विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना उद्देशूनच दादांचा त्रागा!
पवार साहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची तयारी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दर्शवून मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, मी आमच्यातल्या (पक्षातील) दोघा - तिघांना सांगतोय, लोकसभा लढवा निवडून आणायची जबाबदारी माझी; तर ते "नको राव दादा, मला आमदारच व्हायचंय' असला पुळचटपणा करताहेत असे नुकतेच विधान एका शोरूमच्या उदघाटन प्रसंगी वक्तव्य केले होते. सदरील त्रागा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलच व्यक्त केला असल्याची चर्चा पक्षात रंगली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात स्वतः आंबेगाव विधानसभेचे आमदार व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील निवडणूक लढविण्यास धजावत नाही त्यामुळे राष्ट्रवादी पक्षांतर्गत इतर पदाधिकार्यांना देखील निवडणुकीत जिंकण्याचा आत्मविश्वास येत नाही केवळ या कारणाने कोणीही निवडणूक लढविण्यास धजावत नाही. तसेच एकदा लोकसभेला उमेदवारी दिली तर त्यांना पुन्हा आमदारकीची उमेदवारी डावलली जाते या धोरणाचे भोसरीचे माजी आमदार विलासराव लांडे बळी पडले होते. या उदाहरणामुळे राष्ट्रवादीतील कोणताही पदाधिकारी शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात लढण्यास धजावत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर यांचा समावेश आहे. या सहा विधानसभा मतदारसंघात सध्या केवळ आंबेगावमधून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार दिलीप वळसे पाटील आहेत. जुन्नरला मनसे, खेडला सेना, शिरूरला भाजप, भोसरीला अपक्ष तर हडपसरला भाजपचे आमदार आहेत. पक्षांतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादीची ताकत या मतदारसंघात क्षीण झालेली आहे. पदाधिकारी यांच्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जातात परंतु प्रत्यक्षात त्याचा काहीही परिणाम पदाधिकारी यांच्यावर होत नसल्याचे दिसून आले आहे. एका शोरूमच्या उदघाटन कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते यावेळी निमंत्रण असूनही विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील अनुपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी पक्षाकडून पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांना देखील लढवण्याची तयारी करण्यास सांगितले होते तसेच आमदार दिलीप वळसे पाटील देखील लोकसभेस इच्छुक नाहीत त्यांना विधानसभा निवडणुकीत रस आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तसेच अर्थ व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील यांचा पर्याय सुचवला जात आहे तर जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार देखील संधी दिली तर लढविण्याची तयारी दर्शवत आहेत. पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी देखील सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान शिवसेना व भाजप युती न झाल्यास भाजपकडून भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे, आंबेगाव भाजप अध्यक्ष जयसिंग एरंडे, तसेच भाजप पदाधिकारी विकास रासकर देखील भाजपकडून इच्छुक आहे. यातुलनेत राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या अजिबात नसल्यानेच मी स्वतः लढून जिंकून दाखवतो असा त्रागा केला आहे.
अजितदादांनी आता शब्द फिरवू नये-आढळराव
मला लिंबू-टिंबूंच्या विरोधात लढण्यापेक्षा अजित पवार यांच्याविरोधात मला नक्कीच आवडेल. त्यामुळे पवार यांनी आता आपले शब्द मागे घेऊ नयेत. मी याच क्षणाची वाट पाहत होतो. अजित पवारांचाही पराभव करण्याची क्षमता येथील मतदारांमध्ये आहे अशी प्रतिक्रिया खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. खासदार आढळराव यांनी देखील हे आव्हान स्वीकारत असल्याचे सांगून मी सुद्धा मराठा असल्याचे सांगत प्रतिआव्हान दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला योग्य उमेदवार मिळत नाही. त्यामुळे पवार कुटुंबियांच्या नावाची येथे चर्चा होतीच. पण या मतदारसंघात शिवसेनेची ताकद पाहून आणि जनतेचा मला असलेला पाठिंबा पाहून 2009 मध्ये शरद पवार यांनीही येथे उभे राहण्याचे टाळले होते. त्यामुळे अजित पवार यांनी आता शब्द मागे घेऊ नयेत. मी त्यांचीच वाट पाहत होतो. मी त्यांच्या विरोधात निवडून आलो नाही तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही, असेही प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
https://bit.ly/2Vo7a37
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्येClick here Pay Now-
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.