रात्री 1 वाजता भाजप उमेदवाराचा अर्ज बाद
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक-२०१७
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ’20 ब’मधील भाजप उमेदवार नयना वसाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर रात्री एक वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज बाद ठरवला.
मीरा-भाईंदर महापालिकेसाठी 2 ऑगस्टला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर 3 ऑगस्टला अर्जाची छाननी प्रक्रिया होती. त्याचवेळी प्रभाक क्रमांक 20 ब मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सीमा जैन यांनी आपली प्रतिस्पर्धी नयना वसाणी यांच्या शपथपत्राबाबत दुपारी 1 वाजता हरकत नोंदवली होती.
नयना वसाणी यांनी आपल्या शपथपत्रात त्यांच्यावर नोंद असलेल्या एका गुन्ह्याची माहिती नमूद न केल्याचं सीमा जैन यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निदर्शनास देत, वसाणी यांच्या उमेदवारीबाबत हरकत घेतली होती. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी याबाबत दोघांच्या बाजू ऐकूण घेण्यासाठी सायंकाळ पाचची वेळ दिली.
दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुमारे पाऊण तास चर्चा केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखलेही देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी आपला निर्णय सुनावण्यासाठी रात्रीचा एक वाजवला. अर्चना कदम यांनी रात्री एक वाजता भाजपाच्या उमेदवार नयना वसाणी यांचा अर्ज बाद ठरवला.
सीमा जैन या भाजपाच्या नगरसेविका होत्या, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला सभागृहात मदत केली होती. त्यामुळे खवळलेल्या भाजपाने जैन यांच्या कार्यालयाची मोडतोड केली होती. त्यात नयना वसाणी यांचं नावही होतं. तोच गुन्हा वसाणी यांनी आपल्या शपथपत्रात नोंद केला नव्हता.
दरम्यान, भाजपाला या निवडणूकीत दुसरा धक्का बसला आहे. छाननीत काँग्रेसच्या उमेदवार उमा सपार या प्रभाग 22 अ मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
------------------------------------------------------------------------------------------
काँग्रेसच्या उमेदवाराची बिनविरोध निवड
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक-२०१७
भाईंदर-मिरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी पार पडली. त्यात मिरारोड येथील प्रभाग २२- अ मधून शिवसेनेचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेसच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे खाते उघडल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
मिरारोड नयानगर भागातील प्रभाग क्रमांक २२ अ ही जागा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्यासाठी राखीव आहे. या जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शिवसेनेकडून दक्षा गुप्ता यांनी या जागेसाठी अर्ज भरला होता. तर काँग्रेसमधून उमा सपार यांनी अर्ज भरला होता. त्यात गुप्ता यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला. त्यामुळे उमा सपार यांचा एकमेव अर्ज राहिला. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन सपार यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर ही जागा भाजपने रिपाइं आठवले गटासाठी सोडली होती व रिपाइंच्या उमेदवार उशिरा पोहोचल्याने त्यांचा अर्जच या प्रभागातून दाखल होऊ शकला नव्हता.
ही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्यासाठी राखीव असून अशा जागेसाठी अर्ज दाखल केला तर त्या उमेदवारी अर्जासोबत जातीचा दाखला किंवा जात पडताळणीचा दाखला, अथवा जात पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या प्रकरणाची पोच पावती उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक असते. शिवसेनेच्या गुप्ता यांच्या अर्जासोबत अशी पावती नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजपच्या गटनेत्याचा अर्जच बाद
मीरा रोड येथील प्रभाग क्रमांक २२ मधून काँग्रेसच्या उमेदवार उमा सपार बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या शिवसेनेच्या दक्षा गुप्ता यांचा उमेदवारी अर्ज जातीच्या दाखल्यावरून रद्दबातल करण्यात आल्याने सपार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दुसरीकडे भाजपचे गटनेते शरद पाटील यांचा पक्षाने दिलेला एबी फॉर्म छाननीच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडून नाकारण्यात आल्याने पाटील यांना पक्षाची उमेदवारी गमवावी लागली आहे. संतप्त झालेल्या पाटील यांनी पक्षाकडून आपली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
मीरा रोड येथील नयानगर भागात असलेल्या २२ अ हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग महिला यासाठी राखीव आहे. या प्रभागात काँग्रेसकडून उमा सपार आणि शिवसेनेकडून दक्षा गुप्ता यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र अर्जासोबत आवश्यक असलेली जात प्रमाणपत्र पडताळणीची पावती गुप्ता यांनी जोडली नव्हती. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुप्ता यांना लेखी कळवले आणि २ ऑगस्टपर्यंत पावती जमा करण्यास सांगितले, मात्र गुप्ता यांनी पावती सादर केली नाही. गुरुवारी अर्ज छाननीची मुदत संपून गेल्यानंतर गुप्ता पडताळणी पावती घेऊन आल्या, परंतु ती स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला, त्यामुळे गुप्ता यांची उमेदवारी रद्द झाली. या प्रभागात अन्य उमेदवार नसल्याने सपार या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
बंडखोरांना विनंती
भाजप, शिवसेना या पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने नाराजांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. आता या बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून दोन्ही पक्षांचे नेते या बंडोबांना थंड करण्याच्या मागे लागले आहेत.
शरद पाटील यांचा अर्ज फेटाळला
मिरा-भाईंदर शहरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, पालिकेतील गटनेते शरद पाटील यांचा ते राहत असलेल्या प्रभाग क्रमांक ५मधून पत्ता कापून भाजपने त्यांना बुधवारी प्रभाग क्रमांक १८मधून अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार पाटील यांनी १८मधून अर्जही भरला होता. मात्र प्रभाग क्रमांक १८मधून भाजपमधून विजय राय यांनी आधीच अर्ज भरला होता. राय व पाटील या दोघांनाही भाजपने एबी फॉर्म दिले होते. शरद पाटील यांचा अर्ज दाखल होण्याआधी भाजपमधून राय यांनी अर्ज भरला होता. राय यांचा अर्ज आधी आला. त्यामुळे त्यांचा अर्ज भाजपचे उमेदवार म्हणून स्वीकारण्यात आला. तर, शरद पाटील यांचा अर्ज अपक्ष म्हणून गणण्यात आला. यामुळे पाटील हे नाराज झाले असून त्यांचे समर्थक, कार्यकर्तेही संतप्त झाले आहेत. पक्षाने आपली फसवणूक केल्याचे सांगत पाटील यांनी प्रभाग क्रमांक १८मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक २० मध्येही भाजपने एका जागेसाठी दोन इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. या प्रभागातून दिनेश जैन यांना भाजपने अर्ज भरण्यास सांगितले व शेवटच्या दिवशी बुधवारी भावेश गांधी यांनाही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. गांधी यांचा अर्ज नंतर आल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
त्याचप्रमाणे भाईंदरच्या प्रभाग ७ मध्ये भाजपमधून रोहिणी कदम व रक्षा भूपतानी यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यात रोहिणी कदम यांचा अर्ज नंतर दाखल झाल्याने तो फेटाळण्यात आला. त्यामुळे गांधी व कदम यांनाही माघार घ्यावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.