Wednesday 29 March 2023

भाजप खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन ; प्राब संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

भाजप खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन


भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. 
    भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसारमाध्यमांना गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आज दुख:द घटना घडली आहे. भाजपचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांचे काहीवेळापूर्वीच निधन झाले. गेले एक दीड वर्षे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. 
      भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी हा धक्का असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याची माहिती आज सकाळी समोर आली होती. बापट यांच्यावर सध्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्यामुले त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 
      गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेली अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. मात्र,गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. त्यांचा मतदारसंघातील वावर जवळपास संपला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपण बाजुला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्याला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. या परिस्थितीमध्येही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्यात गिरीश बापट यांना बोलताना प्रचंड धाप लागत होती. परंतु, इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी प्रचारात सहभाग दर्शवला होता. 
      नगरसेवक ते खासदारपदापर्यंत त्यांचा प्रवास हा थक्क करणारा राहिला आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात किंगमेकर अशी ओळख असणारे गिरीश बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी गिरीश बापट टेल्को कंपनीत कामगार म्हणून कामाला देखील होते. १९८३ ते २०२३ पर्यंत पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सक्रीय राहणारे गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार राहिले आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान बापट यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. २०१९ पासून ते पुणे लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी त्यांचे निकटचे संबंध होते. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवारांनी देखील ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या.
    राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांना बापटांच्या निधनानंतर भावना अनावर झाल्या. ते म्हणाले, राजकारण करताना गिरीश बापट यांच्या सारखी मैत्री करावी. या गढूळ राजकारणामध्ये गिरीश बापटांसारखी मैत्री ठेवावी. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले, खूप वाईट वाटले. राजकारणात गिरीश बापट आणि आम्ही अनेकदा एकत्र काम केले. गिरीश बापट यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय सलोख्याचे संबंध होते. केंद्रात मंत्रीपद मिळूनही त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. त्यांना आपल्या पदाचा कधीही गर्व आला नाही.
      मंत्री गिरीश महाजन म्हणाले, अतिशय जवळचा मित्र आज आपल्यातून गेले आहेत. गिरीश बापट अतिशय दिलखुसास असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने भाजप पक्षाची खूप मोठी हानी होती. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी लोकांशी संबंध कसे जोडायचे, हे आम्हाला शिकवले. या वर्षभरात त्यांना आम्ही 5 ते 6 वेळा भेटायला गेलो. मात्र, कधीही त्यांच्या चेहऱ्यावर त्रागा दिसला नाही, असे ते दिलखुसास व्यक्तिमत्त्व होते. गिरीश बापट यांचे कुटंब फार मोठे आहे. आम्ही सर्वजण या क्षणी त्यांच्या कुटुंबासोबत आहोत.
        भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले, दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.
     सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले.
    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, खा. गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने 'पुण्याची ताकद गिरीश बापट' ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरके झाले आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
     कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली की, त्यांना नगरसेवक आमदार आणि खासदार हा मोठा राजकीय प्रवास पुणे शहराला लाभला. त्यांनी काम करताना समविचारी सर्वांना सोबत घेऊन काम केले. धंगेकर म्हणाले की, मागच्या आठवड्यात खासदार निधीतून कसबा गणपती मंदीरात भित्तीचित्र केलं आणि त्याच्या कार्यक्रमाला त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. राजकीय स्तर कसा टिकवायचा हे गिरीश बापट साहेबांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मी विधानसभेत काम करेल.
     गिरीश बापट हे आपल्या दांडग्या जनसंपर्कासाठी ओळखले जात. आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा अजूनही दबदबा होता.
     1995 मध्ये गिरीश बापट यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट मिळाले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.
 प्राब संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.