Saturday, 15 July 2017

नगरसेवकांच्या मानधनात दुप्पट ते तिप्पट वाढ; राज्य सरकारचा निर्णय

नगरसेवकांच्या मानधनात दुप्पट ते तिप्पट वाढ; राज्य सरकारचा निर्णय


राज्यातील महापालिकांमधील नगरसेवकांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. नगरसेवकांच्या मानधनात दुप्पट ते तिप्पट एवढी घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील नगरसेवकांना आता 20 हजार रुपये तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबतची अधिसूचना आज (शनिवारी) जारी केली.
राज्यातील महापालिकांमधील नगरसेवकांचे मानधन सन 2010 मध्ये निश्चित करण्यात आले होते. परंतु, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  मुंबई महापालिका अधिनियमातील कलम 37 (अ) 1 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 19 (अ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून राज्यातील सर्वच महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात वाढ केली आहे. दूरध्वनी, लेखनसामुग्री व टपाल बाबींबवरील खर्च लक्षात घेऊन मानधनात वाढ करण्यात आली आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
'अ' प्लस वर्गातील महापालिकेतील नगरसेवकांना 25 हजार रुपये, 'अ' वर्गातील 20 हजार, 'ब' वर्गातील 15 हजार आणि 'क' व 'ड' वर्गातील नगरसेवकांचे मानधन 10 हजार रुपये करण्यात आले आहे.
पुणे महापालिका 'अ' वर्गात मोडत आहे.  पुणे पालिकेत 162 नगरसेवक निवडून आले असून पाच स्वीकृत असे 167 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या मानधनात आता मोठी वाढ झाली असून 20 हजार रुपये मानधन नगरसेवकांना दरमहा मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका 'ब' वर्गात मोडत आहे. पालिकेत 128 नगरसेवक निवडून आले असून पाच स्वीकृत असे 133 नगरसेवक आहेत. पिंपरी पालिकेतील नगरसेवकांना आता साडेसात हजार रुपये मानधन मिळत होते. त्यामध्ये आता दुप्पट साडेसात हजार रुपयांची वाढ झाली असून 15 हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे.
Political Research and Analysis Bureau (PRAB)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.