Wednesday 30 August 2017

अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर; राजू शेट्टींची घोषणा

अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर


स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज पुण्यात केली. यापूर्वीच त्यांनी याबाबत सुतोवाच केले होते. पुण्यातील अल्पबचत भवन येथे संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर येत्या ४ सप्टेंबर रोजी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा देणार आहेत. मात्र, वस्त्रोद्योग महामंडळाचे सरकारी वाहन ते आजच महामंडाळकडे जमा करणार आहेत.
राजू शेट्टी यांनी ‘रालोआ’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना आणखी एक मंत्रिपद देण्यात येईल, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दहा दिवसांपूर्वीच कोल्हापूर येथे बोलताना केले होते. मात्र, त्यांची ही ऑफर शेट्टी यांनी धुडकावून लावत आज अखेर रालोआतून बाहेर पडल्याची घोषणा केली.
दरम्यान, शेट्टी-खोत यांच्यातील वाद चांगलाच चिघळत चालला आहे. खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करून न थांबता शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खोत आणि स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचा संबंध तुटला असल्याचे सांगून टाकले होते. खोत हे स्वाभिमानीचे प्रतिनिधी नसल्याने सरकारमधून त्यांची हकालपट्टी व्हावी अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली होती. सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवत शेट्टी यांनी ‘रालोआ’तून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेट्टी-खोत यांच्या वादातून सरकारला अडचण होऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती.
तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करुन राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ”व्यवस्थेविरोधात लढताना ताकद कमी पडत होती, त्यामुळे भाकरी बदलणं गरजेचं होतं. म्हणून तत्कालिन तळागाळातील जाणते नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वांची टीकाही सहन करुन तीन वर्ष थांबलो. पण सत्तेचा आमच्या आंदोलनाला काहीही फायदा मिळाला नाही. आमच्या वरच्या साध्या केसेस मागे घेतल्या नाहीत.”
विशेष म्हणजे, सदाभाऊ खोत यांच्यावरुन खा. शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला. ”ज्याला आम्ही सत्तेत पाठवलं, तो आम्हाला आमचा म्हणतच नाही,” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.तसेच शेतकऱ्यांचं आंदोलन आता दिल्लीत नेणार असल्याचं सांगून, राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ”संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 10 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा जतंरमंतरवर काढणार आहोत.”
दरम्यान, सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.