Saturday, 4 January 2020

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या शिवकन्या शिरसाट

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवकन्या शिरसाट

बीड जिल्हा परिषदेवर सुद्धा महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला आहे. येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवकन्या शिरसाट आणि उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी दाखल केली होती. या दोन्ही उमेदवारांना शनिवारच्या मतदानानंतर विजयी घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करतानाच बीड जिल्ह्यातून भाजपने माघार घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे ट्विट चांगलेच चर्चेत आले. यामध्ये त्यांनी निकाल निश्चितच असल्याने आपण केवळ औपचारिकता म्हणून सहभाग घेत असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे या सध्या परदेशात आहे. त्यांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे सोपवली आहे. तर शिवसंग्राम संघटनेच्या विनायक मेंटेंनी आपल्या सदस्यांना व्हीप बजावला. बीड जिल्हा परिषद निवडणुकीत काट्याची टक्कर होत असताना, बीडच्या नेत्या पंकजा मुंडे परदेशात असल्याने त्यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे नाहीत.  नेमकं याचवेळी परदेश दौऱ्याने मतदारसंघात कुजबूज सुरु आहे.बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औरंगाबाद येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्या शिवकन्या सिरसाठ यांचे नाव अध्यक्षपदासाठी तर नागरगावचे जिल्हा परिषद सदस्य जयसिंह सोळंके यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. जयसिंह सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत. बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल – राष्ट्रवादी काँग्रेस – 19, काँग्रेस – 03, भाजपा – 19, शिवसेना – 04, काकू – नाना आघाडी – 02, अपक्ष – 02, शिवसंग्राम – 04 ( मात्र सर्व सदस्य भाजपवासी झाले). बीड जिल्हा परीषदेतील बहुमताचा आकडा राष्ट्रवादी काँग्रेसने पार केला आहे. भाजपच्या सविता मस्के, शोभा संजय नवले, शोभा दरेकर, निता सतिश शिंदे, शिवसेनेचे चार आणि काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख, आशा संजय दौंड आणि राष्ट्रवादीचे स्वतःचे 21 असे मिळून 31 संख्याबळ झाले आहे. राष्ट्रवादीच्या आपसात ठरलेल्या फॉर्म्यूल्यानुसार अध्यक्षपद ना. धनंजय मुंडे गटाला तर उपाध्यक्षपद बजरंग सोनवणे यांना देण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार धनंजय मुंडे गटाकडून शिवकन्या सिरसाट आणि बजरंग सोनवणे यांची नावे अंतिम झाली आहेत. आज जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड होत असली तरी 13 जानेवारीपर्यंत ही निवड जाहीर न करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत. आ.सुरेश धस गटाचे 4 व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाच्या एका सदस्याला यापुर्वी पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र करण्यात आलेले होते. या पाचही सदस्यांनी खंडपीठात धाव घेऊन मतदानाचा अधिकार देण्याची याचिका दाखल केली होती. याचिकेवर 13 जानेवारी रोजी अंतिम निर्णय होणार आहे.
=======================

परभणी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी पॅटर्न यशस्वी, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला विटेकर

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न परभणी जिल्हा परिषदेतही यशस्वी झाला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे तर शिवसेना आणि काँग्रेसला सभापती पद अशी सत्तेची वाटणी करण्यात आल्याने मागच्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेच्या,नाराजीच्या नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे. अध्यक्षपदी निर्मल विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष आहे. त्यातच राज्यात महाविकास आघाडी झाल्याने इथेही एकत्र मिळून सत्ता स्थापन करावी असे पक्षाचे आदेश आले. मात्र जिल्हा परिषद ताब्यात असावी यासाठी राष्ट्रवादी चे आजी माजी आमदार यांच्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. विद्यमान अध्यक्ष माजी आमदार विजय भांबळे गटाचा असल्याने यावेळी पुन्हा आपलाच अध्यक्ष व्हावा यासाठी भांबळे आग्रही होते. परंतु बहुतांश सदस्य आणि स्थानिक नेत्यांच्या मर्जीमुळे तीन दिवस चर्चा झाल्यानंतर अध्यक्ष पद हे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या गटाच्या निर्मला विटेकर यांना देण्यावर एकमत झाले. परंतु सदस्य संख्येवर उपाध्यक्ष मिळावे यासाठी शिवसेनेने जोर धरला म्हणून माजी आमदार विजय भांबळे हे नाराज झाले त्यांनी किमान उपाध्यक्ष पद आपल्या गटाच्या सदस्याला मिळावे यासाठी पुन्हा पक्षश्रेठींकडे दाद मागितली त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी चे आमदार बाबाजानी दुर्रानी, शिवसेना आमदार राहुल पाटील आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्यात आज सकाळी राहुल पाटील यांच्या घरी जवळपास तीन तास बैठक झाली. भांबळे यांनी जास्तच आग्रह धरल्याने शवेटी त्यांच्या गटाचे अजय चौधरी यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली आणि शिवसेना व काँग्रेसला एक एक सभापती पद देऊन हि निवडणूक बिनविरोध करण्यावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाले. अर्ज दाखल करण्याच्या दहा मिनिट आधी अध्यक्ष म्हणून निर्मला विटेकर आणि उपाध्यक्ष म्हणून अजय चौधरी यांचे अर्ज दाखल झाले. पीठासीन अधिकारी डॉ सूचित शिंदे यांनी या दोघांची निवड झाल्याचे जाहीर केले आणि समर्थकांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.
=======================

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या संध्या गुरनुले


चंद्रपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या संध्या गुरनुले यांचा विजय झाला आहे. ३६ विरूध्द २० मतांनी काँग्रेस उमेदवार वैशाली शेरकी यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपच्या रेखा कारेकार विजयी झाल्या असून ३६ विरूध्द २० मतांनी काँग्रेसच्या खेमराज मरसकोल्हे यांचा पराभव केला. जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. ज्येष्ठ सदस्य संध्या गुरनुले अध्यक्ष, तर रेखा कारेकर या उपाध्यक्षपदी निवडून आल्या. ५६ सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३६ एवढे संख्याबळ आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवडणूक एकतर्फी होण्यासाठी काळजी घेतली होती. नतुन अध्यक्ष संध्या गुरनुले या दुसऱ्यांदा या पदावर विराजमान झाल्या. यावेळी हे पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होते. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुधीर मुनगंटीवार यांनीही जिल्हा परिषदेत जाऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून जनसेवेचे आश्वासन दिले. नव्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांनीही, पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
=================================

जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व कायम

एकनाथ खडसे यांच्या अस्वस्थतेमुळे सर्वाचे लक्ष लागलेल्या जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीत दोन्ही पदांवर विजय मिळवत भाजपने आपली सत्ता कायम राखली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य भाजपला जाऊन मिळाल्याने महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला. अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली.  भाजपकडून अध्यक्षपदासाठी रावेर तालुक्यातील ऐनपूर-खिरवड गटाच्या सदस्य रंजना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्षपदासाठी जळगाव तालुक्यातील नशिराबाद-भादली गटाचे सदस्य लालचंद पाटील हे उमेदवार होते. रंजना पाटील आणि लालचंद पाटील यांना प्रत्येकी ३३ तर विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार रेखा राजपूत आणि जयश्री पाटील यांना प्रत्येकी ३१ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या सदस्या मीना पाटील, काँग्रेसचे सदस्य दिलीप पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. निवडणुकीच्या दिवशी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीबाबत बरीच चर्चा झाली होती. दुसरीकडे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल, असा दावा केला होता. प्रत्यक्षात भाजप नेत्यांच्या खेळीपुढे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. सत्ता कायम राखण्यात यश आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. दगाफटका टाळण्यासाठी भाजपचे सर्व सदस्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अज्ञातस्थळी सहलीला रवाना झाले होते. त्यांचे थेट मतदानासाठी जिल्हा परिषदेत खासगी बसने आगमन झाले. या वेळी काँग्रेसचे सदस्य दिलीप पाटील यांना भाजप सदस्यांनी अक्षरश: पकडून आणले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी पक्षाच्या चारही सदस्यांना महाविकास आघाडीला मतदान करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी पक्षादेश बजावण्यात आला होता. त्यानंतरही काँग्रेसचे सदस्य पाटील हे विरोधात गेले. याशिवाय राष्ट्रवादीच्या मीना पाटील यांनी भाजपला मतदान केले. त्यामुळे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.
============================

रायगड जिल्हाध्यक्षपदी ‘शेकाप’च्या योगिता पारधी

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शेकापच्या योगिता पारधी, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेने पक्षनेतृत्वाच्या सूचनेनुसार निवडणूक लढवली नाही. त्यामुळे शेकाप आणि राष्ट्रवादीप्रणीत आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे शेकापकडून योगिता पारधी यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी अर्ज दाखल केला. पक्षनेतृत्वाच्या सूचनेनुसार शिवसेनेकडून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा परिषदेची विशेष सभा शिवतीर्थावरील प्रभाकर पाटील सभागृहात पार पडली. या वेळी शेकापचे २३, राष्ट्रवादी ११, काँग्रेस ३ आणि शिवसेनेचे १७ असे एकूण ५४ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. भाजपचे ३ तर, शिवसेनेच्या मानसी दळवी असे एकूण चार सदस्य गैरहजर राहिले. पिठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी काम पाहिले. या वेळी प्रांताधिकारी शारदा पोवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्यावरून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दक्षिण रायगडमधील जिल्हा परिषद सदस्य शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेससमवेत सत्तेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत. मात्र उत्तर रायगडमधील सदस्य शेकापशी जुळवून घेण्यास तयार नाहीत. शेकापची साथ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दर्शविल्याने जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी करण्याबाबतचा निर्णय होऊ  शकला नाही. अखेर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवू नका, अशी सूचना पक्षनेतृत्वाकडून शिवसेनेच्या सदस्यांना प्राप्त झाली. त्यामुळे इच्छकांचा हिरमोड झाला.

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्रे, उपाध्यक्षपदी सोळुंके

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या सोमवारी (ता. सहा) झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे लोहारा (ता. उदगीर) गटाचे सदस्य राहूल केंद्रे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी अंबुलगा बु. (ता. निलंगा) गटाच्या सदस्या भारतबाई सोळुंके यांची बिनविरोध निवड झाली. कॉंग्रेसच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. यामुळे गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय उलथापालथीबाबत होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. भाजपच्या काही सदस्यांचा गट फुटून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या गटाला मदत करणार असल्याची चर्चा होती. मात्र, कॉंग्रेसचेच तीन सदस्य निवडीच्या सभेला गैरहजर राहिल्याने भाजपनेच कॉंग्रेसला दे धक्का दिल्याची चर्चा घडून आली. एकुरगा गटाचे सदस्य धीरज देशमुख हे आमदार झाल्याने त्यांचे एक पद रिक्त असून जिल्हा परिषदेच्या 57 सदस्यांत 35 भाजप, 14 कॉंग्रेस, पाच राष्ट्रवादी कॉंग्रेस, दोन अपक्ष व एक शिवसेना असे संख्याबळ आहे. राज्यात झालेले सतांत्तर आणि त्यानंतर राज्यातील काही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन भाजपचे सदस्य फोडून सत्ता मिळवली. यातच भाजपचा एक नाराज गट महाविकास आघाडीच्या संपर्कात होता. याची कुणकुण भाजपच्या नेत्यांना लागताच त्यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदस्यांची कार्यशाळा घेतली तसेच आपल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवले. दुपारी बारा वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी भाजपकडून केंद्रे, तर कॉंग्रेसकडून सोनाली थोरमोटे यांनी, तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून सोळुंके तर कॉंग्रेसकडून धनंजय देशमुख यांनी अर्ज दाखल केले. दुपारी दोन वाजता निवडीच्या सभेला भाजपचे सदस्य खासगी बसने डोक्याला भगवा फेटा व पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत जिल्हा परिषदेत दाखल झाले. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरवात झाल्यानंतर थोरमोटे व देशमुख यांनी अर्ज मागे घेतले. यामुळे केंद्रे व सोळुंके यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पाठक यांनी केली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व मोठी राजकीय उलथापालथ होण्याच्या  चर्चेला पूर्णविराम मिळाला. भाजपचे सदस्य फोडून सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेसचेच तीन सदस्य गैरहजर राहिल्याने भाजपने कॉंग्रेसला धक्का दिल्याची चर्चा घडून आली. अध्यक्षपदी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सुटल्यानंतर विद्यमान उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांना अध्यक्षपदी बढती मिळण्याची आशा होती. गेल्या काही दिवसात तशी चर्चाही घडून आली. मात्र, ऐनवेळी तिरूके यांचा पत्ता कट झाला. 

जालना जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी

जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची सोमवारी (ता.6 ) निवड प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडणुकीत भाजपने सहभाग न घेतल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली अध्यक्षपदासाठी भाजपकडून  निर्धारित वेळेत दोन्ही पदासाठी एकही अर्ज सादर न केल्याने शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रीया घेण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठीही अर्ज दाखल न केल्यामुळे राष्ट्रवादी कडून पूजा सपाटे यांनी दाखल केलेला अर्ज माघारी घेतला. महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान उपायध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून पूजा सपाटे, शिवसेनेकडून महेंद्र पवार यांचा अर्ज आला होता. दुपारी दोन वाजता निवड होणार होती. निवडी आधी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली असून सतीश टोपे यांना पुन्हा उपाध्यक्षपद मिळवण्यासाठी राजेश टोपे प्रयत्न करत असलयाची चर्चा झाली, मात्र, ती हवेत विरली. शिवसेनेने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महा आघाडी करत भाजपला सर्वाधिक जागा मिळवुनही सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले होते. या प्रयत्नांत महाविकास आघाडीला यश आले. तत्कालीन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंधू अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष, तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. सध्या भाजप 22, शिवसेना 14, राष्ट्रवादी 13, काँग्रेस 5 व अपक्ष 2 असे बलाबल होते. अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. या पदावर सेनेचे उत्तम वानखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी भाजपकडून निर्धारित वेळेत दोन्ही पदासाठी एकही अर्ज सादर झाला नाही. त्यामुळे शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
============================
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.