भाजपला दीड कोटींपेक्षा जास्त मते
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र कोटींचा आकडा गाठता आलेला नाही
विधानसभेची मिनी निवडणूक म्हणून समजल्या जाणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला सर्वाधिक दीड कोटींपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. सत्तेतील भागीदार शिवसेनेला एक कोटींपेक्षा जास्त मते असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र कोटींचा आकडा गाठता आलेला नाही.गेल्या आठवडय़ात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेली एकूण मते आणि मतांच्या टक्केवारीची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली. यात भाजप पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि सर्वात कमी मते ही काँग्रेसला मिळाली आहेत.
भाजपला मुंबई महानगरपालिकेत १४ लाख ५०० मते मिळाली. ८२ जागाजिंकलेल्या भाजपच्या मतांची टक्केवारी ही २७.९२ टक्के आहे. अन्य नऊ महानगरपालिकांमध्ये भाजपला ८१ लाख १७ हजार, २८९ मते पडली आहेत. या मतांची टक्केवारी (३५.३६ टक्के ) होते. जिल्हा परिषदांमध्ये भाजपला ६३ लाख ७६ हजार मते मिळाली. म्हणजेच भाजपला एकूण दीड कोटींपेक्षा जास्त मते पडली आहेत. मुंबईत ८४ जागाजिंकणाऱ्या शिवसेनेला १४ लाख ४६ हजार मते पडली आहेत. अन्य नऊ महापालिकांमध्ये ४१ लाख ६१ हजार तर जिल्हा परिषदेत ४७ लाख मते मिळाली आहेत.
एमआयएमला अडीच टक्के मते
राष्ट्रवादीला मुंबईत (२ लाख ८४ हजार), अन्य नऊ महापालिकांमध्ये (३४ लाख, १७ हजार) तर जिल्हा परिषदांमध्ये (५६ लाख ९३ हजार) मते मिळाली. राष्ट्रवादीच्या एकूण मतांची संख्या ही ९२ लाखांच्या आसपास आहे.
काँग्रेसला मुंबईत (८ लाख २९ हजार), अन्य नऊ महापालिका (३० लाख) तर जिल्हा परिषदा (४९ लाख ७२ हजार) मते मिळाली. काँग्रेसच्या एकूण मतांची संख्या ही ८९ लाख आहे. मनसेला मुंबईत चार लाख अन्य अन्य महापालिकांमध्ये नऊ लाख मते मिळाली आहेत. एमआयएमला मुंबई २.५५ टक्के मते मिळाली आहेत.
मतांची टक्केवारी – मुंबई वगळता नऊ महानगरपालिका
भाजप (३५.३६ टक्के)
शिवसेना ( १८.१३ टक्के)
राष्ट्रवादी काँग्रेस ( १४.८८ टक्के)
काँग्रेस (१३.१४ टक्के)
एमआयएम (१.९६ टक्के)
जिल्हा परिषद मते
भाजप (२४.९१ टक्के)
राष्ट्रवादी काँग्रेस (२२.२५ टक्के)
काँग्रेस (१९.४३ टक्के)
शिवसेना (१८.५२ टक्के)