Monday 31 July 2023

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी डॉ. भुजबळ यांनी योगदान द्यावे-राजेंद्र घाडगे

आजही समाजामध्ये शिक्षकाला मानाचे स्थान- डॉ. दिगंबर दुर्गाडे




पुणे- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अभ्यासक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षक प्रशिक्षण आणि विकास याकरीता डॉ. नामदेव भुजबळ व प्रा. मंगेश देशपांडे यांनी संस्थेसाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी केले. ते अण्णासाहेब मगर महाविद्यालयात डॉ. भुजबळ व प्रा. देशपांडे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी बोलत होते.

    पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात डॉ. नामदेव भुजबळ व प्रा. मंगेश देशपांडे यांचा सेवापूर्ती गौरव नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्ताने सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, माजी नगरसेवक शिवाजीराव पवार यांच्या हस्ते डॉ. भुजबळ व प्रा. देशपांडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ, मानपत्र व संपूर्ण पोशाख असे सत्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी नगरसेवक शिवाजीराव पवार, शास्त्रज्ञ जयंत टिळेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. व्ही. एन. शिंदे, डॉ. नेहा पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेतर सेवक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

    पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी पूर्वनियोजित सकाळी 11 वाजता वेळेचा सेवापूर्ती गौरव कार्यक्रम अचानकपणे अन्य कारणाने सकाळी 10 वाजता घेण्याची सूचना केली होती मात्र त्यांना वेळेत उपस्थिती दर्शवता न आल्याने त्यांनी उपस्थितांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त केली. सेवापूर्ती निमित्त डॉ. नामदेव भुजबळ व प्रा. मंगेश देशपांडे यांचा गौरव करून त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले आणि सेवानिवृत्ती नंतरही त्यांनी कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संस्थेला योगदान द्यावे असे आवाहन देखील केले. पुढे ते म्हणाले की, आजपर्यंत मी अनेक सेवापूर्ती गौरव कार्यक्रम पहिले मात्र आगळावेगळा पहिलाच हा कार्यक्रम मी पाहत आहे. डॉ. नामदेव भुजबळ व प्रा. मंगेश देशपांडे यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचे स्वागतासाठी पाच मजले फुलांचा वर्षाव करून सभागृह आकर्षक सजावटीमुळे मी प्रभावित झालो असल्याचे त्यांनी विषद करून आयोजकांचे कौतुक केले. 

    डॉ. भुजबळ व प्रा. देशपांडे यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानुन प्रामाणिकपणे कार्य केले. यापुढे त्यांनी कुटुंबासाठी वेळ देत आंनदी आयुष्य व्यथित करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.

   गुरूला आपल्याकडे महत्त्वाचे स्थान असते. आपण आयुष्यभर जे काम करतो त्याचा गौरव अशा कार्यक्रमात होत असतो असे मत व्यक्त करून डॉ. भुजबळ व प्रा. देशपांडे यांना माजी नगरसेवक शिवाजीराव पवार यांनी शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. नामदेव भुजबळ यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या आजपर्यंतच्या सेवापुर्तीतून अनेक विद्यार्धी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या त्यांच्या या योगदानाचे आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे असे त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

     पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी याप्रसंगी डॉ. भुजबळ व प्रा. देशपांडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. दिगंबर दुर्गाडे या प्रसंगी पुढे म्हणाले की, आजही समाजामध्ये शिक्षकाला मानाचे स्थान असून शिक्षकांकडून समाजाच्या आदर्श अपेक्षा आहेत. शिक्षक हा समाजाच्या उन्नतीसाठी झटत असतो. डॉ. भुजबळ व प्रा. देशपांडे यांनी आयुष्यभर समाजहित डोळ्यासमोर ठेऊन काम केले. यापूर्वीच्या वक्त्यांनी डॉ. भुजबळ प्रसंगी कडक स्वभावाचे असल्याचा धागा पकडून डॉ. दुर्गाडे म्हणले की, मी त्यांना शालेय जीवनापासून ओळखत आहे मात्र त्यांचा कडक पणा आमच्या वाट्याला कधीही आलेला नाही मेनाचा मुलायमपणाच वाट्याला आला. डॉ. नामदेव भुजबळ कधीही कोणाला रागावले असले तरी क्षणिकच त्यानंतर हळवेपणाने समजून घेणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे हे सर्वाना परिचित आहे असे सांगून त्यांच्या स्वभावाचे कौतुक केले. 

    पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात डॉ. नामदेव भुजबळ व प्रा. मंगेश देशपांडे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात प्रा. मंगेश देशपांडे यांच्या कन्या व सौभाग्यवती पत्नीने मनोगत व्यक्त करून त्यांच्या कामाप्रती योगदानाची व शिस्तीचे अनुभव कथन केले. उत्तम शिक्षक, परिपूर्ण कर्तव्यदक्ष पती व वडील, नोकरी सांभाळून कुटुंबातील योग्य रीतीने जबाबदारी कशी पार पडली व अडचणींवर मात कशाप्रकारे केली याबाबत त्यांनी उदाहरणे देऊन भावना व्यक्त केल्या त्यामुळे प्रा. मंगेश देशपांडे भावनाविवश झाले.

    डॉ. नामदेव भुजबळ यांच्या सौभाग्यवती विद्या भुजबळ यांनी वेळेअभावी थोडक्यात डॉ. नामदेव भुजबळ यांच्या सहजीवनाचा प्रवास उलगडून सांगितला. त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पाठिंब्यामुळे मला उच्च शिक्षण घेता आले आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे देशपातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन बक्षिसे प्राप्त करता आली. सौ. विद्या भुजबळ यांनी भावना व्यक्त करताना पुढे म्हणाल्या की, माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबाफुले यांच्या प्रमाणेच त्यांनी मला साथ दिली असल्याचे सांगून नोकरी सांभाळून कुटुंबीयांच्या सर्व जबाबदारी योग्य रीतीने पार पाडल्याचे विषद करून त्यांनी मला कधीही पगार किती आहे याची विचारणा केलेली नाही, आणि मी त्यांना कधीही कोणाला किती मदत केली अथवा खर्चाचा लेखाजोखा कधीही विचारला नाही अशा मनमोकळ्या स्वभावामुळे आमचे सहजीवन बहरले असल्याच्या भावना व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

     प्रा. मंगेश देशपांडे यांनी सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी बोलताना सर्वांचे आभार मानले. संस्थेतील अध्यापन कार्य करतानाचे अनुभव सांगितले व कुटुंबीयांचे देखील सहकार्य किती असते त्याचे महत्व सांगून विज्ञान विषयक संशोधनात्मक संदर्भ पुस्तकांचा संच यावेळी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला भेट दिल्याचे जाहीर केले.  

     प्रा. शहा आणि प्रा. प्रितम रमेश ओव्हाळ यांनी देखील डॉ. नामदेव भुजबळ व प्रा. मंगेश देशपांडे यांच्या कार्याचे व अनुभवाचे कथन करून भावना व्यक्त केल्या. तसेच चतुर्थश्रेणी गटातून प्रतिनिधित्व करून सर्वांच्या वतीने लायब्ररी असिस्टंट चंदू मामा यांनी सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी डॉ. नामदेव भुजबळ व प्रा. मंगेश देशपांडे यांना शुभेच्छा दिल्या व डॉ. नामदेव भुजबळ यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाती धर्माचा कोणताही भेदभाव न करता शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात दिला अशा अनेक प्रसंगाचे अनुभव त्यांनी सांगितले. त्यांनी आपले पदाचा गर्व कधीही केला नाही प्रसंगी कोणत्याही आव्हानात्मक कामांना ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत याचे प्रसंग देखील सांगितले. शांतताप्रिय व शिस्तीच्या स्वभावाचे डॉ. नामदेव भुजबळ सर कसे कठोर व आक्रमक आहेत याचे देखील त्यांनी जुन्या काळातील ओतूर येथील अनुभव विशद करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी डॉ. भुजबळ व प्रा. देशपांडे यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.     

    प्रा. डॉ. नामदेव भुजबळ सर यांनी सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त करून संस्थेतील गेल्या ३७ वर्षाच्या कालावधीतील अध्यापन कार्य करतानाचे अनुभव विषद करून सांगितले. सर्वप्रथम पदावर रुजू झालो तेव्हापासून संस्थेने मला आव्हानात्मक कार्यांची जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचे सांगून सर्व सहकारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. अध्यापन कार्याच्या ३७ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत 40 हून अधिक पीएचडी धारक विद्यार्थ्यांचा लेखाजोखा त्यांनी उपस्थितांना उलगडून सांगितला. निवृत्तीनंतर देखील आयुष्यातील राहिलेले छंद व कार्यपूर्ती करण्याचा संकल्प असल्याचे सांगून मी निरंतरपणे समाजासाठी कार्यरत राहील आणि त्यासाठी यापुढील काळातही सर्वांचे प्रेम व साथ, सहकार्य मला लाभो असे आवाहन करून गौरव समारंभाकरीता सर्व संस्था पदाधिकारी व अण्णासाहेब मगर महाविद्यालयालातील प्राध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, कर्मचारी यांचे आभार मानले. 

     सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. व्ही. एन. शिंदे, डॉ. नेहा पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेतर सेवक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन डॉ. शुभांगी औटी व डॉ. शैलजा धोत्रे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी आभार मानले.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.