Monday, 21 August 2017

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत ; डिंपल मेहता महापौरपदाच्या दावेदार

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते भाजपला


मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करुन सत्ता काबीज केली आहे. 24 प्रभागातील 95 जागांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेशिवसेनेला 22 जागांवर विजय मिळाला आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि मनसेल खातंही उघडता आलेलं नाही. याशिवाय अपक्षांनी दोन जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी एक उमेदवार काँग्रेस पुरस्कृत आहे.
2012 मध्ये मिरा-भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादी हा क्रमांक दोनच पक्ष होता. पण यंदा खातंही उघडता न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आयात केले होते.मुंबईपाठोपाठ मीरा-भाईंदरमध्येही गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाची एकगठ्ठा मते तसेच मराठी मतदारांचा मिळालेला पाठिंबा यामुळे भाजपला यश मिळाले असले तरी हा कल शिवसेना आणि काँग्रेससाठी भविष्यातील निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा मानला जातो. बिगर मराठी मतदार भाजपकडे वळल्याने काँग्रेसचा मतांचा टक्का घसरला तर अमराठी मतदारांनी फिरविलेली पाठ तसेच मध्यमवर्गीय मराठी मतदारांना असलेले मोदींचे आकर्षण त्यातून शिवसेनेच्या यशावर परिणाम होऊ लागला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये जैन, गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांचे प्राबल्य आहे. या मतदारांचे प्रमाण ६० टक्क्य़ांच्या आसपास आहे. ही सारी एकगठ्ठा मते तसेच मराठी मतदारांचाही मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले. मराठी वस्ती असलेल्या प्रभागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. भिवंडी, परभणी, मालेगाव महानगरपालिकांमध्ये मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मीरा-भाईंदरमध्येही अल्पसंख्यांकबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमदेवार निवडून आले आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिगर मराठी मतदारांनी भाजपला मोठय़ा प्रमाणावर मतदान केल्याचे स्पष्ट झाले होते. शिवसेना व नंतर मनसेच्या विरोधात उत्तर भारतीय मतदार काँग्रेसला मतदान करीत. पण भाजपचा पर्याय समोर आल्याने उत्तर भारतीयांचे मते ही मुंबईत भाजपला मिळतात हे २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून बघायला मिळाले. महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची वस्ती असलेल्या प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागाजिंकल्या. मुंबईतील बिगर मराठी मतदारांना भाजप जास्त जवळचा वाटू लागला आहे. ठाण्यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही मराठी तसेच अमराठी मतदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपला अनपेक्षित जागा जिंकता आल्या. मराठी मतदारांमध्ये साधारणत: मध्यवर्गीय मतदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आकर्षण आहे.मीरा-भाईंदरमध्ये जैन मतदारांची संख्या लक्षणिय आहे. दोनच वर्षांपूर्वी पर्युषण काळात मासंविक्री बंदीवरून वाद झाला होता. या पाश्र्वभूमीवर जैन धर्मगुरूंचे भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणारी चित्रफीत भाजपसाठी उपयोगी ठरली.
फायदा-तोटा 
भाजपला 30 जागांचा फायदा 
शिवसेनेला 8 जागांचा फायदा 
कॉंग्रेसला 9 जागांचा तोटा 


अंतिम निकाल
भाजप – 61 जागा
शिवसेना – 22 जागा
काँग्रेस – 10 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – 00
मनसे – 00
बहुजन विकास आघाडी – 00
अपक्ष/इतर – 02 जागा




मिरा-भाईंदर महापालिकेचा प्रभागनिहाय निकाल

प्रभाग 1
अ : सुनिता भोईर – भाजप
ब : रिटा शाह – भाजप
क : अशोक तिवारी – भाजप
ड : पंकज पांडे – भाजप

प्रभाग 2
अ : रोहिदास पाटील – भाजप
ब : गोहिल शानू जोरावर सिंह – भाजप
क : मीना कांगणे – भाजप
ड : मदन सिंह – भाजप

प्रभाग 3
अ : गणेश शेट्टी – भाजप
ब : मनिषा पिसाळ – शिवसेना
क : पल्लवी शाह – शिवसेना
ड : हन्सुकुमार कमलकुमार पांडे – शिवसेना

प्रभाग 4
अ : – गणेश भोईर – भाजप
ब : – प्रभात पाटील – भाजप
क : – कुसुम गुप्ता – शिवसेना
ड : – धनेश पाटील – शिवसेना

प्रभाग 5
अ : वंदना पाटील – भाजप
ब : मेघना रावल – भाजप
क : राकेश शाह – भाजप
ड : मुन्ना सिंह – भाजप

प्रभाग 6
अ : ध्रुवकिशोर पाटील – भाजप
ब : गीता जैन – भाजप
क : सुनिता जैन – भाजप
ड : राजेंद्र जैन – भाजप

प्रभाग 7
अ : रॉड्रिग्ज मोरस जोसेफ – भाजप
ब : रक्षा भूप्ताणी (शाह) – भाजप
क : दिपाली मोकाशी – भाजप
ड : रवी व्यास – भाजप

प्रभाग 8
अ : कॅथलिन परेरा – शिवसेना
ब : वैशाली रखवी – भाजप
क : डॉ. सुशील अग्रवाल – भाजप
ड : सुरेश खंडेलवाल – भाजप

प्रभाग 9
अ : गीता परदेशी – काँग्रेस
ब : नरेश पाटील – काँग्रेस
क : सय्यद नूरजहाँ हुसैन – काँग्रेस
ड : अमजद शेख – काँग्रेस

प्रभाग 10
अ : जयंतीलाल पाटील – शिवसेना
ब : तारा घरत – शिवसेना
क : स्नेहा पांडे – शिवसेना
ड : हरिश्चंद्र आमगावकर – शिवसेना

प्रभाग 11
अ : सचिन डोंगरे – अपक्ष
ब : वंदना पाटील – शिवसेना
क : संध्या पाटील – शिवसेना
ड : प्रविण पाटील – शिवसेना

प्रभाग 12
अ : प्रीती पाटील – भाजप
ब : डिंपल मेहता – भाजप
क : अरविंद शेट्टी – भाजप
ड : हसमुख गेहलोत – भाजप

प्रभाग 13
अ : रुपाली शिंदे – भाजप
ब : संजय अनंत थेराडे – भाजप
क : अनिता मुखर्जी – भाजप
ड : चंद्रकांत वैती – भाजप

प्रभाग 14
अ : ज्योत्स्ना होसनाळे – भाजप
ब : सुजाता पारधी – भाजप
क : सचिन म्हात्रे – भाजप
ड : मिरादेवी यादव – भाजप

प्रभाग 15
अ : मोहन म्हात्रे – भाजप
ब : सुरेखा सोनार – भाजप
क : विणा भोईर –  भाजप
ड : कमलेश भोईर – शिवसेना

प्रभाग 16
अ : – अनिता पाटील- शिवसेना
ब : – परशुराम म्हात्रे – भाजप
क : – भोईर भावना- शिवसेना
ड : – राजू भोईर – शिवसेना

प्रभाग 17
अ : आनंद मांजरेकर – भाजप
ब : दीपिका अरोरा – भाजप
क : हेमा बेलानी – भाजप
ड : प्रशांत दळवी – भाजप

प्रभाग 18
अ : दौलत गजरे – भाजप
ब : विविता नाईक – भाजप
क : नीला सोंस – भाजप
ड : विजयकुमार राय – भाजप

प्रभाग 19
अ : विद्या आंब्रे – शिवसेना
ब : मेहमुदा नागोरी – शिवसेना
क : सुभाष पांगे – शिवसेना
ड : मोहसिन फारुकी – शिवसेना

प्रभाग 20
अ : परमार हेतल – भाजप
ब : दिप्ती भट – शिवसेना
क : अश्विन कासोदारिया – भाजप
ड : दिनेश जैन – भाजप

प्रभाग 21
अ : – वंदना भावसार – भाजप
ब : – सीमा शाह – भाजप
क : – मनोज दुबे – भाजप
ड : – अनिस विराणी – भाजप

प्रभाग 22
अ : उमा सपार – काँग्रेस (बिनविरोध)
ब : अहमद साराह अकरम – काँग्रेस
क : इनामदार जुबेर अब्दुल्ला – काँग्रेस
ड : शेख अशरफ मोहम्मद इब्राहिम – काँग्रेस

प्रभाग 23
अ : जयेश भोईर – भाजप
ब : नयना म्हात्रे – भाजप
क : वर्षा भानुशाली – भाजप
ड : विनोद म्हात्रे – भाजप

प्रभाग 24
अ : –  गोविंद हेलन – शिवसेना
ब : – बगाजी शर्मिला – शिवसेना
क : – बांड्या एलायस – शिवसेना


मिरा-भाईंदरमधील एकूण २४ प्रभागांपैकी ९५ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, यापैकी एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने रविवारी ९४ जागांसाठी मतदान झाले. मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठीची आजपर्यंतची टक्केवारी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. परंतु, यंदा चुरशीच्या लढतीमुळे मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काल दिवसभर पडलेल्या पावसाने या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले. सर्वाधिक मतदान उत्तन प्रभागात ६३ टक्के इतके झाले, तर सर्वात कमी मतदान मिरा रोडच्या नयानगर येथील प्रभाग २२ मध्ये सुमारे ३५.३८ टक्के इतके झाले. मुर्धा, राई या प्रभागांतही ६० टक्के इतके मतदान झाले. उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर सुमारे ५० टक्के मतदान झाले. मात्र ९, २२ आणि १८ प्रभागांत कमी मतदान झाल्याने मतदानाची सरासरी घसरली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपले तेव्हा एकंदर ४६.९३ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी ४६.९९ इतके मतदान झाले होते.
मिरा-भाईंदरमध्ये गुजराती, मुस्लिम, उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण मोठे आहे. एकूण लोकसंख्येच्या तब्बल दोन तृतीयांश मतदार अमराठी आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांकडून मोठ्याप्रमाणावर अमराठी व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने एकूण ९० जागांवर तर शिवसेनेने ९३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसनेही ७५ जागांवर उमेदवार उभे केले होते.
95 वॉर्डपैकी एक बिनविरोध...
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांमधील 95 वॉर्डसाठी निवडणूक झाली. त्यापैकी एका वॉर्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता एकूण 509 उमेदवार निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत.
मीरा-भाईंदर महापालिकेत पहिल्यांदाच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार मिळाला आहे. 5 लाख 93 हजार 336 मतदारांपैकी 2 लाख 71 हजार 549 स्त्रिया आणि 3 लाख 21 हजार 770 पुरुष तसंच 17 तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मिरा-भाईंदर महापालिकेतील 2012 सध्याचं पक्षीय बलाबल
भाजप – 31 जागा
राष्ट्रवादी – 26 जागा
काँग्रेस – 19 जागा
शिवसेना – 14 जागा
मनसे – 1 जागा
बहुजन विकास आघाडी – 3 जागा
अपक्ष – 1
                                             Mr. Chandrakant Bhujbal - 9422323533
Political Research and Analysis Bureau (PRAB)


निवडून येण्याच्या क्षमतेवर इतर पक्षांतील खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि काही प्रमाणात काँग्रेस, शिवसेना यातील उमेदवार फोडून भाजपाचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेली पूर्वतयारी पक्षाला यशापर्यंत घेऊन गेली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी अनेक प्रभाग हेरून काही उमेदवारांना आधीच प्रचार सुरू करण्यास सांगितले होते. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत भरपूर तक्रारी होत्या. पक्षांतर्गत विरोध होता. पण, प्रत्येक प्रभागानुसार विजयाची नेमकी गणिते आखण्यात त्यांच्याइतका कोणाचाच हातखंडा नाही, हे जाणून पक्षाने त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला आणि भाजपाने मागील निवडणुकीतील ३१ जागांवरून ६१ वर झेप घेतल्याने मूळची ताकद राखत पक्ष वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यातही गुजराती, जैन, मारवाडी, उत्तर भारतीय असा ‘अमराठी’ म्हणून उल्लेख होणारा मतदार मोदीलाटेपासून भाजपाच्या सोबत आहे, यावरही शिक्कामोर्तब झाले. ते पाहता पक्षाच्या जाहीर सभांत मुख्यमंत्र्यांनी मराठीऐवजी हिंदीतून भाषणे का केली, ते समजू शकेल. शिवसेना मात्र निवडणूक रणनीतीच्या आखणीपासून कमी पडत गेली. ठाणे जिल्ह्यावर एकछत्री अंमल असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवत थेट मातोश्रीच्या संपर्कात असलेले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हाती निवडणुकीची धुरा सोपविली होती. खासदार राजन विचारे हेही त्यांच्यासोबत होते. सरनाईक यांनी मीरा-भार्इंदरमध्ये आजवर नरेंद्र मेहता यांना सांभाळून घेत राजकारण केल्याने शिवसेना संघटना म्हणून तेथे फारशी वाढलीच नाही, त्याचा फटका स्वबळावर लढताना पक्षाला बसला. भाषा आणि कृती जरी आक्रमक असली; तरी निवडणुकीच्या काळापुरते बाहेरून आणून जबाबदारी दिलेले खासदार, आमदार, नगरसेवक शेवटच्या महिनाभरात पक्षाला किती ताकद देऊ शकतात, याचे भान या निवडणुकीने शिवसेनेला दिले. भाजपाची मीरा-भार्इंदरमध्ये वाढलेली ताकद आमदार म्हणून सरनाईकांच्या आणि खासदार म्हणून राजन विचारे यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देणारी आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी पुढील वर्षभरात भाजपात जाण्याची तयारी केली होती आणि त्याआधारे पक्षात दबावगट निर्माण केला होता. पण, या निकालाने त्यांची ताकद शिवसेनेला जशी समजली, तशीच भाजपालाही. त्यामुळे त्यांच्या दोन्ही पक्षांतील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्या अर्थाने ही पालिका निवडणूक शिवसेनेवर दूरगामी परिणाम करून जाईल. जाहीरनाम्यात हिंदी भाषिक भवन उभारण्याचे आश्वासन द्यायचे आणि सभेत मात्र मराठीला विरोध केला तर तंगड्या तोडू, अशी भाषा करायची, यातील विरोधाभास शिवसेनेला स्पष्ट करता आला नाही. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांतील जवळपास निम्मे आयात आहेत आणि त्यातील निम्मी ताकद राष्ट्रवादीतून आलेल्या गिल्बर्ट मेंडोन्सा यांची आहे हे पाहता शिवसेनेने मागील १४ जागांवरून २२ वर मारलेली मजल ही ताकद वाढल्याचे दर्शवत असली, तरी आयात उमेदवार वजा केल्यावर ती कमी भरते, हे संख्याशास्त्र लक्षात घेण्याजोगे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने ज्या पद्धतीने आधीच खिंडार पाडले होते आणि नंतर माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी शिवसेनेत जाऊन आपल्यासह समर्थकांची ज्या पद्धतीने काळजी घेतली होती, ते पाहता राष्ट्रवादी या निवडणुकीत संपलेली असेल, हे निवडणुकीपूर्वीच स्पष्ट झाले होते. पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अस्तित्व उरले नव्हते आणि गणेश नाईक- संजीव नाईक या पितापुत्रांना आयत्या वेळी जबाबदारी दिल्यावर त्यांनाही त्यात रस नव्हता, हे वेळोवेळी दिसत होते. पक्षाच्या एकाही नेत्याने निवडणूक काळात मीरा- भार्इंदरला न फिरकून पक्षाला तेथून किती अपेक्षा आहेत, हे दाखवून दिले होते. त्यानुसार, पक्षाने गेल्या निवडणुकीतील २६ जागांवरून कामगिरी थेट शून्यावर आणली!काँग्रेसलाही या निवडणुकीत फटका बसला. फाटाफूट, नगरसेवकांनी दिलेली सोडचिठ्ठी यातून धक्का बसला असला, तरी त्या पक्षाने सावरण्याचा भरपूर प्रयत्न केल्याचे निवडणूक काळात जाणवले. मुस्लिम आणि उत्तर भारतीयांवर लक्ष देत पक्षाने पुन्हा पारंपरिक मतदारांना साद घातली. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन सभा घेतल्या. नंतरही पक्षातील गटबाजी फारशी दिसून आली नाही. पक्षाचे १० आणि दोन पुरस्कृत असे १२ उमेदवार विजयी झाले. मागील निवडणुकीपेक्षा सहा जागा कमी झाल्या असल्या, तरी काँग्रेसचे राष्ट्रवादीसारखे पानिपत झाले नाही. निकालानंतर काँग्रेस-शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चेमुळे ना काँग्रेसचा फायदा झाला, ना तोटा.गेल्या वर्ष-दीड वर्षात संघटना म्हणून विसविशीत झालेल्या मनसेकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष करून ते दाखवून दिले आणि मतदारांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले.साधारणत: सत्ताधाºयांना न दुखावता राजकारण करणारा बहुजन विकास आघाडी हा हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष वसई-विरारबाहेर फारसे अस्तित्व दाखवू शकत नाही, हे या निकालाने दाखवून दिले. नरेंद्र मेहता यांच्या सोबतीनेच त्यांचे आतापर्यंतचे राजकारण होते. त्यामुळे चतुर मेहता यांनी त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले. ते लक्षात आल्यावर त्यांनी स्वबळाची भाषा केली. पण, संघटनेची घडीच बसवलेली नसल्याने त्यांना काहीही कामगिरी करता आली नाही. तोच प्रकार शिवमूर्ती नाईक, मिलन म्हात्रे यांच्या संघर्ष मोर्चाचा. दुसरी भाजपा स्थापत असल्याचा आव त्यांनी आणला खरा, पण प्रत्यक्ष निवडणूक काळापर्यंत कोणीही त्यांच्यासोबत राहिले नाही आणि त्यांचे राजकीय उपद्रवमूल्य किती तोकडे होते, हे दाखवून दिले.एकंदरीतच लोकसभा निवडणुकीपासून सोबत ठेवलेली मतपेढी भाजपाने सांभाळून ठेवली आणि त्यात भरच घालण्याचे काम या निवडणुकीतून करून दाखवले.



Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.