणार असल्याने काही इच्छुकांनी आतापासूनच व्यूहरचना आखणी सुरु केलेली आहे. राज्यातील 27 जिल्हा परिषदा, 20 महापालिका, 300 नगरपालिका तथा नगरपंचायती आणि 325 पंचायत समितींच्या निवडणूका आगामी काळात ऑक्टोबर पर्यंत होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 2 जागा सध्या रिक्त आहेत तर येत्या डिसेंबरमध्ये 6 जागांची मुदत संपुष्टात येणार असल्याने रिक्त जागा होणार आहेत. पालिकांच्या निवडणुकीनंतर या निवडणुका जाहीर होणार आहेत. विधानपरिषदेवरील स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारा निर्वाचित एकूण जागा 22 भरलेल्या 20 तर रिक्त 2 आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या भंडारा- गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था, जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था, यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था, नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था, सांगली - सातारा स्थानिक प्राधिकारी संस्था, पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था या डिसेंबरमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. तर ठाणे-पालघर अन्य 2 जागा यापूर्वीच रिक्त झालेल्या आहेत. दरम्यान गट-गण प्रभाग रचना नव्याने होऊन सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने पुणे जिल्ह्यातील विधानपरिषद मतदारसंघावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामीण भागातील मतदारांचा वर्चस्व व प्रभाव वाढणार आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत 698 इतके मतदार होते त्यामध्ये वाढ होऊन 923 इतके मतदारसंख्या होणार आहे त्यामुळे 225 सदस्यांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील महापालिकांचा या निवडणुकीतील प्रभाव कमी होऊन ग्रामीण भागातील मतदारांचे वर्चस्व वाढणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांची सदस्य संख्या 312 असून इतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सदस्य संख्या तसेच नगरपरिषदेची सदस्य संख्या 611 इतकी होणार आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद मतदारसंघावर ग्रामीण भागातील मतदारांचे वर्चस्व राहणार आहे. आगामी निवडणुकांवरून उमेदवार ठरणार असून शहर व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आतापासूनच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून गतवेळी माजी कार्यकारी शहराध्यक्ष अनिल भोसले या मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. विजयासाठी ३२६ मते आवश्यक असताना त्यांनी एकुण ६९८ मतांपैकी ४४० मते मिळवून विजय प्राप्त केला होता तर कॉंग्रेसचे व सध्याचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना ७१, भाजपच्या अशोक येनपुरे यांना १३३ आणि विलास लांडे 2 मतांवर समाधान मानावे लागले होते. आमदार अनिल भोसले यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. सध्या ते शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरव्यवहारप्रकरणी तसेच इडीच्या अटकेच्या कारवाईनंतर कारागृहात बंदिस्त आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात 8 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल केले असून नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्यामुळे त्यांचे राजकीय कारकीर्द संपुष्टात आलेली आहे. 
       दरम्यान आमदार अनिल भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी भाजप व राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत मात्र आगामी निवडणुकांच्या निकालानंतर बहुमतावर कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहील त्यावर या जागेवरील निवड अवलंबून राहणार असल्याने काहींनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून देखील व्यूहरचना केली जात असून पुणे पालिकेवर एकहाती सत्ता मिळाली तर या जागेवर विधानपरिषदेवर वर्णी लागेल अशी आशा त्यांना आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागांवर यश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  

अ.क्र.

स्थानिक स्वराज्य संस्था नाव

वर्ग

सदस्य संख्या

1

पुणे महानगरपालिका

173

2

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

139

3

बारामती नगरपरिषद

41

4

तळेगाव दाभाडे नगरपरिषद

28

5

चाकण नगरपरिषद

25

6

दौंड नगरपरिषद

26

7

लोणावळा नगरपरिषद

27

8

जुन्नर नगरपरिषद

20

9

शिरूर नगरपरिषद

24

10

भोर नगरपरिषद

19

11

आळंदी नगरपरिषद

21

12

राजगुरुनगर नगरपरिषद

21

13

इंदापूर नगरपरिषद

20

14

सासवड नगरपरिषद

22

15

जेजुरी नगरपरिषद

20

16

मंचर नगरपंचायत

 

17

17

माळेगाव नगरपंचायत

 

17

18

देहू नगरपंचायत

 

17

19

पुणे जिल्हा परिषद

 

82

20

बारामती पंचायत समिती

 

14

21

इंदापूर पंचायत समिती

 

18

22

दौंड पंचायत समिती

 

16

23

शिरूर पंचायत समिती

 

16

24

भोर पंचायत समिती

 

8

25

पुरंदर पंचायत समिती

 

10

26

हवेली पंचायत समिती

 

12

27

मावळ पंचायत समिती

 

12

28

मुळशी पंचायत समिती

 

8

29

आंबेगाव पंचायत समिती

 

10

30

खेड पंचायत समिती

 

18

31

जुन्नर पंचायत समिती

 

18

32

वेल्हे पंचायत समिती

 

4

33

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

बरखास्त

34

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

बरखास्त

35

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

बरखास्त

एकूण

923


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.