Saturday 15 September 2018

राज्यात आगामी निवडणुकांसाठी भारिप आणि एमआयएमची युतीचा लाभार्थी कोण?

राज्यात आगामी निवडणुकांसाठी भारिप आणि एमआयएमची युतीचा लाभार्थी कोण?


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमने युती केली आहे. राज्यातील आगामी निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन औवेसी यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. भारिप बहुजन महासंघ व एमआयएमने हातमिळवणी केल्याने राज्यात इतर पक्षांसमोर एक नवं राजकीय आव्हान उभं राहणार आहे. दोन्ही पक्षांनी दलित-मुस्लिम ऐक्याची हाक दिली आहे. औरंगाबादमध्ये 2 ऑक्टोबरला दोन्ही पक्ष एकत्र सभा घेणार आहेत. या दोन्ही राजकीय पक्षांची वाटचाल काँग्रेस व राष्ट्रवादी महाआघाडीच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार आहे. दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांचे एकत्रिकरणाचा दोन्ही पक्षांना कितपत लाभ होणार हे निवडणुकीत स्पष्ट होईलच मात्र दोन्ही राजकीय पक्षांकडे समाज एकवटलेला नाही. मागील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाने तिसऱ्या क्रमांकापर्यंत ९ जागांवर वर्चस्व मिळवलेले होते तर एमआयएमने २ जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकापर्यंत ११ जागांवर वर्चस्व मिळवलेले होते. अहमदनगर महापालिकेत युतीचा पहिला प्रयोग केला जाणार आहे. युतीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असणार आहे. या निवडणुकीतच प्रयोगाची यशस्वीता स्पष्ट होणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतल्यास भाजप (२७.८ टक्के), शिवसेना (१९.३ टक्के), काँग्रेस (१८ टक्के) तर राष्ट्रवादीला १७.२ टक्के मते मिळाली होती. या व्यतिरिक्त मनसेला ३.७ टक्के मते मिळाली होती. यानंतर बसपाला २.३ टक्के मते पडली होती. अन्य राजकीय पक्षांना एक टक्के किंवा त्यापेक्षा कमीच मते पडली आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला ०.९ टक्के मिळाली होती. शेकापच्या पारडय़ात एक टक्का मते पडली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची अकोला, वाशीम या जिल्ह्यामध्ये चांगली ताकद आहे. राज्यातील छोटय़ा पक्षांच्या गेल्या दोन-तीन निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यास मतांमध्ये फार काही फरक पडलेला नाही. २००९ मध्ये १३ आमदार जिंकलेल्या मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांने मनसेची मते घटली. बहुजन समाज पक्षाला २००४ मध्ये (४ टक्के), २००९ मध्ये (२.३५ टक्के) तर २०१४ मध्ये (२.३ टक्के) मते मिळाली आहेत. बसपाला मानणारा एक वर्ग राज्यात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने 4 जागावर दुसरया क्रमांकाची मते मिळवली होती तर १६ जागांवर ३ क्रमांकाची मते मिळवली होती. या निवडणुकीत 20 विधानसभा मतदारसंघात प्रभावशील कामगिरी बसपाने दाखवलेली होती. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये 1 ते 3 स्थान मिळवलेल्या पक्ष निहाय जागांची संख्या(कंसात निवडून आलेली  संख्या) खालीलप्रमाणे-
भारिप बहुजन महासंघ-9 (1)
एमआयएम-13 (2)
बसप-20 (0)
मनसे-22 (1)
रासप-4 (1)
सप-2 (1)
बहुजन विकास आघाडी-3 (3)
शेकाप-6 (3)
अपक्ष-22 (7)
राष्ट्रवादी-148 (41)
कॉंग्रेस-166 (42)
शिवसेना-193 (63)
भाजप-238 (122)

Mr.Chandrakant Bhujbal - 9422323533

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.