Saturday 28 July 2018

डिसेंबरमध्ये धुळे व अहमदनगर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका!

धुळे, नंदुरबार, अकोला व वाशिम या 4 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 23 पंचायत समित्यांच्या निवडणूका - नोव्हेंबर २०१८ मध्ये होणार!


धुळे व अहमदनगर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्याची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, अकोला व वाशिम या 4 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 23 पंचायत समित्यांच्या निवडणूका देखील नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस या निवडणुका घेण्याची शक्यता आहे. धुळे व अहमदनगर महापालिकांची मुदत २९ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. सार्वत्रिक निवडणूक तरतुदीनुसार तत्पूर्वी घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रभाग रचना करण्याचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने दि २७ जुलै २०१८ रोजी जाहीर केले आहे. ही सर्व प्रक्रीया 1 आक्टोंबर २०१८ पर्यंत पूर्ण करावयाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या महापालिकांमध्ये प्रथमच 4 सदस्यांचा प्रभाग असे बहुसदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करण्यात येणार आहे. 
    धुळे, नंदुरबार, अकोला व वाशिम या 4 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 23 पंचायत समित्यांच्या निवडणूका-2018 साठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्याचा कार्यक्रमाचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने दि २७ जुलै २०१८ रोजी जाहीर केले आहे. ही सर्व प्रक्रीया २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करावयाचे आदेश देण्यात आले आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला व वाशिम या 4 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 23 पंचायत समित्यांची मुदत अनुक्रमे २९ डिसेंबर २०१८ व २७ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. सार्वत्रिक निवडणूक तरतुदीनुसार तत्पूर्वी घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रभाग रचना करण्याचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने दि २७ जुलै २०१८ रोजी जाहीर केले आहे. मागील सार्वत्रिक निवडणूक २०१३ मध्ये १९ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात आली होती तर १५ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता आरक्षित प्रभागांसह) तयार करणे, १३ ऑगस्ट पर्यंत तो तपासून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे, त्यानंतर १८ ऑगस्ट पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावास मान्यता देईल. २१ ऑगस्ट रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला राखीव साठी सोडत काढण्यासाठी नोटीस प्रसिद्ध केली जाईल २४ ऑगस्ट रोजी त्याची जाहिर सोडत काढली जाईल. २७ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचनेची (सोडतीनंतरची) अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध होईल. २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या जातील. १५ सप्टेंबर पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. २८ सप्टेंबर पर्यंत राज्य निवडणूक आयोग प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून निर्णय देईल. १ ऑक्टोबर पर्यंत महापालिका आयुक्त सुनावणी नंतर झालेल्या निर्णयानुसार प्रभाग रचनेच्या अधिसूचना व नकाशामध्ये योग्य ते बदल करून प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करतील. महापालिकेच्या अधिनियमाच्या कलम ५ मध्ये दुरुस्ती करण्यात आली असल्याने एक सदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन जास्तीत जास्त प्रभाग ४ सदस्यांचे असतील. सर्व प्रभाग ४ सदस्यांचे होत नसल्यास १ प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा होईल अथवा २ प्रभाग ३ सदस्यांचे होतील. तसेच आरक्षण निश्चिती चक्रानुक्रमानुसार करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.  


अहमदनगर महापालिका प्रभागांची संख्या १७ होणार


अहमदनगर महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना (वॉर्ड रचना) करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या सात ऑगस्टला प्रारूप प्रभागर चना जाहीर होणार असून, त्यातील विविध आरक्षणे, हरकती-सुनावणी प्रक्रियेनंतर एक ऑक्टोबरला ती अंतिम होणार आहे. प्रत्येक वॉर्डातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे असल्याने वॉर्डांची संख्याही कमी होऊन १७ होणार आहे. २००३ मध्ये स्थापन झालेल्या नगर महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सध्याच्या महापालिकेतील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मुदत २९ डिसेंबर २०१८ ला संपणार असल्याने त्याआधी निवडणूक आवश्यक आहे. एक ऑक्टोबर २०१८ ला प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर ४५ दिवस मुदतीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. तो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. ३० जून २००३ रोजी अहमदनगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्याचवर्षी डिसेंबरला पहिली निवडणूक झाली. त्यात सर्वाधिक जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेचा पहिला महापौर झाला. त्यानंतर सत्ताधारी गटात फाटाफूट झाल्याने या पंचवार्षिकमधील दुसरे महापौरपद काँग्रेसने मिळवले. २००८ मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतही युती बहुमताच्या जवळ पोचली होती. पण पुन्हा फोडाफोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर झाला; मात्र, झालेली फोडाफोडी जुळवून या पंचवार्षिकचे दुसरे महापौरपद शिवसेनेने पुन्हा मिळवले. २०१३ मध्ये झालेल्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत युती व काँग्रेस आघाडीला संमिश्र यश मिळाल्याने घोडेबाजार रंगला. यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून महापौरपद मिळवले. पण दुसऱ्या टप्प्यात असाच घोडेबाजार युतीनेही रंगवून पुन्हा शिवसेनेने महापौरपद मिळवले. मागील १५ वर्षांत ७ महापौर झाले असून, त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन तर काँग्रेसचा एक महापौर झाला आहे. भाजपला अजून एकदाही हे पद भूषविता आलेले नाही. त्यामुळे चौथ्या निवडणुकीत यश मिळवण्याची चुरस शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप व काँग्रेस यांच्यातच असणार आहे.

सध्याचे पक्षीय बलाबल- अहमदनगर महापालिका 

एकूण जागा - 68
भाजप-9
राष्ट्रवादी 18
कॉंग्रेस-11
शिवसेना-17
मनसे 4


धुळे मनपा निवडणुकीत ३९ हजार मतदारांची भर


धुळे शहर हद्दवाढीमुळे धुळे महापालिकेच्या निवडणुकीत ३९ हजार मतदारांची भर पडणार आहे़ नगाव वगळता हद्दवाढीतील १० गावांमधून हे मतदार वाढणार असून त्यामुळे नगरसेवक सदस्य संखेत ५ ने वाढ होईल. शहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारीपासून लागू करण्यात आली. त्यामुळे ११ गावांचा धुळे महापालिका क्षेत्रात समावेश झाला आहे़ पूर्वी शहराचे क्षेत्रफळ ४६़४६ चौ.कि.मी. इतके होते. त्यात हद्दवाढीमुळे ५४़६२ चौ.कि.मी. क्षेत्राची वाढ झाली आहे़ त्यामुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ १०१़०८ चौ.कि.मी. झाले आहे़  त्यामुळे शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे़ शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांमधील एकूण ३९ हजार ९० मतदार महापालिका निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत़ नगाव वगळता उर्वरित १० गावांमधील मतदारांना प्रथमच महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार आहे़ त्यात सर्वाधिक मतदार संख्या १७ हजार ३२७ वलवाड, तर सर्वात कमी ८४५ मतदार अवधान गावातून वाढणार आहेत़ मतदानाचा हक्क १८ वर्षे वयाची अट पूर्ण केल्यानंतर मिळत असल्याने त्याखालील लोकसंख्या लक्षात घेतल्यास संबंधित गावांची प्रत्यक्ष लोकसंख्या मतदार संख्येपेक्षा अधिक असली तरी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संख्येवरच सर्वाधिक राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत़ वाढीव मतदार संख्येचा फायदा केवळ मनपा निवडणुकीत होणार आहे. शहराची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार असून २०११ च्या जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार ५५९ इतकी आहे़ त्यात १ लाख ९३ हजार ४४६ पुरुष व १ लाख ८२ हजार ११३ स्त्रियांचा समावेश आहे़. शहर हद्दवाढीतील गावांमधील मतदार धुळे मनपा निवडणुकीत मतदान करू शकणार असले तरी ते धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मतदान करू शकणार नाही़ त्यांचा विधानसभा मतदारसंघच धुळे ग्रामीण असेल़ नगाव गावातील गावठाण भाग मनपा क्षेत्रात सहभागी झाला असल्याने या गावाचे नागरिक मनपा निवडणुकीत मतदान करू शकणार नाही़. शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या १० गावांमधील मतदार मनपा निवडणुकीत मतदान करणार असल्याने येत्या काळात संबंधित गावांमध्येदेखील सोयी-सुविधा पुरविण्याचे आव्हान विद्यमान नगरसेवक व इच्छुकांना करावे लागणार आहे़ हद्दवाढीमुळे नगरसेवकांची संख्या ५ ने वाढण्याची शक्यता असली तरी त्याबाबतची स्पष्टता प्रभाग रचनेनंतरच होणार आहे़.

धुळे महापालिका - मुदत संपण्याचा कालावधी- डिसेंबर 2018

सध्याचे पक्षीय बलाबल

एकूण जागा- 70
भाजप-3
राष्ट्रवादी - 34
कॉंग्रेस-10
शिवसेना-11
बीएसपी-1



राजकीय सद्यस्थिती


धुळे जिल्हा परिषद (२०१३)
एकूण जागा ५६
काँग्रेस  ३०
भाजप १३
राष्ट्रवादी काँग्रेस ७
शिवसेना २
अपक्ष १

नंदूरबार जिल्हा परिषद (२०१३)
एकूण जागा ५५
काँग्रेस २९
राष्ट्रवादी काँग्रेस २५
भाजप १



चंद्रकांत भुजबळ

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे











चंद्रकांत भुजबळ

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.