मतदार जागृती चित्ररथाचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा- डॉ. दीपक म्हैसेकर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्र आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या मतदार जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मतदार जागृती चित्ररथाला डॉ. म्हैसेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, रिजनल आऊटरीच ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. यावेळच्या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नवमतदार व युवक-युवतींनी मतदान प्रक्रीयेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी रिजनल आऊटरीच ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा यांनी या जनजागृती मोहिमेची माहिती दिली. यावेळी कलाकारांच्या पथकाने लोककला सादर केली. मान्यवरांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून मतदारांना मतदान करण्याचे अवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, निवसी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत, स्वीप समन्वय अधिकारी अजय पवार, यशवंत मानखेडकर, आशाराणी पाटील, रिजनल आऊटरीच ब्युरोचे व्यवस्थापक श्री. पानपाटील उपस्थित होते. दरम्यान स्वीप कार्यक्रमांतर्गत पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे विविध मतदार जनजागृतीसाठी उपक्रम राबविले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकीत अल्प मतदान झालेल्या केंद्रातील मतदारांमध्ये सर्वेक्षण करून कारणांचा शोध घेण्यात आलेला होता. त्याप्रमाणे मतदान न केलेल्या मतदारांचा शोध घेऊन जनजागृती संस्थेतर्फे केली होती. लोकसभा २०१९ मध्ये अल्प मतदान झालेल्या केंद्रावर मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मतदानाचे प्रमाण वाढविण्यास प्रोत्साहन करणारे अभियान राबविण्यात येणार आहेत असे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी सांगितले. चित्ररथाची वैशिष्ठ्ये- फिरत्या वाहनांवर कलापथकाचा संच लोकांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण करून लोकांना मतदान करण्याचे आवाहन करेल. राज्यभरात पाच चित्ररथांच्या माध्यमातून 20 जिल्ह्यातील यापूर्वी कमी मतदान झालेल्या विधानसभा मतदार संघात जनजागृतीवर भर देणार, मतदानाच्या दिवसापर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार असून ती 20 दिवस चालेल अशी चित्ररथाची वैशिष्ठ्ये आहेत.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.