Thursday, 23 June 2022

हिंदुत्व, विकासकामांचा बहाणा; पदाचा लोभ सर्वांनाच; बंडखोर मंत्र्यांकडून राजीनामा देण्यास अनुउत्सुकता!

आसाममध्ये राजकीय पर्यटन; राज्याबाहेरील बंडखोरांचे शक्तिप्रदर्शन एक मनोरंजन!

साममध्ये राजकीय पर्यटनाने वेग घेतला असून गुवाहाटीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनले आहे. गुवाहाटीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने विमानाचे तिकीट देखील महाग झाले आहेत. राज्याबाहेरील बंडखोरांचे शक्तिप्रदर्शन हे मनोरंजनाचा भाग असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. बंडखोरांनी राज्यघटनेनुसार घटनात्मक सभागृहात शक्तिप्रदर्शन करणे अभिप्रेत आहे. आसाममधील गुवाहाटीत शक्तिप्रदर्शन करून बंडखोरांना नेमके कोणत्या राज्यातील सरकारमध्ये वाटा पाहिजे अशास्वरूपाच्या देखील प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. दरम्यान बंडखोर मंत्र्यांकडून राजीनामा देण्यास अनुउत्सुकता दर्शवली जात असून अद्यापपर्यंत मंत्रीपदाचा राजीनामा का दिला जात नाही याचेही कुतुहूल महाराष्ट्रातील जनतेला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील विशेषतः शिवसेनेचे 5 मंत्री व अपक्ष मंत्री बंडखोरी करूनही पदाचा राजीनामा देत नाहीत. नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपपान भुमरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृह (ग्रामीण), अर्थ, नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले अपक्ष आमदार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू हे मंत्री राज्याबाहेर मुख्यमंत्री यांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत आहेत मात्र आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत. बंडखोरांना मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री यांच्याकडेच द्यावा लागेल परस्पर राज्यपालांकडे देता येणार नाही. मुख्यमंत्री राजीनामा स्विकारून राज्यपालांकडे पाठवतात व राज्यपाल अंतिम मंजुरी देतात मात्र बंडखोर राजीनामा देण्यास अनुउत्सुक आहेत. हिंदुत्व, मतदारसंघातील विकासकामांचा अडसर आणि अनैसर्गिक आघाडी या कारणांचा बंडखोरांकडून बहाणा केला जात असून राजकीय महत्वाकांक्षा पूर्ततेसाठी, सत्तेतील पदाच्या लोभापाई बंड असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला कळत नाही असे समजणारे मूर्खांच्या नंदनवनात बागडत आहेत अशा देखील प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले मंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांचा आकडा काही वृत्तवाहिन्या शेअरबाजारातील निर्देशांकानुसार क्षणोक्षणी वाढत असल्याचे दर्शवित आहेत. प्रत्यक्षात अपक्ष आमदारांची संख्या वगळता 37 संख्याबळ अद्यापपर्यंत गाठता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि राज्याबाहेर संख्याबळ दर्शवून व शक्तीप्रदर्शन केल्याने मुख्यमंत्री स्वतःहून पदाचा राजीनामा देणार नाहीत त्यामुळे राज्याबाहेरील बंडखोरांचे निरर्थक शक्तिप्रदर्शन एक मनोरंजनाचा भाग होत आहे. शिवसेना पक्ष व चिन्ह बंडखोर गटाकडे जाणार अशा कपोलकल्पित वृतांकन काही वृत्तवाहिन्या टीआरपी वाढीसाठी करीत आहेत. वास्तविकता आणि घटनात्मकदृष्ट्या नियमांचा कोणताही आधार मानला जात नाही. एखाद्या राज्यात अशा प्रकारचा पेच निर्माण झाल्यास त्या परिस्थिती काय करता येऊ शकते यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १९९४ आणि २००६ साली दिलेले निर्णय महत्त्वाचे ठरतात. सरकारसोबत बहुमत आहे का हे तपासण्यासाठी राज्यपालांकडे एकमेव मार्ग आहे तो म्हणजे सभागृहात बहुमत सिद्ध करायला लावणे. राजभवनात बसून एखाद्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येवरून हा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने वारंवार निकालात म्हटले आहे. एस.आर बोम्मई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सदस्यीय खंडपीठाने राज्यपालांच्या विशेषाधिकारांवर मर्यादा घातल्या होत्या. सरकारने बहुमत गमावले आहे का हा राज्यपालांनी ठरवण्याचा विषय नाही. त्याचा निर्णय सभागृहात झाला पाहिजे. संविधानानुसार लोकशाही तत्वाचा अर्थ असा होतो की या प्रश्नाचे उत्तर सभागृहात मिळाले पाहिजे. राज्यपालांनी हा निर्णय स्वत:च्या पातळीवर घेता कामा नये. तर रामेश्वर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यी खंडपीठाने २००६ साली म्हटले होते की, जर एखादा राजकीय पक्ष अन्य एखाद्या पक्षाच्या किंवा आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करत असेल आणि त्यामुळे स्थिर सरकार येत असेल तर राज्यपाल त्याला नकार देऊ शकत नाहीत. फक्त यासाठी त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागले. राज्यपालांकडे असे कोणतेही अधिकार नाही जे बहुमताच्या नियमाविरुद्ध असतील. याचा अर्थ जर महाविकास आघाडीने बहुमत गमावले तर त्याचा अर्थ विधानसभा विसर्जित करून पुन्हा नव्याने निवडणूक लढवण्याच्या पर्यायाशिवाय अजून एक पर्याय आहे. विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस ते फेटाळून लावू शकतात आणि अन्य पक्ष बहुमत सिद्ध करू शकतात ही शक्यता तपासून पाहू शकतात. महाराष्ट्रात २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ३ प्रमुख पक्षांसह अपक्ष व छोटे घटक पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सरकारचे बहुमत गमावत आहे. शिंदे यांच्याकडे स्वतंत्र गट निर्माण करण्याएवढे आमदार असतील तर प्रथम त्यांना पक्षांतर बंदी कायदा मधील तरतुदीनुसार संख्याबळ विधिमंडळात सिद्ध करावे लागेल. त्या गटाला मान्यता घ्यावी लागेल नंतर ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात. एकनाथ शिंदेंसोबत ४२ आमदार असल्याचा दावा आहे पण त्यातील ७ आमदार अपक्ष, म्हणजेच शिंदे गटात सध्या तरी ३५ आमदार आहेत असे छायाचित्रवरून दिसून येत आहे. वास्तविकपणे विधिमंडळ सभागृहात व राज्यपालांच्या समोर प्रत्यक्ष ओळखपरेड मध्ये छायाचित्रातील कीती उरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपने यापूर्वी निव्वळ कागदपत्रांवरील आकडेमोडीवरून फसलेल्या बंडाचा अनुभव पाहता घाई न करता शिवसेनेतील बंड पूर्णत्वास गेल्यावरच प्रत्यक्षात उघड राजकीय डावपेच टाकायचे तोपर्यंत पडद्याआड बंडखोरांना उत्तेजन द्यायचे ठरवलेले दिसून येत आहे. राज्यातील सत्तेच्या साठेमारीच्या मनोरंजनाच्या कहाण्या राज्यातील जनता वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून उपभोगत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल महोदयांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे बंडखोरांच्या कायदेशीररीत्या हालचालींवर देखील मर्यादा आलेल्या आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी व बंडखोरांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी काही आमदार सामील झाल्याचे देखील माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार मधील कॉंग्रेस व राष्ट्रवादी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. पुढील सर्व कायदेशीरदृष्ट्या राजकीय डावपेचांना सामोरे जाण्याची तयारी केली जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षावर बंडखोरांचा ताबा मिळवण्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे कारण एकतर पक्षातून पक्षांतर (बंडखोरी) करण्यासाठी दोन तृतीयांश संख्या पाहिजे ती अद्यापपर्यंत जुळलेली नाही आणि 37 संख्या झाली तरी विधिमंडळ सभागृहात सभापती व राज्यपालांच्या समोर प्रत्यक्षात हजेरी व लेखी निवेदन देऊन स्वतंत्र गटाला मान्यता मिळवून घेतली पाहिजे. जरी स्वतंत्र गटाला मान्यता मिळवली तरी त्या गटाला मूळ शिवसेनेचे चिन्ह अथवा पक्ष त्यांचा होतो असे नाही. मूळ पक्षावर दावा करण्यासाठी त्यांच्या पॅरेन्ट्स पार्टीमध्ये फुट पडायला हवी. यामध्ये ऑफिस बेरर, पक्षाचे प्रतिनिधी, लोक प्रतिनिधी यामध्ये फुट झाली असेल तर त्या पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह मिळू शकते. सुप्रीम कोर्टाने एका निकालात या बाबी स्पष्ट केल्या आहेत. फक्त विधिमंडळ पक्षात नाही तर मूळ पक्षात फुट पडायला हवी तरच पक्षाच्या अधिकृत नावावर आणि चिन्हावर दावा करता येऊ शकतो. मूळ गट कितीही छोटा असला आणि बाहेर पडलेला गट कितीही मोठा असला तरी पक्षाचे नाव आणि चिन्हं मूळ गटाकडेच राहते अशी वस्तुस्थिती असताना शिवसेना पक्षावर दावा वगेरे बंडखोरांच्या नावाने अतिशयोक्ती केली जात आहे. जसे राज्याबाहेर बंडखोरांनी शक्तिप्रदर्शन केले अथवा आमदारांना डांबून ठेवले म्हणून सरकार पडणार नाही कारण तसे असते तर मुख्यमंत्र्यांनी केव्हाच स्वतःहून राजीनामा दिला असता. त्यामुळे सहजपणे महाविकास आघाडी सरकार कोसळेल अशी शक्यता तूर्तास तरी नाही. अजून 3-4 दिवसांत राजकीय चित्र स्पष्ट होईल असे वाटते. विधिमंडळातील शक्तिप्रदर्शनातील अखेरच्या क्षणापर्यंत थांबा व वाट पाहण्याचे धोरण भाजप प्रमाणे महाविकास आघाडीच्या पक्षांनी देखील स्वीकारले आहे. 'शिवसेना बंडखोरांना शिवसेनेच्या भल्यासाठी मुख्यमंत्री पदी ठाकरे नकोत तर फडणवीस हवेत!'....'इडीची क्लीनचीट हवी तर बंडात सामील व्हा!' अशास्वरूपाचे गंमतीदार किस्से देखील सोशल मिडीयावर दिसून येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील पॉलिटिकल ड्रामा अजून काही दिवस सुरु राहील आणि मनसोक्त मनोरंजनाचा जनतेला आस्वाद मिळेल. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

Tuesday, 21 June 2022

मतांची फाटाफूट; शिवसेनेत बंड; महाविकास आघाडी सरकार धोक्यात!

बंडखोरांच्या जिवावर सरकार स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न! 

राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेनेसह आघाडीतील घटकपक्षांच्या मतांची फाटाफूट होऊन पाचवा उमेदवार जिंकल्याने भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. शिवसेना नेते व मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत नाराजीचा बांध फुटून 20 हून अधिक नाराज आमदारांना सुरतेकडे रवाना होऊन बंड केले आहे. भल्या पहाटेचे फसलेले बंडाच्या पार्श्वभूमीवर भाजपने यावेळी चांगली तयारी केली असून बंडखोरांच्या जिवावर राज्यात सरकार स्थापन करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना वेग आलेला आहे. महाराष्ट्रासह गुजरातमधील सुरत, अहमदाबाद आणि दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मध्येही काही आमदार पक्षांतर्गत नाराजी असून सर्व काही अलबेल नाही. मतांची फाटाफूट झाल्याने कॉंग्रेस मध्ये पक्षांतर्गत गटबाजीत नाराजी आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण करण्यास भाजपला यश आले आहे मात्र सरकार स्थापन करण्याची भाजप अतिघाई करीत आहे याचा फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसेल काय? आणि त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसतील काय? यावर देखील खल केला जात आहे. महाविकास आघाडी सरकार आपोआप कोसळेल असे वक्तव्य करणारे भाजपचे नेतेच सरकार पाडण्यासाठी सर्व तऱ्हेने प्रयत्नशील आहेत असा संदेश सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोहोचला जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व कॉंग्रेस पक्षातील नेत्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रभाव सत्तेत असल्याने राष्ट्रवादीतील कार्यकर्ते नेत्यांना झुकते माप दिले जात असल्याच्या सर्वाधिक तक्रारी अन्य घटक पक्षांच्या होत्या. राष्ट्रवादी-कॉंग्रेस विरोधात लढून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आल्याने बहुतांश मतदारसंघात शिवसेनेच्या नेत्यांची, खासदार-आमदारांची स्थानिक पातळीवर कोंडी निर्माण झाली होती. शिवसेनेच्या निवडणूक आलेल्या 35 आमदारांच्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी पक्ष असल्याने आगामी काळात स्थानिक पातळीवर निवडणुकांना सामोरे जाताना राजकीय पेच निर्माण होत असल्याने तसेच भाजप युती शिवाय पुढील निवडणुका जिंकणे सोयीचे नाही या भावनेने बहुतांश असे आमदार महाविकास आघाडी सरकार प्रयोगावर नाराज होते. या नाराजीचा बांध राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणुकीतील घडामोडींमुळे फोडण्यास कारणीभूत ठरलेला आहे याची परिणीती आजच्या राजकीय बंडाळीतून दिसून येत आहे. या राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपने का घेवू नये असाही कल व्यक्त केला जात आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ झाले होते. खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाल्याने राष्ट्रवादीने पाच अतिरिक्त मतांची बेगमी केली. शिवसेनेचे संख्याबळ ५५ असून, तीन अपक्ष मंत्री व अन्य काही आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेला ६० पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मतेच मिळाली. शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५५ असल्याने तीन मते फुटल्याचे स्पष्टच दिसते. मात्र शिवसेनेबरोबर असलेल्या सहयोगी आमदारांनी मते दिली असे गृहित धरल्यास शिवसेनेची अधिक मते फुटली आहेत हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी मतांची फाटाफूट झाल्याने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेवर नामुष्की ओढवली आहे त्यामुळेच बंडखोरीचा उगम या निवडणुकीत झाला आहे. भाजपाचे १०६  आमदार आणि आठ अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत पक्षाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांचे एक मत बाद झाल्याने अधिकृतपणे १३३ मते मिळाली. याचाच अर्थ राज्यसभेपेक्षा विधान परिषदेत भाजपाला ११ मते अधिक मिळाली आहेत. शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात भाजपाला यश आले आहे. गुप्त मतदान पद्धतीत काँग्रेस आणि शिवसेनेतील अस्वस्थ किंवा नाराज आमदारांना गळाला लावण्यात भाजपाला यश आले. राज्यसभेपूर्वी मविआकडे १७० संख्याबळ होते. राज्यसभा निवडणुकीत ते दहाने घटले आणि विधान परिषदेत एकूण १९ मते कमी झाली. तर, भाजपचे संख्याबळ १३४ वर पोहोचले आहे. हेच गणित गृहीत धरले तर सरकार टिकण्यासाठी बहुमताचा आकडा १४३ वर येतो. मविआ आणि भाजपमधील संख्याबळात अत्यल्प अंतर राहिल्याने सरकार अडीच वर्षे टिकणे कठीण आहे. अडीच वर्षांपूर्वी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने विधानसभेत बहुमत प्राप्त केले होते. तेव्हा १७० आमदारांचा सरकारला पाठिंबा होता, तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे १०५ सदस्य होते. सत्ताधारी आघाडीत तीन पक्ष आहेत. त्यामध्ये काँग्रेसकडे ४४, राष्ट्रवादीकडे ५३ आणि शिवसेनेकडे ५५ असे एकूण १५२ सदस्य आहेत. सत्ताधारी बाकावरील बाजूला २८८ च्या निम्मे म्हणजे १४५ सदस्यांचे पाठबळ असावे लागते. आज लागलेल्या विधान परिषद निकालात आघाडीकडे काठावर बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीच्या नाराज असलेल्या बंडखोरांनी बंड केल्याने सरकार अल्पमतात आले आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीची मते फोडून भाजपाने सरकार डळमळीत होईल, अशा पद्धतीने पावले टाकली त्यामध्ये बंडखोरांना उत्तेजन मिळाले आणि सरकार अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. दोन तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना भाजप बरोबर जाण्याच्या निर्णयाआधी किंवा सेनेला धक्का देण्याआधी आणखी १७ आमदारांची गरज आहे. म्हणजेच आमदार शिंदे यांच्या पाठीमागे ३७ आमदारांचं पाठबळ लागेल. परंतु एवढे आमदार पाठीशी नसल्याने दुसऱ्यांदा बंड फसेल अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.  
शिवसेनेत फुट पाडणारे एकनाथ शिंदे-शिवसेनेत फूट पाडणारे सूत्रधार हे एकनाथ शिंदे कोण आहेत तर एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्यामुळेच शिवसेनेचा झेंडा हाथी घेतला. दिघेंनी 1984 मध्ये मध्ये शिंदे यांची किसन नगरच्या शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्या नंतर दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे 1980 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2004 मध्ये एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत होते निवडून आले होते. 2009, 2014 आणि 2021 मध्ये ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विधानसभेत पोहचले. म्हणजेच एकनाथ शिंदे चार वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत विधानसभेमध्ये पोहोचले आहेत. 2019 च्या सुरुवातीला त्यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी देखील सांभाळली होती. एकनाथ संभाजी शिंदे सध्या शिवसेनेचे नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.

शिवसेनेतील बंडात हे आमदार सामील असल्याची चर्चा-

मुंबई- 1. मागाठाणे आमदार प्रकाश सुर्वे,.
मराठवाडा - 1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.,2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे,3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट,4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत,5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे,6. नांदेडचे बालाजी कल्याणकर,.
कोकण- 1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी,2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,.
पश्चिम महाराष्ट्र- 1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर,2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर,3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई,4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील,5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे.
ठाणे- 1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर,2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा,.3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे, 4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर,.
उत्तर महाराष्ट्र- 1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील,.
विदर्भ- 1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, 2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड,.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत खालील नेते उपस्थित-

रवींद्र वायकर,गुलाबराव पाटील, संजय राऊत,नीलम ताई गोरे,दादा भुसे,उदय सामंत,संजय राठोड,वैभव नाईक,दिवाकर रावते, उदयसिंग राजपूत, विनायक राऊत, नरेंद्र दराडे, अनिल देसाई, विकास पोतनीस, विनायक राऊत, सुभाष देसाई, वरूण सरदेसाई,अरविंद सावंत,किशोर दराडे, किशोर साळवी,आमशा पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, सचिन अहिर ,सुनील शिंदे, सचिन पडवळ, अंबादास दानवे, मंगेश कुडाळकर, प्रकाश फातर्पेकर, राहुल शेवाळे, राहुल पाटील, सुनील प्रभू, दिलीप लांडे, राजन साळवी.

राज्यसभेनंतर महाविकास आघाडीवर पराभवाची नामुष्की

राज्यसभेप्रमाणेच शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत पाच उमेदवार निवडून आणले. तर शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यांचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांनी बाजी मारली. शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पडवी विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले. काँग्रेसकडून भाई जगताप विजयी झाले, तर चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते घेतली होती आता विधान परिषद निवडणुकीत 134 मते घेतली. महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास 21 मते फुटली. त्यात शिवसेनेची तीन मते इतरांनी पळवली, तर राष्ट्रवादीच्या पारड्यात सहा मते अतिरिक्त पडली. काँग्रेसची तीन मते फुटल्याचे समजते. 44 पैकी 41 मते काँग्रेसला पडली.

विजयी उमेदवार (कंसात मते)
भाजप- प्रवीण दरेकर (26), श्रीकांत भारतीय (26), उमा खाकरे (26) राम शिंदे (26), प्रसाद लाड (28)
शिवसेना- आमशा पाडवी (26), सचिन आहिर (26)
राष्ट्रवादी- रामराजे निंबाळकर (26), एकनाथ खडसे (27)
काँग्रेस- भाई जगताप (26), चंद्रकांत हंडोरे (22) (पराभूत) 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)






Thursday, 16 June 2022

आडनावावरून ओबीसींचे सर्वेक्षण; प्रशासनातच एकमेकांच्या जातींवरून संशयकल्लोळ!

आडनावावरून ओबीसींच्या गणतीत प्रशासनात जातींची पोलखोल!

तदारयादीतील मतदारांच्या आडनावावरून ओबीसींची गणतीत अनेक गंमतीदार किस्से घडत असून प्रशासनातच एकमेकांच्या जातींवरून संशयकल्लोळ निर्माण होऊन अनेकांच्या खऱ्याखुऱ्या जातींची पोलखोल होत असल्याने समर्पित आयोगाचे सर्वेक्षण करमणुकीचे साधन बनले आहे. आडनावावरून ओबीसींच्या गणतीमुळे मूळ उद्देशाला हरताळ फासला जात असून ओबीसी, भटके-विमुक्त जातीच्या नागरिकांची क्रूर चेष्टा सुरु आहे. मतदारयादीतील मतदारांच्या आडनावावरून ओबीसींची गणती सुरु असताना कर्मचारी-अधिकारी एकमेकांच्यामध्ये चर्चा करून आपापसात जात ओळखा अशा पैजा लावून सुरेख सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. सर्वेक्षण करणारे कर्मचारी मतदारयादी वरून कार्यालयातील गणती वर येतात आणि कोण कोणत्या जातीचे आहेत यावर चर्चा रंगते. ती चर्चा खात्याचे प्रमुख, आयुक्तांच्या आडनावापर्यंत पोहोचते. आपले सहकार आयुक्त साहेब श्री. अनिल कवडे तर मराठा आहेत, नाही..नाही..ते तर ब्राम्हण आहेत...अरे बापरे..., अहो मग या पदावरील गायकवाड कोणत्या वर्गात येतात ते अनुसूचि जाती मध्ये येतात आणि दुसरे गायकवाड ते तर ओबीसी आहेत..ते माळी आहेत..आणि कांबळे साहेब तर अनुसूचि जाती मध्ये येतात ना... नाही...नाही... ते तर ओबीसी आहेत..ते शिंपी आहेत, दुसरे कांबळे साहेब तर ब्राम्हण आहेत...अरे बापरे...अशा प्रकारे प्रशासनातच एकमेकांच्या जातींवरून संशयकल्लोळ व जातींची पोलखोल सुरु आहे.   
      नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी, भटके-विमुक्त जातीच्या नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी इम्पिरिकल डेटा (सांख्यिकी माहिती) त्रिस्तरीय चाचणीच्या पूर्ततेसाठी नियुक्त केलेला समर्पित आयोगाकडून मतदारयादीतील मतदारांच्या आडनावावरून ओबीसींची गणतीचे कार्य सुरु आहे. आडनावावरून ओबीसींची गणतीत काम करणारे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या विभागातील प्रशासनात आडनावावरून कोणत्या जातीचा आहे या गणतीत आडनावाच्या अपेक्षित जाती ऐवजी भलत्याच जातीचे असल्याचे समोर आल्याने प्रशासनातच एकमेकांच्या जातींवरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. आडनावावरून प्रशासनात एकमेकांच्या जातींची पोलखोल होत असल्याचे चित्र ओबीसींचे सर्वेक्षणाच्या निमित्ताने सर्वत्र दिसून येत आहे.  
        समर्पित आयोग 12 मार्च 2022 रोजी गठीत केला. आयोगाची कार्यकक्षा व मुदत अधिसूचनेत नमूद केली त्यामध्ये आयोगाच्या पहिल्या बैठकीपासून 3 महिन्यांचा कालावधी अथवा शासन कालावधीत वाढ करेल असा कालावधी निर्धारित केला. 12 जून 2022 रोजी समर्पित आयोगाला 3 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरी ओबीसींचा अहवाल तयार होऊ शकला नाही. कारण यापूर्वी नियुक्त राज्य मागासवर्ग आयोगाने शासन स्तरावर माहिती जमा करून केलेला व न्यायालयाने फेटाळलेला अहवालातील सांखिकी माहितीच्या आधारावर फेरफार करून काहीही न करता अहवाल तयार करण्याच्या मानसिकतेमुळे प्रारंभीची 2 ते अडीच महीने काहीही कार्य समर्पित आयोगाने केले नाही. त्यामुळे समर्पित आयोगाच्या नकारार्थी कार्यपद्धतीवर ओबीसीं समाजात संतापाची लाट उसळली आणि आंदोलनानंतर राज्यव्यापी 4 दिवसांचा धावता दौरा करून निवेदने स्वीकारली. दरम्यानच्या काळात मध्यप्रदेशातील आयोगाचा अहवाल न्यायालयाने मान्य करून तेथील ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित झाले. म्हणून मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात स्थानिक स्वराज्य निहाय मतदारयादी नुसार ओबीसींचे सर्वेक्षण करण्याची मागणी राजकीय पक्ष व ओबीसी संघटनांनी केली. समर्पित आयोग मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात सर्वेक्षण करण्यास असमर्थता दर्शवित आयोगाचे अध्यक्ष श्री बांठिया कसे चुकीचे आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न करीत होते मात्र राज्य सरकारने सूचना दिल्याने नाइलाजास्तव राजी झाले परंतु परिपूर्ण सर्वेक्षण करण्याएवजी केवळ मतदारयादीतील आडनावावरून सर्वेक्षण करण्याचा फतवा काढला त्यामुळे वस्तुनिष्ठ सर्वेक्षणाचा बोजवारा उडाला. राज्य सरकारमधील ओबीसी मंत्रीच अशा चुकीच्या सर्वेक्षणावर नाराज होऊन हतबलतेने मा.मुख्यमंत्री यांना लेखी निवेदने दिली यामध्ये जेष्ठ मंत्री छगन भुजबळ व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आदींचा समावेश आहे. समर्पित आयोग चुकीच्या सर्वेक्षणावरून ओबीसींचे प्रमाण अत्यल्प दर्शविणारी सांखिकी माहितीच्या आधारावर कार्य करीत आहे त्यामुळे सदरील वस्तुनिष्ठ सर्वेक्षणातील सांखिकी माहिती नसल्याने न्यायालयात ग्राह्य मानली जाणार नाही पर्यायाने ओबीसींना कायमस्वरुपी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाला मुकावे लागणार आहे. 

समर्पित आयोगाचे अध्यक्ष श्री. बांठिया यांच्यावर ओबीसी संघटनांचे गंभीर आरोप

समर्पित आयोगाचे अध्यक्ष श्री. बांठिया यांच्या ओबीसी संघटनांनी यापूर्वीही गंभीर आरोप केले आहेत. श्री. बांठिया यांची मुळात समर्पित आयोगाचे अध्यक्षपदावरील निवडच चुकीची असल्याचे सांगत असून राज्याच्या मुख्य सचिव पदी असताना नियुक्त श्री. बांठिया समितीद्वारे ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गोठवली होती. ओबीसी विरोधातील व्यक्तीच समर्पित आयोगावर नेमून ओबीसींना कायमस्वरुपी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्यासाठीचा ओबीसी विरोधी नेत्याने त्यांची वर्णी लावल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केलेला आहे. माजी मंत्री व एका राजकीय पक्षाच्या शैक्षणिक संकुलावरील प्रशासन कामासाठी पेरोलवर श्री. बांठिया कार्यरत आहेत त्यांची ओबीसींच्या विरोधातील पूर्वग्रहदूषित मनोवृत्ती असून त्यांना सामाजिकतेची जाणीव नसून ते व्यावसायिक वृत्तीचे आहेत. पुण्यात बांधकाम क्षेत्रात कार्य करणाऱ्या कंपनीत भागीदार आहेत तर एका कंपनीतील अन्य सह भागीदार यांच्या डझनभर कंपन्यांच्या माध्यमातून हितसंबंध बाळगले असल्याचा ओबीसी संघटनांनी गंभीर आरोप केला आहे. हितसंबंध असलेल्या बंगलोर येथील एका मित्राच्या कंपनीला समर्पित आयोगाने आर्थिकदृष्ट्या लाभ मिळवून दिला आहे. तसेच आपल्याला हवे ती ओबीसींचे प्रमाण सांखिकी माहिती आपोआप दर्शवली जाईल अशी संगणक प्रणाली देखील त्यांनी मित्राच्या कंपनीकडून तयार करून घेतल्याचा आरोप ओबीसी वेल्फेअर फाऊन्डेशनचे अॅड.मंगेश ससाणे व माळी युवा परिषदेचे श्री. विजय भुजबळ, श्री. मृणाल ढोले-पाटील यांनी केला आहे. समर्पित आयोगाचे अध्यक्ष श्री. बांठिया यांच्या गैर कारभाराची चौकशीची मागणी देखील ओबीसी संघटनांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. तसेच समर्पित आयोगाने खोटी दिशाभुलकारक सांखिकी माहिती ती खरी असल्याचे भासवून तमाम ओबीसी समाज व सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारची फसवणूक, ठगवणूक केल्यास कायदेशीररीत्या कारवाईची इशारा ओबीसी वेल्फेअर फाऊन्डेशनचे अॅड.मंगेश ससाणे व श्री. मृणाल ढोले-पाटील यांनी दिला आहे. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


Tuesday, 14 June 2022

पालिका निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्ये 8 जागांसाठी विधानपरिषद निवडणुका होणार

विधानपरिषद पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक; शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांचे वर्चस्व 

बीसी आरक्षणावरून लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर अखेर होणार असून त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या 8 जागांसाठी नोव्हेंबरमध्ये विधानपरिषद निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांच्या निकालावरून 8 विधानपरिषदेच्या जागांचे भवितव्य ठरणार आहे. ज्या राजकीय पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील अर्थात त्या पक्षाच्या प्रतिनिधी विधानपरिषदेवर वर्णी लागणार असल्याने काही इच्छुकांनी आतापासूनच व्यूहरचना आखणी सुरु केलेली आहे. राज्यातील 27 जिल्हा परिषदा, 20 महापालिका, 300 नगरपालिका तथा नगरपंचायती आणि 325 पंचायत समितींच्या निवडणूका आगामी काळात ऑक्टोबर पर्यंत होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 2 जागा सध्या रिक्त आहेत तर येत्या डिसेंबरमध्ये 6 जागांची मुदत संपुष्टात येणार असल्याने रिक्त जागा होणार आहेत. पालिकांच्या निवडणुकीनंतर या निवडणुका जाहीर होणार आहेत. विधानपरिषदेवरील स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारा निर्वाचित एकूण जागा 22 भरलेल्या 20 तर रिक्त 2 आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या भंडारा- गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था, जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था, यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था, नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था, सांगली - सातारा स्थानिक प्राधिकारी संस्था, पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था या डिसेंबरमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. तर ठाणे-पालघर अन्य 2 जागा यापूर्वीच रिक्त झालेल्या आहेत. दरम्यान गट-गण प्रभाग रचना नव्याने होऊन सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने पुणे जिल्ह्यातील विधानपरिषद मतदारसंघावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामीण भागातील मतदारांचा वर्चस्व व प्रभाव वाढणार आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत 698 इतके मतदार होते त्यामध्ये वाढ होऊन 923 इतके मतदारसंख्या होणार आहे त्यामुळे 225 सदस्यांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील महापालिकांचा या निवडणुकीतील प्रभाव कमी होऊन ग्रामीण भागातील मतदारांचे वर्चस्व वाढणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांची सदस्य संख्या 312 असून इतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सदस्य संख्या तसेच नगरपरिषदेची सदस्य संख्या 611 इतकी होणार आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद मतदारसंघावर ग्रामीण भागातील मतदारांचे वर्चस्व राहणार आहे. आगामी निवडणुकांवरून उमेदवार ठरणार असून शहर व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आतापासूनच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून गतवेळी माजी कार्यकारी शहराध्यक्ष अनिल भोसले या मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. विजयासाठी ३२६ मते आवश्यक असताना त्यांनी एकुण ६९८ मतांपैकी ४४० मते मिळवून विजय प्राप्त केला होता तर कॉंग्रेसचे व सध्याचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना ७१, भाजपच्या अशोक येनपुरे यांना १३३ आणि विलास लांडे 2 मतांवर समाधान मानावे लागले होते. आमदार अनिल भोसले यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. सध्या ते शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरव्यवहारप्रकरणी तसेच इडीच्या अटकेच्या कारवाईनंतर कारागृहात बंदिस्त आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात 8 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल केले असून नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्यामुळे त्यांचे राजकीय कारकीर्द संपुष्टात आलेली आहे. 
       दरम्यान आमदार अनिल भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी भाजप व राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत मात्र आगामी निवडणुकांच्या निकालानंतर बहुमतावर कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहील त्यावर या जागेवरील निवड अवलंबून राहणार असल्याने काहींनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून देखील व्यूहरचना केली जात असून पुणे पालिकेवर एकहाती सत्ता मिळाली तर या जागेवर विधानपरिषदेवर वर्णी लागेल अशी आशा त्यांना आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागांवर यश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  

अ.क्र.

स्थानिक स्वराज्य संस्था नाव

वर्ग

सदस्य संख्या

1

पुणे महानगरपालिका

173

2

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

139

3

बारामती नगरपरिषद

41

4

तळेगाव दाभाडे नगरपरिषद

28

5

चाकण नगरपरिषद

25

6

दौंड नगरपरिषद

26

7

लोणावळा नगरपरिषद

27

8

जुन्नर नगरपरिषद

20

9

शिरूर नगरपरिषद

24

10

भोर नगरपरिषद

19

11

आळंदी नगरपरिषद

21

12

राजगुरुनगर नगरपरिषद

21

13

इंदापूर नगरपरिषद

20

14

सासवड नगरपरिषद

22

15

जेजुरी नगरपरिषद

20

16

मंचर नगरपंचायत

 

17

17

माळेगाव नगरपंचायत

 

17

18

देहू नगरपंचायत

 

17

19

पुणे जिल्हा परिषद

 

82

20

बारामती पंचायत समिती

 

14

21

इंदापूर पंचायत समिती

 

18

22

दौंड पंचायत समिती

 

16

23

शिरूर पंचायत समिती

 

16

24

भोर पंचायत समिती

 

8

25

पुरंदर पंचायत समिती

 

10

26

हवेली पंचायत समिती

 

12

27

मावळ पंचायत समिती

 

12

28

मुळशी पंचायत समिती

 

8

29

आंबेगाव पंचायत समिती

 

10

30

खेड पंचायत समिती

 

18

31

जुन्नर पंचायत समिती

 

18

32

वेल्हे पंचायत समिती

 

4

33

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

बरखास्त

34

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

बरखास्त

35

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

बरखास्त

एकूण

923


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)