Friday 24 May 2019

राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात

राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात

राष्ट्रवादीबरोबर आघाडी केलेले बहुतांश राजकीय पक्ष अस्तित्वहीन होत आहेत यामध्ये आता प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष काँग्रेसचा देखील समावेश लोकसभा निवडणुकीच्या निकालातून झालेला असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा इतिहास पहिला तर बहुमतांचे सरकार ही संकल्पना पुलोदच्या प्रयोगातून संपुष्टात येऊन आघाडीच्या राजकारणास प्रामुख्याने प्रारंभ झाला. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीच्या राजकारणाला सुरुवात केली. पुलोदचा प्रयोग सर्वांनाच परिचित आहे मात्र काळाच्या ओघात शरद पवार यांनी ज्या घटक पक्षांना आपलेसे केले त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले असून लोकसभा निवडणुकीतील निकालावरून त्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पगडा आहे. या वयातही त्यांनी इतरांच्या तुलनेत सर्वाधिक सभा घेऊन प्रचाराची राळ उडवून दिली मात्र आपल्या पक्षाच्या जागा शाबूत ठेऊन इतर मित्र पक्षांचे नुकसान कसे होत आहे याचा मागोवा आपण या लेखातून घेत आहोत. लोकसभा निवडणूक २०१९ निकालाचा बोध घेतला तर महाआघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसचे समूळ उच्चाटन झालेले दिसून येत आहे त्याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचा पराभवाने त्यांचे लोकसभेतील अस्तित्व संपुष्टात आले आहे. इतर स्थानिक प्रादेशिक पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीला पालघर जागा दिली होती त्यांनाही अपयश आले आहे तर महाआघाडीला ५६ पक्ष/संघटनांनी पाठींबा दिला होता त्यांचे राजकीय अस्तित्व केवळ कागदावर उरलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीती काहीं जागा पदरात पडतील या आशेवरच पाठिंब्याची पत्रे दिली गेली मात्र त्यांना कितपत त्याचा लाभ होईल ते येणाऱ्या काळात समजेलच. काँग्रेसपक्षातून फारकत घेऊन राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला मात्र स्वबळावरची ताकद समजल्यावर काँग्रेसपक्षाबरोबर आघाडी केली ती आघाडी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला नुकसानकारकच ठरली आहे मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका असोत अथवा विधानसभा/लोकसभा निवडणुका असोत, काँग्रेसने आपले नुकसान मित्र पक्षामुळे होत आहे हे लोकसभा सदस्यत्वाची संख्या शून्यावर येईपर्यंत उमजले नाही हि वस्तूस्थिती आहे. राज्यातील नेत्यांना याची चाहूल लागली होती मात्र केंद्र स्तरावरून आघाडीचे जागा वाटप यामुळे स्थानिक नेत्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी वेगवेगळ्या पद्धतीने झगडावे लागत असल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. अहमदनगरची जागा सोडण्यावरून काँग्रेसपक्षाचे नेते व विरोधीपक्षनेते पदाचा त्याग करावा लागला. याचा विपरीत परिणाम राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर झाला त्याचे नुकसान निकालातून दिसून आलेले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राजकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवून २००९ च्या लोकसभा निवडणुकीत संसदेत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवला. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची मदत घेऊन पुन्हा यश मिळवले आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला. बारामतीत त्यांना ललकारले विरोधी वातावरण करून राज्यात प्रचारातून राळ उडवून दिली. सहकारी सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी विरोधात लाखोंची मते प्राप्त केली यामुळे ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निशाण्यावर होते. शरद पवार साहेबांचे राजकारण सर्वांनाच ज्ञात आहे. तल्लक बुद्धी, थंड डोक्याने राजकीय घात करून राजकीय डावपेचात माहीर, आणि मतविभाजनातून यश व अपयश कसे मिळू शकते याची जाण असलेला परीस म्हणून ओळखले जाते. ठरवले तर खूप सामान्यांना राजकारणात यश मिळवून दिले. त्यांनी शासकीय स्वीय सहायकाला देखील खासदार पदासह राज्यपाल पदापर्यंत संधी दिली तर विरोधातील अनेकांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणल्याची उदाहरणे आहेत. अहमदनगरची जागा देण्यावरून कित्येक वर्षाचा विखेपाटील यांचा राग त्यांच्या तिसऱ्या पिढीवर काढल्याची या निवडणुकीतील चर्चा अजूनही ताजे उदाहरण आहे. असे असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी त्यांच्याशी आघाडी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. राजकीय लाभासाठी आपल्या तत्वांशी प्रतारणा केली. आघाडीचा परिणाम निकालातून दिसून आलेलाच आहे. ज्यांच्या घरासमोर जाऊन ललकारले त्यांच्याकडून राजकीयदृष्ट्या लाभ व मैत्रीची अपेक्षा ठेवणे हे राजू शेट्टी यांना का समजले नाही असा त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. राज्यात महाआघाडीचे जागा वाटप निश्चित नसतानाही केवळ हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम जाहीर केले. मात्र इतर जागावाटप उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरीस जाहीर करेपर्यंत चर्चा आणि निर्णय प्रलंबित होते. हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला जाहीर करून विरोधकांना (स्वकीयांना) पुरेसा वेळ दिला गेला, शिवसेनेतील धैर्यशील माने यांचा प्रवेश आणि संबधित राजकीय घडामोडी, मतांचे विभाजन, राजकीय लाभासाठी आपल्या तत्वांशी प्रतारणा, गेल्या निवडणुकीत युती बरोबर आणि या निवडणुकीत महाआघाडीत गेल्याचा निर्णय मतदारांना रुचला नाही त्याचा पराभवातून परिणाम आणि एका अंतर्गत विरोधकाचे अस्तित्व संपुष्टात आले हे दिसून येत आहे. राजकीय लाभापोटी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातुला देखील या निवडणुकीत चकवा देण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घटक पक्ष शेतकरी कामगार पक्ष आमदार गणपतराव देशमुख सांगोला मतदारसंघातून अस्तित्व टिकवून आहेत. कोणत्याही राजकीय अमिषाला बळी पडले नाहीत. तेथून धनगर समाजाची एकगठ्ठा मतदान आणि उपद्रवमूल्य कमी म्हणून टिकून आहेत. तर जनता दलाचे जाधवराव यांना राज्यमंत्री पद देऊन बोळवण केली आणि त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आल्याचे उदाहरण आहे. त्याबरोबरच जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांचे देखील पक्ष देखील अस्तित्वहीन झाल्याचे उदाहरण आहे. आता लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष महाआघाडीत सहभाग न घेता त्रयस्त परंतु अनुकूल भूमिका घेऊन सत्ताधारी पक्षांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रात 4 सभा घेऊन "लाव रे तो व्हिडीओ" म्हणून प्रचाराची राळ उडविणाऱ्या मनसे पक्षाला आपलेसे केले आहे. त्यांचा सभांचा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे. आगामी विधानसभेच्या काही जागांसाठी त्यांना आशा/आश्वासन दिल्याची चर्चा आहे मात्र आतापर्यंतच्या मित्र पक्षांचे जे झाले आहे त्यापेक्षा वेगळा परिमाण येईल हे दुरापस्त आहे. महाराष्ट्रात राज्य निर्मिती पासून म्हणजेच 1960 च्या पहिल्या विधानसभा ते चौथ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एका पक्षांना बहुमत मिळाले होते तर पाचव्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसमध्ये फुट पाडून शरद पवार यांनी पुलोद प्रयोग करून सत्ता हस्तगत केली आणि आघाडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यावेळी जनता पार्टी, आॅल इंडिया फॉरवॅड पक्ष, शेकाप, आरपीआय, सीपीएम, सीपीआय हे पक्ष प्रभावशील होते त्यांचे अस्तित्व काळाच्या पडद्याआड गेले आहे तर बहुजन विकास आघाडी, जनसुराज्य शक्ती, लोकसंग्राम, जनता दल, समाजवादी पक्ष, अखिल भारतीय सेना, आदि पक्ष आपले अस्तित्व हिरावून बसले आहेत. प्रादेशिक पक्षांबरोबर राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस पक्ष आपले महाराष्ट्रातील लोकसभेतील अस्तित्व गमावून बसला आहे याचे प्रमुख कारण राष्ट्रवादी पक्षाचे धोरण व नीती हे असल्याचे प्रखरतेने जाणवते.
सदर लेख पुढारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला आहे. लिंकवर पहा-

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
============================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=
===============================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.