Monday 13 March 2023

Pune APMC Election 2023; Haveli Market Committee; हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतांचा भाव फुटला!

अधिकृत पॅनेल पेक्षा बंडखोरीला वरिष्ठांचीच फूस! राष्ट्रवादीच्याच गटांमध्ये चुरस; भाजपच्या गोटात शांतता

पुणे- हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक तब्बल दोन तपानंतर होत आहे. त्यामुळे यानिवडणुकीत संचालक पदासाठी इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असून प्रारूप यादीनुसार संबंधित मतदारांच्या इच्छुकांच्या भेटीगाठींमुळे मतांचा भाव वधारला असून किमान 50 हजार इतका मतांचा भाव  फुटला आहे. 
      दरम्यान पुणे जिल्ह्यातील कृषी सोसायटी व ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याने मोठ्याप्रमाणावर जुनी-जाणती जेष्ठ पदाधिकारी व युवा कार्यकर्ते संचालक पदासाठी तीव्र इच्छुक आहेत. पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अधिक चुरस असलेल्या जागेवर मैत्रीपूर्ण लढतीच्या नावे अ वर्ग मतदारांची चांदी होऊन 'जो जिता वही सिकंदर' प्रमाणे 'निवडून येईल तो पक्षाचा उमेदवार' असा पवित्रा पक्षाच्या वरिष्ठांनी घेतला त्याच प्रमाणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूकीत देखील घेतला जाणार आहे हे गृहीत धरूनच इच्छुकांकडून प्रचाराची धामधूम सूरु असल्याने मतांचा भाव देखील फुटला आहे. अधिकृत पॅनेल पेक्षा बंडखोरीला वरिष्ठांचीच फूस असल्याची इच्छुकांकडून मतदारांमध्ये बिंबवले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीच्याच गटांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले तरी भाजपच्या गोटात मात्र शांतता दिसून येत आहे. भाजप या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे देखील अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. 
      हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने आर्थिक लाभाचे प्रमाणही मोठ्याप्रमाणावर असल्याने या-ना-त्या कारणाने तब्बल 18 वर्ष निवडणूक टाळण्यात प्रशासकीय बाबू यशस्वी झाले होते. निवडणूक रखडण्यामागे या बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळामध्ये एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, न्यायालयामध्ये वाद, राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे, यातून हवेली बाजार समितीचे संचालक बोर्ड बरखास्त करण्यात आले. ही संस्था हवेली तालुक्यापुरतीच ठेवायची का? पुणे जिल्ह्यात पुरती मर्यादित ठेवायची? त्याला राज्यस्तरीय दर्जा द्यायचा का? राज्यस्तरावर निवडणूक घ्यायची तसेच अनेक विद्वान लोक यासंदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते अजूनही आहेत. शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समितीची निवडणूक ही २९ एप्रिल २०२३ रोजी घेणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूक पार पडत आहे. 
     दोन तपानंतर होत असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून जाण्यात अनेक राजकीय पदाधिकारी इच्छुक आहेत. राजकारणातील ज्येष्ठ आणि तरुण अशा दोन्ही पिढ्या बाजार समितीची निवडणुकीसाठी थांबलेले आहेत. त्यामुळेच या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांकडून पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता प्रचारात सक्रियता दर्शवली आहे. संपूर्ण जिल्ह्याची मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणीच होत असते. यामुळे सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
     आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती साठी १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी सोसायटी मधून ११ जागांसाठी एक हजार ६५५ मतदार, ग्रामपंचायतमधून चार जागांसाठी ७१३ मतदार, व्यापारीमधून दोन जागांसाठी १३ हजार १७० मतदार तर कामगार हमाल मापाडीमधून एका जागेसाठी एक हजार ७८० मतदार असणार आहेत.
      १५ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या बैठका होत आहेत मात्र भाजपकडून सक्रीय हालचाली दिसून येत नाहीत. अनेक वर्षांनी होणाऱ्या सहकारातील प्रतिष्ठित असणारी ही निवडणूक हवेली तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लावणारी असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून यात १८ जागांसाठी १७ हजार ४१९ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  
     महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीचा कारभार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांच्यामधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचे सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो. बाजार समितीच्या सध्याच्या निवडणूक पद्धतीत कार्यक्षेत्रातील सेवा संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्यांकडून ११ व ग्रामपंचायत सदस्यांकडून ४ असे १५ शेतकरी प्रतिनिधी निवडले जातात. शिवाय व्यापारी २ व हमाल, मापाडी १ असे एकूण १८ प्रतिनिधी निवडून दिले जातात. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांमध्ये सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय १ तर भटक्या जातीजमाती १ अशी विभागणी असते.
    या निवडणुकीत विविध गटातील १८ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १८ पैकी ११ उमेदवार हवेली तालुक्‍यातील विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांच्या मतदानातून निवडले जाणार आहेत. यासाठी १३४ सोसायटीचे १ हजार ६५५ सदस्य मतदान करणार आहेत. ४ उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. हवेली तालुक्‍यातील ७१ ग्रामपंचायतीचे ७१३ सदस्य मतदान करणार आहेत. २ व्यापारी प्रतिनिधी आणि १ हमाल, तोलणार प्रतिनिधी असणार आहे. व्यापार प्रतिनिधींसाठी १३ हजार १७३ जण मतदान करणार आहेत. हमाल, तोलणार प्रतिनिधीसाठी १ हजार ५४९ हमाल आणि ३२९ तोलणार मतदान करणार आहेत.

बाजार समिती निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जाहीर-: २७ मार्च, 
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत-: २७ मार्च ते ३ एप्रिल, 
उमेदवारी अर्जांची छाननी-: ५ एप्रिल, 
वैध उमेदवारी अर्जांची यादी-: ६ एप्रिल, 
अर्ज माघारीची मुदत-: ६ ते २० एप्रिल, 
अंतिम यादी आणि चिन्हवाटप-: २१ एप्रिल, 
मतदान-: २९ एप्रिल
मतमोजणी व निकाल-: ३० एप्रिल.


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

Pune APMC Election 2023 – Haveli Market Committee | हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतांचा ‘भाव’ फुटला!
By namratasandbhor -March 13, 2023

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.