पुणे जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थिती ; पुणे जिल्ह्यातही शहरी मतदानाचा वाढतोय प्रभाव
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी राजकारणात आपल्या नेतृत्वाची ओळख राज्य व देश पातळीवर अधोरेखित केलेली आहे.राजकारणा बरोबरच इतर सर्व क्षेत्रात पुणे शहर व जिल्ह्याची आगळीवेगळी ओळख आहे. राज्यात भौगोलिक क्षेत्र नुसार पुणेजिल्हा दुस-या क्रमांकावर आहे. तर पुणे नागरी संकुल म्हणून देशातील आठव्या व राज्यातील दुसर्या क्रमांकाचे नागरी संकुलआहे. दिवसेंदिवस शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने ग्रामीण भागातील मतदारसंख्येपेक्षा शहरातील मतदारसंख्या तुलनेने जास्त आहे. जिल्ह्यातील राजकारणात शहरी भागाचे वर्चस्व वाढत आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीनुसार ७२ लाख २३ हजार ४२९ मतदार संख्या आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या पंचवार्षिक कालावधीत ६ लाखांची नव्याने भर पडली आहे. ग्रामीण क्षेत्रातील जिल्हापरिषद निवडणुका दरम्यान मतदारसंख्या सुमारे २७ लाख ४९ हजार १६९ इतकी होती. शहर भागातील मतदारसंख्या सुमारे ४५ लाख आहे, यामध्ये नगरपरिषद क्षेत्राचा देखील समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील राजकारणात शहरी मतदारांचा प्रभाव व महत्व दिवसेंदिवस शहरीकरणामुळे वाढत आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील राज्य व स्थानिक पातळीवरील राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वस्तरातील लोकप्रतिनिधींची पक्ष निहाय सद्यस्थिती समजून घेणे आवश्यक वाटते. पुणे जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ पुणे ,बारामती, शिरूर व मावळ असे 4 आहेत. (मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.) तर विधानसभा मतदारसंघ संख्या २१ आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटॉन्मेंट व कसबा पेठ यांचा समावेश आहे. या २१ विधानसभा मतदारसंघातील पुणे शहरात ८ तर पिंपरी-चिंचवड मध्ये ३ मतदारसंघ येतात. ऊर्वरित १० विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. याप्रमाणे लोकनियुक्त 4 खासदार व २१ आमदार आहेत. शहर व पुणे जिल्ह्यातील राज्यसभेवरील ५ खासदार (शरद पवार, वंदना चव्हाण, अमर साबळे, संजय काकडे आणि जावडेकर) व विधानपरिषदेवर ३ (शरद रणपिसे, नीलमताई गोरे, अनिल भोसले) असे आमदार आहेत. पुणे जिल्ह्यातील महसुली रचनेनुसार १४ तालुके आहेत. पुणे शहर तालुका वगळता १३ तालुक्यांना पंचायत समिती आहेत. हवेली, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव ा तालुक्यांचा समावेश होतो. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 1 जिल्हा परिषद, १३ पंचायत समिती, २ महानगरपालिका, १२ नगरपरिषद, ३ नगरपंचायत व ३ कॅन्टॉन्मेंट बोर्ड छावणी असून ग्रामपंचायत संख्या १४०१ आहेत. पुणे शहरात 34 गावे समाविष्ट करण्याच्या प्रयोजनात असून ९ गावे नुकतीच समाविष्ट करून प्रभाग रचना प्रस्तावित आहे. ग्रामपंचायत संख्या कमी जास्त होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थाची नावे विस्तारीतपणे जाणून घेऊयात 1 पुणे जिल्हा परिषद, १३ पंचायत समिती (हवेली, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव) , २ महानगरपालिका ( पुणे महानगरपालिका अ वर्ग एकूण सदस्य संख्या-१६२ तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ब वर्ग एकूण सदस्य संख्या-१२८) , १२ नगरपरिषद (बारामती नगरपरिषद अ वर्ग एकूण सदस्य संख्या-४२, तळेगाव दाभाडे नगरपरिषद ब वर्ग एकूण सदस्य संख्या-३०, दौंड नगरपरिषद ब वर्ग एकूण सदस्य संख्या-२९,लोणावळा नगरपरिषद ब वर्ग एकूण सदस्य संख्या-२९,जुन्नर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९, इंदापूर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९,शिरूर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९, जेजुरी नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९,आळंदी नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या- २०, सासवड नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या- २१, राजगुरुनगर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या- २८, भोर नगरपरिषद क वर्ग एकूण सदस्य संख्या-१९) याप्रमाणे आहे. तर ३ नगरपंचायत ( चाकण नगरपरिषद नगरपंचायत एकूण सदस्य संख्या-१२, खेड राजगुरुनगर नगरपंचायत एकूण सदस्य संख्या-१९, वडगाव मावळ नगरपंचायत एकूण सदस्य संख्या- १९) अशा १५ नगरपरिषद/नागपंचायत मधील स्वीकृतसह एकूण - ३४४ सदस्य प्रतिनिधित्व करीत आहेत. ३ कॅन्टॉन्मेंट बोर्ड छावणीमध्ये पुणे, देहूरोड, खडकी यांचा समावेश होतो. जिल्हा परिषदेसाठी ७५ गट तर १३ पंचायत समित्यांमध्ये १५० गण असे मतदारसंघ असून २२५ सदस्य लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. २ महापालिकेत स्वीकृत सदस्यांशिवाय एकूण २९० नगरसेवक लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. पुणे व जिल्ह्यात ९ खासदारांसह २४ आमदार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ८७५ सदस्य लोकनियुक्त लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच व सदस्य संख्येचा समावेश नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असून सर्वाधिक सदस्य संख्या आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीची आहे. तर नगरपरिषद/नगरपंचायतमध्ये लोणावळा, तळेगाव-दाभाडे, आळंदी या गरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष आहेत. बारामती या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत. इंदापूर, जेजुरी भोर या नगरपालिकांमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष आहेत, जुन्नर या नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा एकमेव नगराध्यक्ष आहे. इतरांकडे चार नगरपालिकांचं नगराध्यक्षपद आहेत यामध्ये दौंड – नागरिक हित आघाडी, सासवड – जनमत विकास आघाडी, शिरुर – शहर विकास आघाडी समावेश आहे. (सविस्तरपणे माहिती सोबतच्या कोष्टक पहा. ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील राजकारणाबरोबरच देशाच्या व राज्याच्या राजकारणात कित्येक दशके आपले वर्चस्व राखले आहे. खासदार शरद पवार केंद्रित जिल्हा व राज्याच्या राजकारणाची वाटचाल सुरु आहे. पुणे शहरातील राजकारणात माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी काही काळ आपल्या केंद्रित राजकारण खिळवून ठेवले होते त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट पुणे शहर व जिल्ह्यातील राजकारणाचे नेतृत्व प्रामुख्याने करीत आहेत. खासदार शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वावर जिल्हा व शहरातील राजकारणाची वाटचाल सुरु आहे. राज्याप्रमाणे खासदार शरद पवार यांना संपूर्णपणे शहर व जिल्हा केव्हाच एकहाती राखता आलेला नाही. लोकसभा मतदारसंघातील २ मतदारसंघ व २१ मधील ८ ते १० विधानसभा मतदारसंघ कायम विरोधात राहिले आहेत. या मतदारसंघातील मतदारांचे मन वळविण्यास त्यांना व त्यांच्या पक्षाला शक्य झाले नाही. सध्या जिल्ह्यात लोकनियुक्त कॉंग्रेसचे प्रभावशील नेतृत्व राहिले नाही तर राष्ट्रवादीनंतर भाजपने शहर व जिल्ह्यात पक्ष विस्तार करून सध्या वर्चस्व राखले आहे. शिवसेना व इतर पक्षांचे महत्व मर्यादित राहिले आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये निर्विवाद भाजपने सत्ता राखली असून शहरातील ८ तर उर्वरित ३ विधानसभा मतदारसंघात भाजपने मताधिक्य घेऊन शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणावर मात केली आहे. शिवसेना व काँग्रेसने काही मतदारसंघात लोकप्रतिनिधीत्व राखले असले तरी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाआघाडी व युती होण्याच्या शक्यता अशक्यता यावर जिल्ह्यातील राजकारणातील पक्षीय वर्चस्व अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील २१ आमदारांमध्ये सर्वाधिक भाजपचे ११ तर शिवसेनेचे ३ आणि राष्ट्रवादी 3 व काँग्रेसचे 1 आमदार आहेत. मनसे, रासप, अपक्ष प्रत्येकी 1 असे आमदार आहेत. ( मावळ विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), शिरुर विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), हडपसर विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), पर्वती विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), खडकवासला विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), कोथरूड विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), चिंचवड विधानसभा मतदारसंघ (2014 -BJP), भोर विधानसभा मतदारसंघ (2014-INC), भोसरी विधानसभा मतदारसंघ (2014-IND), जुन्नर विधानसभा मतदारसंघ (2014-MNS), आंबेगाव विधानसभा मतदारसंघ (2014-NCP), इंदापूर विधानसभा मतदारसंघ (2014-NCP), बारामती विधानसभा मतदारसंघ (2014-NCP), दौंड विधानसभा मतदारसंघ (2014-RSP), खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ (2014-SENA), पुरंदर विधानसभा मतदारसंघ (2014-SENA), पिंपरी विधानसभा मतदारसंघ (2014-SENA).) जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसची मक्तेदारी भाजप-सेनेनी मोडीत काढलेली असल्याने सर्वाधिक अस्वस्थता राष्ट्रवादी नेतृत्वाला आहे. 4 लोकसभा मतदारसंघातील २ शिवसेना तसेच भाजप व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 1 जागांवर ोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसचा झालेला दारूण पराभव आणि भाजपला मिळालेले घवघवीत यश हे मतदारांनी भरभरून दिलेल्या मतांमुळे झाले असल्याचा विश्वास राष्ट्रवादी-काँग्रेस नेतृत्वाला बसत नाही. अपयशाचे खापर सर्वस्वी इव्हीएम मशीनवर सोयीस्करपणे फोडले गेले. पारंपरिकता राष्ट्रवादी-काँग्रेसला मानणारे मतदार आणि त्यांच्या परिवर्तनाची जडणघडणीचे प्रमुख कारण गेली 4 वर्ष शोधूनही सापडत नसल्याची स्थिती राजकीय पक्षांमध्ये दिसून येते. आगामी निवडणुकीत नव्याने राजकीय समीकरणे उदयास येतील कारण आजची राजकीय स्थिती सुधारण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून केला जात आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे झालेला लढतीने सर्वच प्रमुख\ पक्षांची ताकद समजलेली आहे. लोकसभेला झालेली युती व आघाडीचा प्रयोग आगामी दोन्ही निवडणुकांमध्ये होईल का यावरून लढतीचे चित्र स्पष्ट होईल. राष्ट्रवादीकडून मनसेला होत असलेला गोंजारण्याचा प्रयत्न आणि आपसातील युतीचा लाभ कितपत होईल हे देखील आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईलच. 4 लोकसभा मतदारसंघ व त्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा निहाय राजकीय सद्यस्थिती जाणून घेऊया.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
मावळ लोकसभा मतदारसंघ व अंतर्गत विधानसभा सद्यस्थिती
पुर्नरचनेनंतर नव्याने भाग समाविष्ट झालेल्या या नव्या मावळ लोकसभा मतदार संघात पुणे, रायगड या जिल्ह्यातील तालूक्याचा समावेश असल्याने संमिश्र राजकीय पक्षांचा प्रभाव आहे. 2009 व 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सलग दुसर्यांदा शिवसेनेने या मतदारसंघात यश मिळवून वर्चस्व राखले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी 1 लाख 57 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून यश संपादन केले होते. मावळ लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणार्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी भाजपकडे 3, शिवसेनेकडे 2 तर राष्ट्रवादीकडे 1 विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी राजकीय अस्थिर भुमिका घेऊन पक्षांतर केल्याचा लाभ बारणे यांना मिळाला. ऐन वेळी राष्ट्रवादीला बाहेरून उमेदवार आयात करावा लागला. या राजकीय स्थितीचा फायदा शिवसेनेला झालेला होता. मात्र सध्या अनुकूल परिस्थिती राहिलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार निवडणुक रिंगणात असले तरी युती न झाल्यास त्यांचे भवितव्य धोक्यात आहे. भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर देखील इच्छूक आहेत. संभाव्य जागा वाटप व युती/आघाडीच्या शक्यता-अशक्यतेवर या मतदारसंघातील राजकीय गणित अवलंबून आहे. शिवसेनेबरोबरच भाजपने या मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. युती न झाल्यास शिवसेनेला हि जागा राखण्यास कठिण जाणार आहे. तर राष्ट्रवादी कडून या परिस्थितीचा राजकीय लाभ कसा घेतला जाऊ शकतो यावर त्यांच्या यशाचे गणित अवलंबून राहणार आहे. या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. विद्यमान आमदार बाळा भेगडे यांच्या सलग दुसर्यांदा तर भाजपचा सलग पाचव्यांदा या मतदारसंघातील यश मिळवले आहे. 1990 पर्यंत काँग्रेसने नेतृत्व राखले होते. आगामी निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचेच राजकीय वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसला अनेकदा प्रयत्न करूनही या मतदारसंघात यश मिळविता आले नाही. तर पुनर्रचनेनंतर नवनिर्वाचित असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने गत वेळी यश मिळविले आहे. अनुसूचित जातीकरीता राखीव असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीने 2009 मध्ये अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून यश संपादन केले होते. राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात कुशल नेतृत्व नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना यश मिळणे दुरापस्त आहे. शिवसेनेला अनुकूल मतदारसंघ असला तरी महापालिकेतील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या भरघोस यशामुळे सहज यश मिळेल असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली तरच शिवसेनेला मतदारसंघ राखता येईल अशी स्थिती आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघ सद्या भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप नेतृत्व करीत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे तुल्यबळ नेतृत्व नसले तरी जगताप यांच्या एकाधिकारशाही विरोधातील वातावरणाचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतात यावर त्यांना यश मिळविण्याची आशा आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवलेला आहे अशी राजकीय सद्यस्थिती आहे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
पुणे लोकसभा मतदारसंघ व अंतर्गत विधानसभा सद्यस्थिती
पुणे लोकसभा मतदारसंघ 1977 आणि 1991 तसेच 1999 चा अपवाद वगळता काँगे्रसने या मतदारसंघावर पकड कायम ठेवली होती. मात्र भाजपने पुन्हा या मतदार संघावर वर्चस्व निर्माण केले असून 2014 च्यानिवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी तब्बल 3 लाख 15 हजारांहुन अधिक मतांधिक्यांनी यश संपादन केले होते. पुणे लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणार्या सहा विधानसभा मतदार
संघापैकी सर्व 6 मतदारसंघ भाजपकडे आहेत. पुणे लोकससभा मतदारसंघात ेला असून लोकसभा िवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघा अंतर्गत येणार्या सर्वच्या सर्व जागा मिळवून भाजपने वर्चस्व राखले आहे. महापालिका निवडणुकीत देखील बहुमत मिळवून आगामी निवडणुकांकरीता अनुकूल स्थिती निर्माण केली आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान खासदार अनिल शिरोळे तसेच पालकमंत्री गिरीश बापट व सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या बरोबरच शहराध्यक्ष योगश गोगावले देखील इच्छूक आहेत. काँग्रेसकडे मोहन जोशी यांच्या शिवाय इतर उत्साही उमेदवार इच्छूक नाहीत. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर या मतदारसंघातील संभाव्य राजकीय भवितव्य ठरणार आहे. राष्ट्रवादीने या जागेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्याकडे प्रभावी इच्छूक उमेदवार दिसून येत नाही. तर या लोकसभा मतदारसंघात येणार्या 6 विधानसभा मतदारसंघ येत असून यामध्ये कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती, वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेेंट यांचा समावेश आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात युतीमुळे शिवसेनेने अनेकदा यश मिळविले होते. मात्र गेल्या निवडणुकीत स्वतत्रंरित्या लढल्यामुळे भाजपने यश मिळविले आहे. आगामी काळात युती होण्याच्या शक्यतेवर राजकीय गणित अवलंबून असले तरी भाजपचे या मतदारसंघातील निर्विवाद वर्चस्व कायम राहील अशी स्थिती आहे. शिवसेनेतील संघटनात्मक कार्य कमकूवत झालेले असून अंतर्गत गटबाजीचा फटका सेनेला या मतदारसंघासह शहरातील इतर मतदारसंघात बसेल अशी स्थिती आहे. तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मोदी लाटेत विद्यमान आमदार विजय काळे यांनी यश मिळविले असले तरी आगामी निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळेल अशी शक्यता नसल्याची स्थिती आहे. या मतदारसंघात युतीमुळे 4 वेळा शिवसेने यश संपादन केले असून भाजपने दोन वेळा तर काँग्रेस व इतर पक्षांनी दोन वेळा लोकप्रतिनिधीत्व केले आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले विनायक निम्हण पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचा घाट घालत होते. मात्र काँग्रेसमधून त्यांना विरोध झाल्यामुळे त्यांची आगामी निवडणुकांमधील भुमिका गुलदस्त्यात आहे. तर महापालिका निवडणुकीत पत्नीचा अवमान झाल्याने नाराज होऊन भाजपमधून पालिकेत यश मिळविल्याच्या घटनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदार अनिल भोसले हे राष्ट्रवादीपासून दूरावलेले आहेत. त्यांची भूमिकादेखील माजी आमदार विनायक निम्हण यांच्यासारखी संदिग्ध आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अंकूश काकडे व अनिल भोसले यांनी पराभव पत्करलेला आहे. या मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीकडे या नेतृत्वापैकी प्रभावशील इच्छूक उमेदवार नसल्याची स्थिती दिसून येते. ऐनवेळी आघाडी व युती होण्याच्या शक्यतेवर तसेच नवख्या उमेदवाराच्या राजकीय रणनीतीवर या मतदारसंघातील आगामी निवडणुक काळातील नेतृत्व अवलंबून असेल. कसबा मतदारसंघात विद्यमान आमदार व पालकमंत्री गिरीष बापट यांचा प्रभाव आहे तर पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरीताई मिसाळ यांनी सलग दोन वेळा यश संपादन करून वर्चस्व राखलेले आहे. पर्वती मतदारसंघात काँग्रेसने 4 वेळा तर भाजपने 4 वेळा लोकप्रतिनिधीत्व केलेले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेसला सलग पराभवाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसचे आबा बागुल या मतदारसंघात तीव्र इच्छूक आहेत. कार्यकर्तृत्वावर या मतदारसंघात विद्यमान आमदारांवर आपण मात करू असा त्यांचा विश्वास कितपत सार्थ ठरेल ते आघाडीतील जागा वाटपावर अवलंबून असेल. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विद्यमान आमदार व सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी राखीव असलेल्या मतदारसंघातील नेतृत्व करीत असून त्यांनी यापूर्वी राखीव असलेल्या पर्वतीमधून यश संपादन केले होते. पुनर्रचनेनंतर समाविष्ट भाग बदलण्यात आला. यापूर्वीच्या मतदारसंघात काँग्रेसने अनेकदा लोकप्रतिनिधीत्व केलेले होत. तर वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित पराभवाचा सामना राष्ट्रवादीला करावा लागला होता. माजी आमदार बापु पठारे यांच्या पाणी टँकर व इतर नकारात्मक कार्यामुळे या मतदारसंघात नवखे असलेले विद्यमान आमदार जगदिश मुळीक यांनी सहज यश संपादन केले होते. मात्र सद्यस्थितीत त्यांची असक्रिय कार्यपद्धत या मतदारसंघात नागरिकांना रुचत नाही. त्यामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत यश संपादन करणे दुरापस्त वाटत असल्याची सद्यस्थिती आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
बारामती लोकसभा मतदारसंघ व अंतर्गत विधानसभा सद्यस्थिती
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुनर्रचनेनंतर पुणे शहरालगतचा भाग समाविष्ट झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मताधिक्यात ङ्गरक पडला असून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मताधिक्यात घट झाली असून राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केवळ 69 हजार 719 मताधिक्य मिळवून यश संपादन केले होते. या मतदारसंघा अंतर्गत येणार्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादीकडे 2, तर शिवसेना, भाजप व समाजवादी पक्षाकडे प्रत्येकी 1 मतदारसंघ आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मताधिक्यात घट झाल्याने राष्ट्रवादीमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ सहा पैकी 2 जागांवर राष्ट्रवादीला यश आले. सामान्य मतदारांपासून दुरावलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि जनतेशी संवाद नसलेल्या व्यक्तींना केलेली पदांची खैरात यामुळे नाराजीचा फटका निवडणुकीत बसला. तसेच पुरंदर, भोर, दौंड व खडकवासला मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे मतदानात घट झाली. महायुतीने रासपला जागा सोडल्याने येथून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अपेक्षेपेक्षा चांगले मतदान घेतले होते. या मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीचा इतर पक्षांच्या तुलनेत प्रभाव आहे. गतवेळी निवडणुक लढविलेले विद्यमान आमदार व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यावेळी लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपकडून प्रभावी संभाव्य उमेदवार कोण असेल यावर देखील लढत अवलंबून आहे. या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे मतदारांशी व स्थानिक लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद ठेवून आहेत. त्यांनी संवादाच्या माध्यमातून आपला प्रभाव निर्माण केला असून आगामी विरोधी पक्ष व नेत्यांच्या रणनीतीवरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र अवलंबून असेल. या मतदारसंघात येणार्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी पुरंदर व इंदापूर, भोर यामध्ये राष्ट्रवादी शिवाय इतर काँग्रेस व शिवसेनेचा प्रभाव आहे. बारामती मतदारसंघातील वर्चस्व सोडले तर इतर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला कुशल नेतृत्वनिवड व संघटनात्मक सक्रियतेच्या जोरावर वातावरण निर्मिती केली तर यश मिळू शकते अशी राजकीय सद्यस्थिती आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र निवडणुका लढल्यामुळे गतवेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी यश मिळविले होते. ते आगामी निवडणुकीत कायम राखण्यासाठी आघाडी मध्ये जागा वाटपाच्या निर्णयावर अवलंबून आहे. या जागेवरून दोन्ही काँग्रेसमध्ये वाद आहे. याचा परिणाम आगामी निवडणूकीत दिसून येईलच. तसेच पुरंदर विधानसभा मतदारसंघ कायमच राष्ट्रवादी विरोधी राहिलेला आहे. जनता दलाच्या माध्यमातून दादा जाधवराव यांनी 5 वेळा यश मिळवून वर्चस्व राखले होते. राष्ट्रवादीने त्यावेळी नवखे उमेदवार देऊन माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या माध्यमातून यश मिळविले होते. मात्र राष्ट्रवादीला अंतर्गत कुरघोडीचा फटका बसल्याने पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसच्या माध्यमातून जाधवराव यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी जगताप यांनी कायम लढत देऊन दुसर्या क्रमांकाची मते राखली आहेत. विद्यमान आमदार व जलसंधारणमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर सलग दोन वेळा शिवसेनेच्या माध्यमातून यश मिळविले आहे. पाण्याचे राजकारण व प्रारंभी केलेली पाण्याच्या प्रश्नावरून थेट राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतरांवर केलेल्या टोकाच्या टिकेमुळे त्यांनी मतदारांवर प्रभाव निर्माण करून यश संपादन केले. मात्र वाढत्या व्यापाबरोबरच त्यांची नाळ स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर तुटलेली असून नकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचा फटका त्यांना आगामी काळात बसू शकतो. गुंजवणी धरण पाणी पुरवठा व नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे शहर पाणी पुरवठामधील टोकाचा हस्तक्षेप तसेच वैयक्तिक व्यवसायातील करून घेतलेली भरभराट याचा परिणाम त्यांच्या यशावर होईल अशी सद्यस्थिती आहे. भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या माध्यमातून विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखले आहे. नुकत्याच झालेल्या भोर नगरपरिषदेत देखील बहुमत मिळवून आगामी निवडणुकीतील यशाची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे. या मतदारसंघात शिवसेना व इतर पक्षांकडे राजकीय रणनीतीचा अभाव व मतदारांशी असंवाद यामुळे त्यांना यश मिळत नसल्याची स्थिती आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रभाव स्थानिक पातळीवर असला तरी अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना वारंवार पराभवाला सामोरे जावे लागत आहे. विद्यमान आमदार भिमराव तापकिर यांनी सलग दोन वेळा यश संपादन केले आहे. पुनर्रचनेत निर्माण झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात वैयक्तिक लोकप्रियतेच्या जोरावर मनसेच्या माध्यमातून रमेश वांजळे यांनी यश संपादन केले होते. मात्र त्यांच्या आकस्मित निधनाने येथील राजकीय वातावरण बदलून गेले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचे वर्चस्व नसले तरी विरोधकांच्या अंतर्गत गटबाजीचा लाभ मिळत असल्याने आगामी निवडणुकीत देखील अशीच स्थिती कायम राहिल्यास ती भाजपलाच अनुकूल असेल अशी सद्यस्थिती आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात दोन नेतृत्वाच्या अंतर्गत राजकारणाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे रासपाची उमेदवारी घेऊन सहानुभूतीचा लाभ मिळवित विद्यमान आमदार राहुल कुल यांनी यश संपादन केले होते. राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीतील लढत निश्चित झालेली असल्याने या मतदारसंघात राजकीय रणनीतीवर यश-अपयश अवलंबून राहणार आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
शिरूर लोकसभा मतदारसंघ व अंतर्गत विधानसभा सद्यस्थिती
शिरूर या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने आपला प्रभाव निर्माण केला आहे. पुर्नरचनेत नव्याने सामाविष्ट असलेल्या भागातून निर्माण झालेल्या या मतदार संघावर शिवसेनेने आपली पकड विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या माध्यमातून कायम ठेवली आहे. या लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणार्या सहा विधानसभा मतदार संघापैकी भाजपकडे 2 तर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, अपक्ष यांच्याकडे प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघ आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला प्रभाव कायम ठेवला असून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क राखला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघापैकी आंबेगाव वगळता इतर मतदारसंघात राष्ट्रवादीला दुसर्या व तिसर्या क्रमांकाची पसंती मतदारांनी दिली होती. आंतरराष्ट्रीय नियोजित विमानतळ पुरंदर तालुक्यात गेल्यामुळे त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका विरोधकांकडून ठेवला जात असला तरी राज्य सरकारने खेड तालुक्यात विमानतळ न होण्याची तांत्रिक कारणे लेखी स्वरूपात दिली असल्यामुळे हा आरोप निष्फळ ठरला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांचे निर्विवाद वर्चस्व शिवसेनेच्या माध्यमातून कायम राखले जाईल अशी स्थिती आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून या भागातील नेते व विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील निवडणुक लढवित नसल्याने राष्ट्रवादीमध्ये नकारात्मक संदेश जात असल्याने इतर उमेदवारांना यश मिळत नसल्याची स्थिती आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आपला प्रभाव कायम राखलेला आहे. तर जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतील व शिवसेनेतील काही पदाधिकार्यांच्या नकारात्मक प्रतिमेमुळे मनसेच्या माध्यमातून विद्यमान आमदार शरद सोनवने यांनी गतवेळी यश मिळवले होते. आगामी निवडणुकीकरीता गेल्यावेळी सारखी राजकीय स्थिती राहिलेली नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रभावाच्या तुलनेने शिवसेनेचा प्रभाव काही स्थानिक पदाधिकार्यांच्या घटनांमुळे कमी झालेला आहे. शिवसेनेने तसेच राष्ट्रवादीने नवखा उमेदवार दिला तर संभाव्य लढत चुरशीची होऊन युती व आघाडीच्या शक्यतेवर येईल यश अवलंबून राहिल. खेड, आळंदी, विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याने तसेच उमेदवारी डावलल्याने शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुक लढवून सहानुभूतीच्या जोरावर यश संपादन केलेले विद्यमान आमदार सुरेश गोरे यांचा आगामी निवडणुकीतील प्रभाव कायम राहिल अशी स्थिती आहे. इतर इच्छूक उमेदवारांकडून प्रभावशील कार्य व त्यांची प्रतिमा नसल्याने या मतदारसंघात यश मिळविण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्याची गरज आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांच्या निर्माण झालेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी यश संपादन केले होते. मात्र आगामी निवडणुकीत त्यांना गेल्यावेळी सारखी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसल्याने त्यांना पुन्हा यश मिळणे कठीण आहे. या मतदारसंघात अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला यश दूरापस्त झाले आहे तर भाजप व शिवसेनेकडे प्रभावी नेतृत्व नसले तरी गावकी-भावकीच्या राजकारणातील नवखे नेतृत्व संघटनात्मक बांधणीच्या जोरावर यश मिळविण्याचा प्रयत्न केल्यास निश्चित बदल होऊ शकेल अशी स्थिती आहे. राष्ट्रवादीने देखील नव्या चेहर्याला संधी दिल्यास येथील राजकारणात अनुकूल बदल होऊ शकेल अशी राजकीय सद्यस्थिती आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपने गेल्यावेळी यश मिळविले असले तरी वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांकडून होत असल्याने विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांची प्रतिमा मलिन होत आहे. विरोधकांना नकारात्मक वातावरण निर्मिती करण्याची संधी मिळत असल्याने त्याचा फटका भाजपला निश्चित बसू शकेल. मात्र शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये इच्छूक उमेदवारांमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्याप्रमाणावर आहे. ती थोपवल्यास यशाकडे वाटचाल होऊ शकते. मनसेचे पदाधिकारी या मतदारसंघात यश मिळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना परिपूर्ण यश मिळणे अशक्य असून त्यांच्या निवडणुक लढविण्याचा व मते घेण्याचा लाभ प्रतिस्पर्धी पक्षांनाच मिळत असल्याची स्थिती या मतदारसंघात आहे. भाजपने मतदारसंघ राखण्यासाठी आरोपांचे खंडन करून विकासात्मक कार्याची मतदारांना माहिती पोहचविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीतून दिसून येऊ शकेल अशी स्थिती आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात भाजपने प्रभाव कायम ठेवला असला तरी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला लाभ होत आहे. राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी रोखणे हाच आगामी निवडणुकीतील यशाचा प्रमुख मार्ग असेल या मतदारसंघातील शिरूर व हवेलीतील काही भागांमुळे क्षेत्रनिहाय नेतृत्वावरून अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसत आहे. शिरूर मतदारसंघात भाजपने पुन्हा यश संपादन करण्यासाठी अनुकूल राजकीय स्थिती निर्माण करण्याची गरज आहे.सदरील लेख लोकमत उत्सव दिवाळी अंक २०१८ मध्ये पान क्र. ५७ ते ६५ वर प्रकाशित झालेला आहे.
चंद्रकांत संपत भुजबळ
अध्यक्ष, पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
bhujbalchandrakant@gmail.com
ph. 9422323533
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.