Monday 13 February 2017

pmc election 2017 PRAB उमेदवारी जाहीर झाल्यानंतर "सकाळ-प्राब'चे जनमत सर्वेक्षण

भाजप-राष्ट्रवादीमध्येच सत्तेसाठी चुरस

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर "सकाळ-प्राब'चे जनमत सर्वेक्षण

पुणे महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातच जबरदस्त चुरस असल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थितीत थोडी सुधारणा झाल्याचे, तर अनुकूल वातावरणाचा भाजपला म्हणावा तेवढा लाभ उठवता आला नसल्याचे सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते. कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांच्या कामगिरीतही पूर्वीपेक्षा काही अंशी सुधारणा झाल्याचे सर्वेक्षणावरून दिसून येते.

महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर "सकाळ' आणि "प्राब'ने (पॉलिटिकल रिसर्च अँड ऍनालिसिस ब्युरो) सर्व प्रभागांमध्ये सर्वेक्षण केले होते. त्यात भाजपने मोठी आघाडी घेतली होती; पक्षाला 72 जागा मिळू शकतील, असा अंदाज होता; मात्र उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर करण्यात आलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणानुसार राजकीय परिस्थितीत बराच बदल झाल्याचे दिसून येते. उमेदवारी याद्या निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेत झालेल्या मोठ्या गोंधळाचा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होऊन पक्षाच्या जागांमध्ये 60 ते 65 पर्यंत घसरण होऊ शकते, तर दुसरीकडे पहिल्या सर्वेक्षणात 33 ते 35 जागांवर असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 50 पेक्षा अधिक जागा काबीज करू शकेल, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. उमेदवार निश्‍चितीच्या व्यूहरचनेत राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे दिसून येते. सर्व प्रभागांतून एकूण मतदारसंख्येच्या दोन टक्के मतदारांची मते दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये जाणून घेण्यात आली.
भारतीय जनता पक्ष
भाजपला 2012 च्या निवडणुकीत 26 जागा मिळाल्या होत्या. या वर्षीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या सर्वेक्षणात हा पक्ष 72 जागांपर्यंत झेप घेईल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात आली; मात्र उमेदवार निश्‍चितीमध्ये या पक्षानेही आघाडी गमावली आहे. बाहेरून आलेल्यांना अनपेक्षितपणे उमेदवारी देण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणावर वाढली. तसेच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या काही जणांना उमेदवारी देण्यात आल्याचा परिणाम केवळ त्याच नव्हे, तर इतरही प्रभागांत पडण्याची शक्‍यता समोर आली. भाजपचा पारंपरिक मतदारही याबाबत मते व्यक्त करत आहे. त्यातच शिवसेनेबरोबर युती न झाल्याचाही काही अंशी परिणाम झाला आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा लाभ भाजपला मोठ्या प्रमाणावर होईल, असा अंदाज पहिल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला होता; मात्र या अनुकूल परिस्थितीचा भाजपला लाभ घेता आला नाही.
या संकल्पनेपासून पक्षानेच फारकत घेतल्याचे दिसून आले. या पक्षातील काही प्रमुख इच्छुकांना डावलण्यात आल्याने इतर पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली. राष्ट्रीय पातळीवरील प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि राज्यातील तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारबाबत नाराजी यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार भाजपकडे आकर्षित झाले; मात्र महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांची पक्ष पातळीवर भाजपला पसंती असली, तरी स्थानिक पातळीवर व्यक्ती पसंतीला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले; मात्र तरीही मागच्या निवडणुकीत मनसेला साथ देणाऱ्या मतदारांचा कल या वेळी भाजप-शिवसेनेकडे दिसून येत असल्याने भाजप हा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरेल, असेच दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सांगते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीत 51 जागा मिळाल्या होत्या. पहिल्या सर्वेक्षणात त्या 33 ते 35 पर्यंत कमी होण्याची शक्‍यता व्यक्त झाली होती; मात्र दुसऱ्या सर्वेक्षणात त्या पुन्हा 50 ते 55 जागांपर्यंत वाढण्याची शक्‍यता स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सकारात्मक निवडणूक रणनीतीचा अवलंब केला. त्या पक्षाने भाजपच्या व्यक्तिप्रभावित प्रभागांमधील इतर जागांवर राजकीय डावपेच करून उमेदवारांची निवड केली. भाजपच्या विरोधात उमेदवारी देताना इतर प्रमुख पक्षांकडून गनिमी कावा करण्यात आला. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा लाभ उमेदवार निवडीत घेण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रवादीच्या स्थितीवर झाला.
कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ कॉंग्रेसनेही आपली स्थिती बऱ्यापैकी सुधारली असल्याचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात आढळून आले. कॉंग्रेसने 2012 च्या निवडणुकीत 28 जागा मिळविल्या होत्या. पहिल्या सर्वेक्षणात त्या 24 पर्यंत कमी होतील, असा अंदाज होता. दुसऱ्या सर्वेक्षणात त्या 30 पर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा लाभ उमेदवार निवडीत घेण्यात हा पक्ष यशस्वी ठरला.
शिवसेना
शिवसेनेची स्थितीही कॉंग्रेससारखीच असल्याचे दुसरे सर्वेक्षण सांगते. 2012 च्या निवडणुकीत 15 जागा मिळविणारी शिवसेना 17 जागांपर्यंत जाईल, असा अंदाज पहिल्या सर्वेक्षणाने व्यक्त केला होता. तो पक्षही कॉंग्रेसप्रमाणेच 30 जागांवर जाण्याची शक्‍यता ताज्या सर्वेक्षणाने व्यक्त केली आहे.
मनसेकडे गेलेले युतीचे मतदार शिवसेनेकडे काही प्रमाणात आकर्षित झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. भाजपने डावललेल्या अनेकांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.
2012ची निवडणूक -- निवडणूक जाहीर झाल्यानंतरचे सर्वेक्षण -- उमेदवारी निश्‍चितीनंतरचे सर्वेक्षण
राष्ट्रवादी 51 ------------------ 33---------------------------- 50 ते 55
भाजप 26----------------------- 72 --------------------------- 60 ते 65
कॉंग्रेस 28 ------------------------- 24 -------------------------- 20 ते 30
शिवसेना 15 --------------------- 17 ------------------------- 20 ते 30
स्थिती बदलू शकते
मतदानापर्यंतच्या टप्प्यापर्यंत कोणता पक्ष काय डावपेच आखतो, मतदारांचा कल कसा फिरतो, यांचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावर पडेल. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणातील आकडे प्रत्यक्ष मतदानात बदलण्याची शक्‍यताही आहे.





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.