Monday 31 December 2018

अहमदनगर महापालिका ; राष्ट्रवादीकडून नगरसेवकांवर कारवाईचे ढोंग - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची टीका

सिंचन घोटाळ्याच्या बदल्यात कवचकुंडले ; विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा देणारे भाजपा-राष्ट्रवादीचे लफडे जुनेच


अहमदनगर महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवूनही राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाचा महापौर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपावर निशाणा साधला आहे. अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठींबा देऊन उघडे पडल्याने आता नगरसेवकांवर कारवाईचे ढोंग केले जात असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी केली आहे. तसेच सिंचन घोटाळ्याच्या बदल्यात कवचकुंडले घेतली आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा देणारे भाजपा-राष्ट्रवादीचे लफडे जुनेच असल्याचे म्हंटले आहे. सर्वाधिक जागा मिळूनही नगर महापालिकेत सत्ता स्थापन न करता आल्याने शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर ‘सामना’ या मुखपत्रातून भाजपा-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले. राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे. आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले, असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला आहे. 'भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच असून नगरमध्ये फक्त उफाळून आले आहे. नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीनं खेळलेल्या राजकारणाचा शिवसेनेला अजिबात धक्का बसलेला नाही. भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच असून महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात या संबंधांतून झाला आहे. भाजपची खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून त्यांनी सिद्ध केले आहे. अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त ते उफाळून आले इतकेच,' अशी जहरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे..

[?] शिवसेनेचा महापौर होऊ देणे हा कौल होता. एका बाजूला शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र असल्याचे म्हणायचे. दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये. व दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे.

[?] या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे.

[?] महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा जन्मच मुळात राष्ट्रवादीसोबतच्या ‘अनैतिक’ संबंधातून झाला आहे. नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली.

[?] विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले. ही एक प्रकारे सौदेबाजीच म्हणावी लागेल. 

[?] कोडगेपणाचा कळस असा की, भाजपचे (‘ईव्हीएम गडबड’ फेम) मंत्री गिरीश महाजन म्हणतात, राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही विकासासाठी घेतला. मग तुमचे मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्यातील आरोपींना ऊठसूट तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देतात ती सर्व जुमलेबाजीच म्हणावी काय? 

[?] नगरमध्ये त्यांना ईव्हीएम घोटाळे करणे जमले नाही. कारण हवा शिवसेनेची होती व ती स्पष्ट दिसत होती. भाजप खासदारांचे पुत्रही त्यांच्या घरच्या मैदानात शिवसेनेकडून पराभूत झाले. 

[?] नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले. राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे. 

[?] राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणा’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते. 

[?] या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे. 



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========


पक्षाचा आदेश झुगारुन भाजपाला पाठिंबा, 'त्या' नगरसेवकांवर कारवाई होणार-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार


महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर येत्या ४ ते ५ दिवसामध्ये कारवाई करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते. नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितली आहे. पक्षाने आदेश देऊनही निर्णय धुडकावला आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पक्षाची बैठक ४ किंवा ५ जानेवारी २०१९ होईल. या बैठकित कारवाईचा निर्णय  घेण्यात येईल. शहर जिल्हाध्यक्षांकडे अहवाल मागितल्याचेही त्यांनी सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जाहीर युती दिसून आली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला या घटनेचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. पाठींबा देण्याचा निर्णय माझा व नगरसेवकांचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी काल जाहीर केले होते. महापौर निवडणुकांत स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष झुगारुन निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, प्रदेशाध्यक्षांनी माझ्या झालेल्या चर्चेत त्यांनी असे कुठलेही आदेश पक्षाकडून देण्यात आले नसल्याचं सांगितलं. त्यामुळे, जर पक्षाला विचारत न घेता भाजपाला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली जाईल, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. महापौर निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठींबा दिल्यानंतर सर्वच स्तरातून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही अवाक् झाले आहेत. मात्र, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, याबाबत मी माहिती घेतली असून आमच्या राज्य पक्षाध्यक्षांनी असा कुठलाही आदेश दिला नव्हता. तसेच, याप्रकरणी संबंधित नगरसेवकांना नोटीस बजावली असून खुलासा मागविण्यात आला आहे. तर, स्थानिक आमदारांनी भेट घेऊन स्थानिक राजकारणाचं गणित सांगितले आहे. मात्र, तरीही पक्षाचा आदेश झुगारल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईलच, असे पवार यांनी स्पष्ट केले होते.

अहमदनगर महापालिका निवडणूक; राष्ट्रवादीकडून कारवाई केल्यास १८ नगरसेवकांसह 1 आमदार भाजपमध्ये जाणार!


महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर येत्या ४ ते ५ दिवसामध्ये कारवाई करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर कारवाई केल्यास संबंधित १८ नगरसेवकांसह 1 आमदार नववर्षात भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून कारवाईची प्रतीक्षा असून हकालपट्टीची कारवाई केली तर सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीपक्षाने कारवाई केली तर काहीही फरक पडणार नसून पक्षाचेच नुकसान होणार असल्याचे संबधित नगरसेवक मत व्यक्त करीत आहेत.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांनाच विचारा- मुख्यमंत्री



शरद पवार काँग्रेसचे वकील असून त्यांना दुसरा पर्याय नाही नसल्याची टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंबा बाबत उत्तर देणे टाळून तुम्ही त्यांनाच विचारा असे म्हंटले आहे तर शिवसेनेच्या आरोपांना आम्ही महत्व देत नसल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. तर आगामी काळात आम्ही निवडणूक राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विरोधात लढवणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाला पवारांसारखा मोठा वकील लाभला आहे. त्यांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जर कोण मान्य करत नसेल तर त्यांनी नेता म्हणवून घेऊ नये, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान शिवसेनेच्या आरोपांना आम्ही महत्व देत नसून अहमदनगरमध्ये आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो. याबाबत आमचे नेते बोलत होते, मी तसे सांगितलं होते. तरीही निवडणूकपूर्वी तीन दिवसापर्यंत शिवसेना बोलायला तयार नव्हती. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली मग अधिकार स्थानिक नेत्यांना दिले. राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


नगरमध्ये सत्तेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी- रामदास कदमांचा गौप्यस्फोट


अहमदनगरमध्ये आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी सत्ता स्थापनेबाबत बोलणी केली होती. यासाठी मी स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. मात्र, असे असतानाही राष्ट्रवादीने शिवसेनेऐवजी भाजपाला पाठींबा दिला. यावरुन राष्ट्रवादीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना कधी एकदा सत्तेतून बाहेर पडते आणि आम्ही सत्तेत बसतो याची घाई राष्ट्रवादीला झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठींबा दिला आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला महापौरपद मिळवता आले नाही. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अन्य अपक्षाच्या मदतीने शिवसेनेला धोबीपछाड दिला. भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. ३७ विरुद्ध शून्य मतांनी त्यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे सर्वाधिक २४ जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस १८, भाजपा १४, बसप ४ आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेच्या २४ पैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. आपला उमेदवार निवडून येणार नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घालण्याची खेळी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबत सभागृहात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला साथ देणार हे स्पष्ट झाले होते.


शिवसेनेने भाजपसोबत संसार नीट चालतो का ते बघावे: नवाब मलिक


शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असभ्य भाषेत टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांनी सेनेचे मंत्री रामदास कदम यांचा आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईलच परंतु आधी शिवसेनेने भाजपसोबतचा संसार नीट कसा चालेल की घटस्फोट होणार याचंही उत्तर जनतेला हवं आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.