Saturday 6 July 2019

खासदार नवनीत कौर राणा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार प्रीतम मुंडें, शिवसेनेचे खासदार तुमानेंच्या निवडणुकीला आव्हान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार नवनीत कौर राणा, खासदार प्रीतम मुंडें, शिवसेनेचे खासदार तुमानेंच्या निवडणुकीला आव्हान



राज्यातील 15 खासदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरातच महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक आमदारांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. आता त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळही संपत आला आहे. मात्र अद्यापही त्या याचिका न्यायप्रविष्टच आहेत. त्यामुळे निवडणुका झाल्या की याचिका दाखल होतात, मात्र ज्या नेत्याच्या विरोधात अशा याचिका दाखल होतात त्यांचा कार्यकाळ संपून जातो. पण निकाल काही लागत नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एमआएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दोन धर्मात तेढ निर्माण करणारी भाषणे औरंगाबाद लोकसभेमध्ये वायरल केली. धर्माच्या नावावर मते मागितली म्हणून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठात केवळ इम्तियाज जलीलच नाही, तर मराठवाड्यातल्या सात आणि नंदुरबारच्या एक अशा एकूण आठ खासदारांच्या विरोधात 9 याचिका दाखल झाल्या आहेत. यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली आहे. याशिवाय अन्य याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, परभणीचे संदेश जाधव यांच्या विरोधात, लातूरचे नवनिर्वाचित खासदार आमदार सुधाकर श्रृंगारे यांच्याविरोधात प्रत्येकी एक याचिका दाखल केली आहे . नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांच्या निवडीलादेखील औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले आहे. या सगळ्या याचिका लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 सेक्शन 81 अंतर्गत दाखल करण्यात करण्यात आल्या आहेत.मराठवाडाच नाही तर विदर्भातील सात खासदारांच्या खासदारकीला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. प्रचारादरम्यान नितीन गडकरींनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करावी अशी मागणी आहे. याशिवाय अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या खासदारकीला देखील आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांच्या विरोधात औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात मध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक झाल्या की अशा याचिका दाखल होतात. विधानसभा निवडणुकीनंतर आमदारकी रद्द करण्याच्या अनेक याचिका महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खंडपीठात दाखल झाल्या. त्यात अर्जुन खोतकर यांची आमदारकी औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली होती. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. तरीही याचिका सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. याचिका दाखल होतात, वर्षानुवर्षे खटले चालतात, बहुतेक वेळा त्याच्या खासदारकीचा-आमदारकीचा कार्यकाळ देखील पूर्ण होतो. मात्र तरीदेखील याचिकांचा निकाल लागत नाही.

हिना गावितांवर माहिती लपवल्याचा आराेप तर राज्यमंत्री रावसाहेब दानवेंविरुद्धही याचिका

बीड लाेकसभा मतदार संघापाठाेपाठ आता इतरही अनेक लाेकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. बहुतांश निवडणूक याचिकांमध्ये शपथपत्रात खाेटी माहिती दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नंदुरबार, बीड, नांदेड, परभणी, लातूर आदी मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याप्रकरणात बीड लाेकसभा मतदारसंघाच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला सर्वप्रथम आव्हान देण्यात आले. या निवडणुकीतील पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी याचिका सादर केली आहे. निवडणूक आयोगाच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १२५-अ नुसार खोटी माहिती सादर करणे हा गुन्हा असून, त्या अंतर्गत ही याचिका सादर केली. दोन मतदार यादीत नाव असणे, आर्थिक व्यवहार लपवून ठेवणे, भावनिक मुद्याच्या आधारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वडील गोपीनाथ मुंडे यांचे नाव लावणे, वैद्यनाथ अर्बन को ऑप. बँकेच्या त्या संचालक असून त्यांच्या विरोधात बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी परळीत फसवणुकीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. त्याचीही माहिती मुंडे यांनी सादर केली नसल्याचे आक्षेप घेतले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजयी डॉ. हिना गावित यांच्या विरोधात शंकर वसावे यांनी अॅड. ज्ञानेश्वर बागुल यांच्यातर्फे निवडणूक याचिका दाखल केली. बॉण्ड पेपरवर शपथपत्र सादर केले, त्यांनी शपथपत्र पूर्ण भरलेले नाही. अनेक जागा रिकाम्या सोडल्या आहेत. आपल्यावर अवलंबित्वाची नावे चुकीची दिली असून, यात वडील माजी मंत्री विजयकुमार गावित आणि आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या, हे दाखवून देण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत उघड केलेले नाहीत आदी आक्षेप घेण्यात आले आहेत. या आणि अशाच कारणांवरून डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात विष्णू जाधव यांनी याचिका दाखल केली आहे. उस्मानाबाद मतदारसंघातील खा. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मनोहर पाटील, जालना मतदारसंघात खा. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात डॉ. शरदचंद्र वानखेडे, नांदेड येथील खा. प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात यशपाल शिंदे, हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या विरोधात मोहन फत्तूसिंग राठोडनी याचिका दाखल केली. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मतदारसंघ आणि शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या रामटेक मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल केल्या आहेत. त्यावर लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मतदारसंघातील विजयावर आक्षेप घेताना काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. त्यासोबतच गडकरी यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचे पालन केलेले नाही, असे याचिकेत नमूद केले आहे. गडकरींनी निवडणूक प्रचारावर केलेल्या खर्चाचा हिशेब सादर केलेला नाही. इतर उमेदवारांच्या प्रत्येक टप्प्यातील खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक केला आहे. परंतु, गडकरी यांच्या खर्चाचा एकच आकडा दिलेला आहे. त्यामुळे ही बाब बेकायदा ठरते, असा दावा याचिकेत केला आहे. त्यासोबतच गडकरी हे निवडणूक आचारसंहितेच्या काळात रोकडे ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनाला गेले होते. त्या शोरूमच्या अनेक जाहिराती प्रकाशित झाल्या होत्या. परंतु, गडकरी यांच्या निवडणूक खर्चात त्याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही, अथवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याबाबत जाबही विचारला नाही, असा दावा याचिकेत केला आहे. अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्षात झालेले मतदान आणि ईव्हीएमच्या मोजणीतील मतदान याच्या आकडेवारीत तफावत असल्याचाही आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक बेकायदा घोषित करावी, अशी विनंती करण्यात आली.  दरम्यान, कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीवर आक्षेप घेताना किशोर गजभिये यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे वैधानिक दायित्व पार पाडले नसल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीपूर्वी रामटेक मतदारसंघात सुमारे १८४ ईव्हीएममध्ये दोष आढळून आला होता. याशिवाय, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर झालेल्या मॉक मतदानातही मशिनींमध्ये दोष दिसला होता. तरीही त्या ईव्हीएम बदलण्यात आलेल्या नाहीत, असा दावा याचिकेत केला आहे. काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, रामटेक व कामठी येथील मतदारसंघातदेखील मोठ्या संख्येने ईव्हीएम खराब असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत रीतसर तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला आहे. नाना पटोले यांच्यातर्फे अॅड. जगताप तर गजभिये यांच्यातर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी याचिका दाखल केल्या. उमरेड येथील स्ट्राँगरूममधून सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि टीव्ही चोरीला गेले होते. त्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली नाही. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही, असा आक्षेपही याचिकेत घेतला आहे. 

नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल

नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीलाच आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवनीत राणा यांच्या विरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणी सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र नवनीत कौर यांनी लुभाणा समुदायाच्या आरक्षणातून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता आणि त्या विजयी झाल्या असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. नवनीत कौर यांनी असे करुन मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी माजी खासदार यांनी याचिकांद्वारे केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव त्यांनी केला होता.

खासदार प्रीतम मुंडेंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका

निवडणूक लढवताना नामांकन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याप्रकरणात बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी सादर करण्यात आली आहे. या संदर्भात बीड लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १२५-अ नुसार खोटी माहिती सादर करणे हा गुन्हा असून त्या अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली. याचिकेत प्रीतम मुंडेंकडून शपथपत्रात सादर केलेल्या माहितीवरून एकूण सहा आक्षेप घेण्यात आले आहेत. प्रीतम मुंडे यांचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील ५५ व्या मतदार यादीतील ११४० क्रमांकावर मतदार म्हणून नाव आहे. याशिवाय प्रीतम मुंडे यांचे परळी विधानसभा मतदारसंघामध्येही मतदारांच्या नावातील यादीत ४१ मध्ये ५८५ क्रमांकावर नाव आहे. एकाच मतदाराचे दोन मतदारसंघात नाव असू नये, हा नियम आहे. तसेच प्रीतम मुंडे यांचे कागदोपत्री व्यवहार हे प्रीतम गौरव खाडे या नावाने चालतात.  त्याच नावाने त्या एका कंपनीच्या संचालिका असून त्याची माहिती व कंपनीचा परवाना निलंबित केलेला असल्याची माहितीही प्रीतम मुंडे यांनी शपथपत्रात नमूद केलेली नाही. प्रीतम मुंडे यांनी मतदारांना भावनिक मुद्यांच्या आधारे आकर्षति करण्यासाठी वडील गोपीनाथराव मुंडे यांचे नाव लावले आहे. प्रीतम मुंडे या वैद्यनाथ अर्बन  को-ऑप. बँकेच्या संचालक असून त्यांच्या विरोधात कोटय़वधींचे बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी परळी वैजनाथ येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. त्याचीही माहिती मुंडे यांनी सादर केलेली नाही, असाही आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.

काय आहे प्रीतम मुंडे यांच्याबाबतचा आक्षेप?

1. 'प्रीतम गोपीनाथ मुंडे' नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदार यादीत प्रीतम यांचं नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याचा आरोप कालिदास यांच्य़ाकडून करण्यात आला आहे.
2. मुंबईतील वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
3. प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने आयकर विभागाचे दोन ओळखप्रत्र आहे असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणे आहे.
4. प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ाची माहिती त्यांनी लपवली.
दरम्यान, प्रीतम मुंडे यांच्याबाबत या चार मुख्य आक्षेपांसह एकूण सहा आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.