Friday, 25 January 2019

election 2019 लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करावे- डॉ.दीपक म्हैसेकर

लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करावे- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना मतदानाचा अमुल्य अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा वापर करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी  प्रत्येकाने मतदान करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केले. भारत निवडणूक आयोगाच्याच्यावतीने मतदान प्रक्रियेच्या जनजागृतीसाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,पुणे, मतदार नोंदणी अधिकारी 209-शिवाजीनगर,211-खडकवासला आणि 214-कँटोनमेंट मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, उपजिल्हानिवडणूक अधिकारी मोनिका सिंग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.आहुजा, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जलतरणपटू  सुयश जाधव, अभिनेता रमेश परदेशी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.म्हैसेकर यांनी, सुशिक्षीत मतदार, निवडणूक  प्रक्रियेमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी असे सांगितले. खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक सरकारसाठी शंभर टक्के मतदान होणे आवश्यक असून मतदान जागृतीसाठी भविष्यात मोहिम राबविण्याची वेळ येणार नाही, अशा पध्दतीने प्रत्येक नागरिकाने स्वयंजबाबदारीने मतदान करायला हवे, असे आवाहन केले.  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, मोठया संघर्षानंतर नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला असून लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे सांगितले. मतदानातील उदासीनता टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भरघोस मतदान होते, त्याचप्रमाणे नागरिकांनी विधानसभा व लोकसभा निवडणूकीत भरघोस मतदान करावे असे आवाहन केले.जलतरणपटू सुयश जाधव, अभिनेता रमेश परदेशी यांनी युवकांनी मतदानाविषयी जागृत रहावे असे सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी प्रास्ताविकात, जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या मतदार नेांदणी मोहिमेची माहिती दिली. मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी जागरुक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदार नोंदणी मोहिमेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी स्नेहल बर्गे, सुषमा चौधरी, रोहिणी घाडगे, वर्षा सकपाळ यांच्यासह सानिका कुलकर्णी, तीर्थ पुराणिक, संस्कृती माटे, प्रणव चाळके व रेणूका पाटील या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व या विषयावर माहिती दर्शविणाऱ्या फलकांसह बोट क्लब सभागृह-जुना मुंबई पुणे महामार्ग-गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालय-अभियांत्रिकी महाविद्यालय या दरम्यान रॅली काढून प्रबोधन केले. कार्यक्रमाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


25 जानेवारी  राष्ट्रीय मतदार दिवस




आपल्या देशामध्ये 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून प्रति वर्षी साजरा करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. दिनांक 25 जानेवारी 2011 रोजी पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो तसेच 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा के ला जातो, या सर्वामागे त्या त्या दिवशी त्या त्या घटनेची आठवण जागृत राहावी व त्याची प्रेरणा घ्यावी असा हेतू असतो. त्याप्रमाणे मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा मतदार दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू आहे. विशेषत: तरुणांचा मतदार प्रक्रियेत सहभाग वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने प्रत्येक वर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. तरुण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ आहे. जगामध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग म्हणून चीननंतर भारत दोन नंबरवर आहे. त्यामुळे तरुणांनी अधिक पुढे येऊन, मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे व समृद्ध सशक्त अशा लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा अशी अपेक्षा आहे. मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी, शास्त्रज्ञ मंडळी अहोरात्र मेहनत घेऊन विविध क्षेत्रात संशोधन करीत असतात. निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत देशाच्या सीमारेषेवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून प्रसंगी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षण करीत असतात. विविध उद्योगांना चालना देऊन अनेक उद्योगपती देशाच्या विकासामध्ये हातभार लावत असतात. तसेच काळ्या आईच्या सेवेमध्ये आपला घाम गाळून बळीराजा देशाला सुजलाम सुफलाम करीत असतो. आपापले कर्तव्य चोखपणे पार पाडून ही सर्व मंडळी आपआपल्या परीने देशसेवाच करीत आहेत. त्याप्रमाणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडणे ही देखिल एक प्रकारची देशसेवाच आहे. संपूर्ण जगामध्ये भारतीय लोकशाही भक्कम व यशस्वी असल्याचे निवडणूक आयोगाने सिद्ध केले आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व देशाच्या विकासासाठी मतदारांनी पुढे येऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. परंतु मतदानादिवशी सुट्टी असल्याने मतदानासाठी जाण्याऐवजी पिकनिकला जाण्याकडे अनेक लोकांचा कल दिसून येतो. यामागे मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो? ही मानसिकता असते. परंतु एक-एक मताने मतांचा डोंगर उभा राहतो. लेाकशाहीमध्ये एक-एक मत अत्यंत बहूमोल असल्याने त्यांची जाणीव / जागृती मतदारामध्ये निर्माण व्हावी यासाठी मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलभूत हक्कापैकी मतदानांचा हक्क हा सर्वात महत्त्वाचा आहे. मतदानाच्या हक्कामुळे आपणास देशामध्ये परिवर्तन घडवुन आणता येते व देशाचे भवितव्य घडविता येते. त्यासाठी युवक-युवतींनी स्वयंस्फूर्तीने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे व इतर मतदारांनाही त्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. युवक वर्गाची ही संघटित शक्ती व सामर्थ्य विचारात घेऊन यावर्षी निवडणूक आयोगाने सक्षम करुया युवा व भावी मतदार हे घोष वाक्य जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व युवक-युवतींनी घटनेने दिलेल्या मुलभूत हक्कांचा उपयोग करुन मतदार प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे व इतरांनाही प्रवृत्त करावे. एक सार्वभौम व शक्तीशाली लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची असलेली प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी मतदानरुपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे हिच अपेक्षा आहे. भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती या महत्वाकांक्षी कार्यक्रमावर अधिक भर दिला आहे. यासाठी संपूर्ण देशभर SVEEP हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून लोकशाही प्रक्रियेबाबत मतदारामध्ये जागृती निर्माण करुन त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी अनेक विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संपूर्ण देशभर मतदार जागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात असून जिल्हा प्रशासनानेही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदार जागृतीवर अधिक भर दिला आहे. मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रीया सुरुच आहे. तर मल चला ! लोकशाही बळकट करुया ! मतदार यादीत नाव नोंदवूया...मतदानाचा पवित्र हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य जोपासण्यात प्रत्येक भारतीयाने सक्रीय होणे आज काळाची गरज बनली आहे. जिल्ह्यातही मतदार जागृती दिनानिमित्त सर्वत्र प्रभातफेरी, युवकांसाठी प्रबोधन व जागृतीपर कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला आहे. युवा मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध प्रसार माध्यमाबरोबरच सोशल मिडीयाचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. यापूर्वी जिल्ह्यात राबविलेल्या मतदार जागृती अभियानातून मतदानाचा टक्का वाढण्यास निश्चितच मदत झाली असून यापुढील काळातही मतदार जागृतीद्वारे मतदानाचा टक्का वाढविण्यावर संपूर्ण यंत्रणा गतिमान केली आहे. लोकशाहीत मतदारांची भूमिका सर्वार्थाने निर्णायक ठरत असून मतदारांनी भविष्य काळात येणाऱ्या निवडणूकीमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावून सार्वभौम शक्तीशाली भारतीय लोकशाही अधिक बळकट करुया.

मतदार- भारतीय लोकशाहीचा धागा 

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक प्रक्रियेला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक भारतीयाल मतदानाचा अधिकार आहे. मतदान जनजागृतीसाठी 25 डिसेंबर हा दिवस देशात मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र, 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. त्यामुळे सन 2011 पासून देशभरात हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा होत आहे. मतदारांमध्ये जनजागृती करणे, मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, नव मतदारांचे नोंदणीकरण करणे, मतदारांना प्रोत्साहन देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 25 डिसेंबर 2011 साली 'राष्ट्रीय मतदार दिवसाचा' शुभारंभ केला होता. निवडणूक आगोयाच्या 61 वर्षपूर्तीनिमित्त या दिवसापासून हा दिवस देशभरा साजरा करण्यास सुरूवात झाली. 

मतदारांसाठी काही नियम व अधिकार

[?] राज्यघटनेनुसार मतदारासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण करणे बंधनकारक. 
[?] 28 मार्च 1989 पासून 18 वर्षे पूर्ण असणाऱ्यांना मताधिकार मिळाला, त्यापूर्वी मतदारासाठी 21 वर्षे पूर्ण असण्याची अट होती. 
[?] जी व्यक्ती भारताचा नागरिक नाही, ती व्यक्ती देशात मतदान करण्यास अपात्र आहे.
[?]  अनिवासी भारतीयांना देशात मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. नियमानुसार एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारास नाव नोंदणी करता येत नाही.


[?] आपले किंवा आपल्या परिवारातील व्यक्तींचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे का?
खालील लिंक वर क्लिक करून आपण हे शोधू शकता.
http://www.nvsp.in

[?] आपले नाव मतदार यादीत नसेल तर समाविष्ट करा
खालील लिंक वर क्लिक करून आवश्यक माहिती भरून आणि फोटो ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा जोडून नाव नोंदणी करू शकता.
http://www.nvsp.in/Forms/Forms/form6

[?] मतदारयादीत आपल्या माहितीमध्ये काही बदल/दुरुस्ती असेल तर करा
खालील लिंक वर क्लिक करून आवश्यक बदल करू शकता.

http://www.nvsp.in/Forms/Forms/form8

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.