Thursday 14 May 2020

भाजपचे प्रवीण दटके यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्याची माहिती लपवल्याची तक्रार

भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या विरोधात तक्रार

राज्यात होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा कडून उभे असलेले उमेदवार प्रवीण दटके यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्याची माहिती लपवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यात व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे देखील वकील सतीश उके यांनी ही तक्रार दाखल केली आहे. प्रवीण दटके यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरूद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटला क्रमांक 321/2006 बद्दलची माहिती लपविली आहे. ७ वे संयुक्त नागरी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी, प्रथम श्रेणी, नागपूर यांच्यासमोर खटल्याची माहिती देणे त्यांचे कर्तव्य होते. हे निवडणूक कायद्यांतर्गत चुकीचे प्रमाण आहे. दटके यांचा उमेदवारी अर्ज नाकारला जाऊ शकतो. प्रवीण दटके देखील कायद्यानुसार फौजदारी कारवाईस जबाबदार आहेत, असे उके यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरपी अधिनियम कलम 125अ अन्वये आयपीसीच्या विविध कलमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उके यांनी केली आहे. या तक्रारीमुळे दटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान यापूर्वी अनधिकृत धार्मिक अतिक्रमणांच्या विरोधातील कारवाईमध्ये अडथळा आणल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्याच्या कारवाईला विरोध केल्यामुळे प्रवीण दटके यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशा विनंतीसह सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका यापूर्वी देखील दाखल केली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीत शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने मध्य नागपूरमधील प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बडकस चौकात निदर्शने करून रोष व्यक्त केला होता. आमदार विकास कुंभारे यांनाच येथे उमेदवारी देण्यात आली. हलबा समाज नाराज होईल तसेच जातीय समीकरण राखण्यासाठी दटके यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याची चर्चा होती. मध्य नागपूरमध्ये हलबा आणि मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कुंभारे यांची दावेदारी नाकारल्यास हलबा नाराज होईल आणि ते कॉंग्रेसला मतदान करतील, अशी भीती वर्तवली जात होती. पक्षाला कोणतीही जोखीम घ्यायची नसल्याने आमदार कुंभारे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत संधी देता आली नसल्याने त्यांची आता निवड केली असल्याचे मानले जाते. 41 वर्षीय दटके हे 2014-2017 या काळात नागपूरचे महापौर होते. सध्या ते भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. दटके यांचे वडील प्रभाकरराव दटके हे भाजपचे नागपूर येथील महत्त्वाचे नेते होते. ते भाजपचे नागपूर अध्यक्ष होते. पक्षाला जेव्हा कार्यकर्ते मिळत नव्हते, त्याकाळात प्रभाकरराव दटके यांनी पक्ष मजबूत केला. सहकार आणि राजकारणात पक्ष मजबूत करताना त्यांनी घरोघरी संघटन मजबूत केले. त्यांना भाजपने विधान परिषदेचे आमदार केले होते. घरातूनच पक्ष आणि राजकारण याचे बाळकडू मिळालेले प्रवीण दटके नागपूरचे महापौर होते. आजवर ते संघ व भाजपचा गड असलेल्या महाल भागातून 3 वेळा नगरसेवक झाले आहेत. जन्म – १६ डिसेंबर १९७८ (४२ वर्षे) राष्ट्रीय उपाध्यक्ष,भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष, भाजप विद्यमान नगरसेवक व माजी नागपूर महापौर (२०१४ ते २०१७) वडील प्रभाकरराव दटके भाजप चे निष्ठावन्त कार्यकर्ते १९९५ मध्ये वडील प्रभाकरराव यांचं हृदयघातामुळे अकाली निधन २००४ साली वयाच्या २५ व्या वर्षी महाल वार्डातून नगरसेवक म्हणून निवड झाली होती. संघ, भाजपा आणि विद्यार्थी चळवळीत दटके यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्या वडिलांनी राजकारणाचा पाया मजबूत केल्याने ते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपली राजकीय मोट बांधू शकले. ते गडकरी गटाचे म्हणून ओळखले जातात. मात्र, यावेळी विधानपरिषद निवडणुकीतील अटीतटीच्या झुंजीत त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले  होते त्यांनी बिनविरोध निवड विधानपरिषदवर झालेली आहे. 

प्रवीण दटके यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखल केलेला तपशील 

नागपूरचे माजी महापौर तसेच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांची विधान परिषदेवर निवड झालेली असून औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञानुसार, त्यांच्याकडे 91 लाख 43 हजार रुपयांची स्थावर आणि 16 लाख 53 हजार 201 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 16 लाख 57 हजार 300 रुपये आहे. प्रवीण दटके यांच्या पत्नी प्रवदा यांची स्थावर मालमत्ता 9 लाख 89 हजार रुपये, जंगम मालमत्ता 22 लाख 42 हजार 801 रुपये आणि वार्षिक उत्पन्न 13 लाख 18 हजार 940 रुपये आहे. आई प्रतिभा यांची स्थावर मालमत्ता 99 लाख 24 हजार 207, जंगम 12 लाख 33 हजार 602 रुपये आणि वार्षिक उत्पन्न 3 लाख 77 हजार 125 रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. यामध्ये स्वतः प्रवीण यांच्याकडे एक लाख 40 हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड (बुलेट) (क्रमांक एम.एच. 49 टी. 0041) आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 10 लाख 31 हजार 143 रुपये किमतीची स्वीफ्ट कार (क्रमांक एम.एच. 49 एवाय 9909) असल्याचे नमूद केले आहे. प्रवीण दटके यांच्याकडे 3 लाख 4 हजार रुपयांचे आठ तोळे सोने, पत्नी प्रवदा यांच्याकडे सात लाख 60 हजार रुपयांचे 20 तोळे, आई प्रतिभा यांच्याकडे 9 लाख 50 हजार रुपयांचे 25 तोळे, मुलगी प्रत्युक्षाकडे 76 हजार रुपयांचे 2 तोळे आणि दुसरी मुलगी प्राहीकडे दोन तोळे सोने असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. दटकेंच्या विरोधात नागपूर शहराच्या सिताबर्डी, लकडगंज आणि पाचपावली पोलीस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल आहेत. यांपैकी सिताबर्डी पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम कलम 143, 147, 323, 336, 353 आणि 109 कलमान्वये, लकडगंजमध्ये मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 तर पाचपावली पोलीस ठाण्यात अधिनियम 3 व 5, कलम 336, 427, 109 व मुंबई पोलीस अधिनियम कलम 37-1 आणि 135 नुसार गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले दाखल आहेत. एकाही प्रकरणात अद्याप ते दोषी आढळलेले नाहीत. त्यांच्या नावे कर्ज नाही. पण त्यांची पत्नी प्रवदा यांच्या नावे 4 लाख 88 हजार रुपयांचे वाहन कर्ज आहे. दटके स्वतः शेतकरी, सामाजिक कार्यकर्ता आणि नगरसेवक आहेत. तर त्यांच्या पत्नी प्रवदा वेतनधारक आहेत असे नमूद केले आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.