विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने सोमवारी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 14 सप्टेंबरला या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. 22 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून,24 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. तर 26 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून,बुधवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान घेण्यात येवून, त्याच दिवशी 5 वाजता मतमोजणी करण्यात येईल.फुंडकर यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 2020 पर्यंत होता. विधानसभेत भाजपचे सदस्य सर्वात जास्त असल्यामुळे इतर कोणताही पक्ष या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. पर्यायाने भाजपमध्ये आता तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. फुंडकर ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यामुळे विदर्भातील ग्रामीण भागातूनच उमेदवार द्यावा, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील कार्यकर्त्याला संधी द्यावी, असाही विचार पुढे येत आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.