Saturday 29 September 2018

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर ओढवले होते संकट..

हेलकावणा-या विमानाचे औरंगाबाद मध्ये हार्डलँडिंग


आरोपामुळे राजकीय कारकीर्दीत ओढवलेल्या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर हेलकावणा-या विमानामुळे पुन्हा संकट ओढवले होते. जिवावर बेतणा-या प्रसंगाला त्यांना सामोरे जावे लागले. जेट एअरवेजचे मुंबईहून निघालेले विमान उड्डाणानंतर वीस मिनिटांनी अचानक हेलकावे घेऊ लागले. विमान हवेत वेगाने खाली येत असल्याची जाणीव होताच प्रवाशांच्या हृदयाचे ठोके चुकले. काही वेळाने पुन्हा ठरावीक उंची गाठून विमान स्थिरावले आणि दहा मिनिटांच्या या थरारक अनुभवानंतर सर्व प्रवाशांचा जीव कसाबसा भांड्यात पडला. पण हा थरार एवढ्यावरच थांबला नाही. औरंगाबादेत पुन्हा तोच अनुभव सर्व प्रवाशांना आला. धावपट्टीवर उतरताना जोरदार धक्के बसू लागले. यात एका प्रवाशाचे डोके आदळले, काहींना उलट्यांचा त्रास झाला आणि अखेर कसेबसे विमानाचे हार्ड लँडिंग झाले. या विमानात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील प्रवास करत होते. या दुर्घटनेत इतर प्रवाशांसोबत ते देखील बालंबाल बचावले. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून तिघांना उलट्या, डॉक्टरला श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी मुंबईहून सायंकाळी ४.४६ वाजता निघालेल्या या विमानातील प्रवासी प्रिया जैस्वाल (रा. टीव्ही सेंटर चौक, हडको) यांनी हा थरारक अनुभव एका वृत्तपत्रात कथन केला आहे. मुंबईतून विमानाने उड्डाण घेतले आणि वीस मिनिटांनंतर अचानक हेलकावे सुरू झाले. प्रवासी घाबरलेले होते. या अवस्थेत खाद्यपदार्थांची पाकिटे देण्यात आली. प्रवाशांनी एक-दोन घास घेतले असतानाच  विमान वेगाने खाली येऊ लागले. एक-दीड मिनिटांनी विमान त्याच अवस्थेत पुन्हा वरती येऊ लागले. हवामान खराब असल्याची सूचना विमानात देण्यात आली. एका प्रवाशाचे डोके यावेळी बॉक्सवर आदळले. या घटनेनंतर तिघांना उलट्या झाल्या. चिकलठाणा विमानतळावर हार्ड लँडिंग झाल्यावर उलट्याचा त्रास झालेल्या तिघांना सिग्मा रुग्णालयात प्रथमोपचार करुन सोडण्यात आले. जेट एअरवेजचे चिकलठाणा विमानतळावरील समन्वयक स्वामिनाथन यांनी मात्र असे काहीही झालेच नसल्याचे म्हंटले असून प्रथमच विमान प्रवास करणाऱ्या काही लोकांना उलट्या होतात. अनवधानाने एखाद्याचे डोके समोरच्या आसनावर आदळूही शकते. परंतु जखम होण्याइतकी दुखापत होत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.