Tuesday 12 May 2020

पक्षांतर्गत विरोधामुळे भाजपकडून घुमजाव विधान परिषदेचा उमेदवार बदलला; आता डॉ. अजित गोपछडे यांच्या ऐवजी रमेश कराड उमेदवार

भाजप पाठोपाठ काँग्रेस पक्षातही नाराजी


विधानपरिषद उमेदवारी निवडीवरून भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली असून दखल घेत भाजपकडून घुमजाव करून विधान परिषदेचा उमेदवारच बदलण्याचा निर्णय घेतला असून आता डॉ. अजित गोपछडे यांच्या ऐवजी माजी मंत्री पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक म्हणून समजले जाणारे रमेश कराड यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे. दरम्यान यापूर्वी उमेदवारी जाहीर होऊन नामनिर्देशनपत्र दाखल केलेले डॉ. अजित गोपछडे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले असून त्यांच्या निवडीला रोख लावल्याने त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची बिनविरोध निवड होणार म्हणून कार्यकर्ते व हितचिंतकांनी शुभेच्छा, अभिनंदनाचे फलक व सोशल मिडीयावर शुभसंदेश झळकले होते. नांदेड जिल्ह्यातील डॉ. अजित गोपछडे यांना संधी देत पक्षातील निष्ठावंतांना शुक्रवारी सुखद धक्का दिला होता. नांदेड जिल्ह्यातील लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळत असल्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. मागील काळात गोपछडे यांनी बिलोली विधानसभा असो किंवा नांदेड लोकसभा अशा निवडणुकींच्यावेळी पक्षाकडे वेळोवेळी उमेदवारीसाठी दरवाजा ठोठावला होता. पण प्रत्येकवेळी त्यांच्या वाटय़ाला निराशा आली होती. पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांना दीड वर्षांपूर्वी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर संधी मिळाली होती. भाजपचे डॉक्टर सेलचे प्रदेशध्यक्ष असलेले डॉ. अजित गोपछडे हे विधान परिषदेत बिनविरोध निवडून येण्यामुळे त्या प्रित्यर्थ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष  साजरा न करता भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी पाचशे लॉयन्सचे डबे  देऊन नांदेड भारतीय जनता पक्षाला आणखी एक लोकप्रतिनिधी मिळाल्याचा आनंद आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला होता मात्र त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. अर्ज छाननीनंतर भाजपने रमेश कराड यांच्याऐवजी दोन अर्ज डमी असत डॉ. अजित गोपछडे आणि संदीप लेले यांचा अर्ज मागे घेऊन धक्कातंत्राचा अवलंब केला. अनपेक्षितपणे त्यांची निवड झाल्याने अनेक इच्छुकांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती. याचीच पक्षाने दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एकतर नुकतेच पक्षात आलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि लोकसभा निवडणुकीत भाजविरोधात भुमिका घेणारे गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी देताना पक्षातील इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांना डावलले होते. याबरोबरच मेधा कुलकर्णी, योगेश गोगावले, संजय काकडे, माधव भंडारी, मिलिंद पाटील, नीता केळकर, मकरंद देशपांडे, केशव उपाध्ये यांच्यासारखे लोक निष्ठेने काम करत आहेत. कधीतरी विधानपरिषद आपल्याला मिळेल या आशेवर ते आहेत पण निष्ठावंतांना देखील डावलण्यात आले याची खदखद अनेकांनी व्यक्त केली आहे.

रमेश कराड यांचे नशिब बळावले; डमी उमेदवार झाले अधिकृत 

भाजपकडून अजित गोपछडे यांच्यासह रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके यांनी 8 मे रोजी उमेदवारी अर्ज भरले होते. यांच्यासोबतच रमेश कराड आणि संदीप लेले यांनी डमी अर्ज भरला होता. पण आता डमी उमेदवार असलेले रमेश कराड हे मुख्य उमेदवार म्हणून भाजपने जाहीर केले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्या नाराज होत्या. त्यामुळे पक्षाने त्यांच्या खंद्या समर्थकाला उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. सतत माघार घेणारे म्हणून परिचित असलेले उमेदवार रमेश आप्पा कराड यांची निवड केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नामनिर्देशनपत्र दाखल केलेले रमेश आप्पा कराड यांचा परिचय अवघ्या महाराष्ट्राला आहे. त्यांनी 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना यश आले नव्हते. त्यानंतर अनेकदा प्रयत्न करूनही आमदार होण्याचा योग त्यांच्या नशिबी नव्हता कारण कधी बंडखोरी तर कधी पक्षांतर तर अनेकदा आश्चर्याचा धक्का देत माघार घेण्याचा त्यांचा फंडा सर्वाना परिचित आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील नेहमी प्रमाणे आश्वासनांवर अपेक्षा ठेवणे देखील गैर नाही.  २००९ आणि २०१४ च्या विधानसभेत रमेश कराड हे भाजपच्या तिकिटावर याच मतदारसंघातून निवडणूक लढले होते. मात्र त्यात ते काँग्रेस उमेदवाराकडून पराभूत झाले होते. गेल्या 2 वर्षीपूर्वी विधान परिषदेच्या लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघ निवडणुकीत रमेशप्पा कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहणार होते. त्यावेळी नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रमेशअप्पा कराड यांनी निवडणुकीतून माघार घेत पुन्हा भाजपमध्ये येऊन स्थिरावले होते. राज्यात झालेल्या विधानसभेच्या आखाड्यात लातूर ग्रामीण मतदारसंघातून कराड यांनी पूर्ण तयारी केली होती. पण न मागताही युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला होता. याचा जबर धक्का रमेश कराड यांच्यासहित त्यांच्या कार्यकर्त्यानाही बसला होता. भाजपने ही जागा ताब्यात घेऊन रमेश कराड यांना उमेदवारी द्यावी असे साकडे त्यांच्या समर्थकांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना घातले होते मात्र हाती निराशा आली होती. लातूर ग्रामीण मधील भाजप नेते रमेश कराड यांनीही बंडखोरी केली होती. लातूर ग्रामीण हा भाजपच्या ताब्यातील मतदारसंघ होता. मात्र तो न मागताही यावेळेस शिवसेनेला सोडण्यात आला. त्यामुळे नाराज झालेले पंकजा मुंडे समर्थक रमेशप्पा कराड हे आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या आखाड्यात उतरले होते मात्र पुन्हा माघार घेतली होती. बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी अखेरच्या क्षणी घेतलेल्या माघारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच पंचायत होऊन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे यांची अडचण झाली होती. भाजपमधून आलेल्या कराड यांना पक्षात प्रवेश देत थेट उमेदवारी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या धनंजय मुंडे यांना या खेळीद्वारे पंकजा मुंडे यांनी जोरदार झटका दिला होता. पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा विश्वनाथ कराड यांनी पंकजा मुंडेंच्या वतीने केलेली मध्यस्थी रमेश कराड यांच्या ऐनवेळच्या माघारीसाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा त्यावेळी केली गेली. बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेतील जागेसाठी रमेश कराड हे भाजपतर्फे इच्छुक होते. मात्र, आपल्याऐवजी राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होताच कराड यांनी भाजपला रामराम ठोकत थेट राष्ट्रवादीकडून उमेदवारी पटकावली होती. रमेश कराड हे या परिसरातील मोठे प्रस्थ असून एमआयटीचे सर्वेसर्वा विश्वनाथ कराड यांचे ते पुतणे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अधिकृत मते आणि कराडांची ‘ताकद’ या बळावर ही निवडणूक सहज जिंकू असा राष्ट्रवादीला विश्वास होता. मात्र, कराडांच्या ऐनवेळच्या माघारीमुळे राष्ट्रवादीचे मनसुबे उधळले होते. कराड यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवताच नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी ‘यापुढे कुणालाही भाऊ मानणार नाही’ असे भावनिक वक्तव्य केले होते. पंकजा मुंडे यांनी घातलेली भावनिक साद आणि काका विश्वनाथ कराड यांनी केलेली शिष्टाई यामुळे रमेश कराडांचा नाइलाज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली होती. आता देखील विधानपरिषद निवडणूक लढविण्यास भाजपने प्रोत्साहन का दिले आहे याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा केली जात आहे. 14 मे रोजी माघार घेण्याची मुदत असून त्यानंतरच विधानपरिषद निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र तूर्तास निवडणुकीसाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. भाजपने 6, राष्ट्रवादीने 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, अपक्ष 1 असे एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असून डमी उमेदवारी अर्ज असल्याचा खुलासा केला जात होता. भाजपकडून संदीप लेले आणि रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज सादर केले ते सुद्धा डमी उमेदवार म्हणून मात्र रमेश कराड यांना अधिकृतपणे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. अर्ज दाखल केल्यानंतर रमेश कराड यांनी याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली होती. 'महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा. प्रवीणजी दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाचे युवा नेते मा. अरविंद पाटील निलंगेकर आणि प्रदीप पाटील खंडापूरकर हे उपस्थित होते,' अशी फेसबुक पोस्ट कराड यांनी लिहिली होती. .

आम्हाला मूर्ख बनवण्यात आले - खडसे

संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या तिघांचीही नावे फायनल झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात इतरांचीच नावे जाहीर करण्यात आली. ज्यांची नावे जाहीर केली, ते मुंबईत फॉर्म भरण्यासाठी आले कसे? अर्जासोबत लागणारी कागदपत्रे लॉकडाऊनच्या काळात त्यांनी तयार केली कशी? याचा अर्थ त्यांची नावे आधीच ठरलेली होती. हे सर्व पूर्वनियोजित होते. आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आले, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस मीच केली होती. त्याचीच आज शिक्षा भोगतोय, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ज्यांच्या नावाची साधी चर्चाही झाली नाही, अशा लोकांना उमेदवारी देण्यात आली. आमची नावं फायनल होऊनही आमचा पत्ता कापण्यात आला. ज्यांना तिकीट देण्यात आले त्यांनी रात्रभरात उमेदवारी अर्जासोबत लागणारी कागदपत्रं आली कशी? त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर मार्च महिन्याच्या तारखा आल्या कशा? याचा अर्थ त्यांना उमेदवारी मिळणार हे मार्चमध्येच निश्चित झाले होते. आम्हाला मात्र मूर्ख बनवून आमची फसवणूक करण्यात आली, असेही ते म्हणाले. आम्हाला डावलून इतर निष्ठावंतांना उमेदवारी दिली असते तर समजू शकलो असतो, असे सांगतानाच चंद्रकांत पाटलांसाठी ज्या मेघा कुलकर्णींनी आमदारकीची सीट सोडली. त्यांना तरी विधानपरिषदेचं तिकीट द्यायला हवं होते ना? असा सवालही त्यांनी केला. पक्षश्रेष्ठींना हा सर्व प्रकार सांगणार आहे. त्यांच्याकडून समाधान नाही झाले तर पुढचा निर्णय घेईल. पण पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही बाब टाकल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान पंतप्रधान मोदींना शिव्या घालणाऱ्या गोपीचंद पडवळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, अशी जाहीर खंत व्यक्त करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी याच विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती आणि भाजपचे ६ ते ७ आमदार मला स्वत: क्रॉस वोटिंग करणार होते. त्यांनी स्वत: माझ्याकडे असे मान्य केले होते, असा गौप्यस्फोट केला. विधान परिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, त्याचे वाईट वाटत नाही. परंतु निष्ठावंतांना डावलले याची खंत आहे. भाजपने तिकीट कापल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. निर्णय तर घ्यावा लागेल परंतु कोरोना संकटसमयी राजकारण करणे ठीक नाही. त्यामुळे मी ऑफर मान्य केली नाही, असेही ते म्हणाले.

सचिन सावंत नाराज; ट्विटरवरून काँग्रेस प्रवक्तेपद हटवले!

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना डावलून इतरांना संधी देण्यात आल्याने त्याविषयीची नाराजी आणि त्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले आहेत. काँग्रेसचे अभ्यासू व आक्रमक चेहरा असलेले प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली नाराजी मंगळवारी प्रकट केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या ट्विटर वरून काँग्रेसचे प्रवक्तेपद हटविले असल्याने अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विधान परिषदेतसाठी काँग्रेसकडून सचिन सावंत आणि विदर्भातील नेते अतुल लोंढे यांच्या नावाची मोठी चर्चा होती. अखेरच्या दिवसापर्यंत या दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल, असेच वातावरण होते. मात्र काँग्रेसने ज्यांच्या नावाचा कुठेही दबदबा नाही, फारशी ओळख नाही अशा राजेश राठोड यांना उमेदवारी दिल्याने सावंत आणि त्यांच्यासोबत लोंढेही नाराज झाले असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे सावंत यांनी मागील अनेक वर्षांपासून काँग्रेससाठी प्रामाणिकपणे काम करूनही त्यांना यावेळी विधानपरिषदेसाठी डावलले गेल्याने त्याविषयीची तीव्र नाराजी वरिष्ठांपर्यंत कळविली असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, येत्या काळात या नाराजीचे पडसाद म्हणून सावंत हे नवीन राजकीय पयार्यांचा विचार करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच सावंत यांना सेनेकडूनही ऑफर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून येत्या काही दिवसांत काँग्रेसला आपला एक अभ्यासू आणि आक्रमकपणे भूमिका मांडणारा प्रवक्ता गमवावा लागेल अशी देखील चर्चा केली जात आहे.

9 जागांसाठी 14 उमेदवारांचे अर्ज दाखल

9 जागांसाठी 14 उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केले असून यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. तर भाजपने 6, राष्ट्रवादीने 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, अपक्ष 1 असे एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असून डमी उमेदवारी अर्ज असल्याचा खुलासा केला जात आहे. उद्या नामनिर्देशनपत्राची छाननी असून यामध्ये काही उमेदवारांच्या अर्जातील त्रुटी व अपूर्ण कागदपत्रांवरून अवैध अर्ज ठरला तर पर्याय म्हणून डमी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. तर 14 मेला अर्ज माघारीचा अखेरच्या दिवशी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार अथवा लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
विधानपरिषद निवडणूक करिता खालील उमेदवारांनी अर्ज दाखल 

निवडणुकीसाठी हे आहेत उमेदवार-

विधानपरिषद पोट-निवडणूक 2020
अ.क्र.
उमेदवाराचे नाव
पक्ष
1
गोपीचंद कुंडलिक पडळकर
भारतीय जनता पार्टी
2
प्रवीण प्रभाकरराव दटके
भारतीय जनता पार्टी
3
रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील
भारतीय जनता पार्टी
4
डॉ. अजित माधवराव गोपचेडे
भारतीय जनता पार्टी
5
संदीप सुरेश लेले
भारतीय जनता पार्टी
6
रमेश काशीराम कराड
भारतीय जनता पार्टी
7
शशिकांत जयवंतराव शिंदे
राष्ट्रवादी
8
उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना
9
नीलम दिवाकर गोर्हे
शिवसेना
10
अमोल रामकृष्ण मिटकरी
राष्ट्रवादी
11
किरण जगन्नाथ पावसकर
राष्ट्रवादी
12
राजेश धोंडीराम राठोड
कॉंग्रेस
13
शहबाज अलाउद्दीन राठोड
अपक्ष
14
शिवाजीराव यशवंत गर्जे
राष्ट्रवादी

यापूर्वी अनुषंगिक वृत्त प्रसिद्ध झालेले ब्लॉग खालीलप्रमाणे -

विधान परिषद निवडणुक 2020 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
9 जागांसाठी 10 उमेदवार; उमेदवार मागे घेण्यासाठी काँग्रेसवर दबाव; ...तर निवडणुक न लढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
-विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर
विधानपरिषदेसाठी भाजपकडून मार्च मध्येच उमेदवारांची नावे निश्चित! चारही उमेदवारांचे अर्ज दाखल; असंतुष्टांमध्ये खदखद
राज्यपालांच्या निर्णयाच्या दिरंगाईवर महाविकास आघाडीची चाल!
http://prabindia.blogspot.com/2020/04/blog-post_28.html
'या' कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या सदस्य नियुक्तीची शिफारस प्रलंबित!
मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारशीला हायकोर्टात आव्हान देणारी याचिका फेटाळली
रिक्त जागांवर दुसऱ्यांदा केलेली शिफारस राज्यपाल मान्य करणार काय? मुख्यमंत्रीपदाचा निर्णय राज्यपालांच्या हाती!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित
कोरोनामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य टांगणीला! ; उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची 28 मे 2020 डेडलाईन

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.