पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून लढणार!
राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून, येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवर नेत्यांचा कानोसा घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अध्यक्ष शरद पवार उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतील असे वाटते. मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रयोग करूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ पवार यांना येथून लढविण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. मात्र अशा राजकीय चर्चा घडवून आणल्या जातात. गेल्या निवडणुकीतही शरद पवार शिरूर व इतर मतदारसंघातून चाचपणी करीत असल्याच्या चर्चा मध्यमातून केल्या जात होत्या. अनुकूल वातावरण तयार करणे व पक्षांतर्गत गट-तट प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
(मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी दिली तर यशाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी अहवाल- पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संपर्क साधावा.)
महाराष्ट्रात व्यक्तीनिष्ठ आधारित प्रमुख राष्ट्रवादी व शिवसेना हे २ राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे शरद पवार, खासदार कन्या सुप्रिया सुळे, आमदार पुतण्या अजित पवार या पवार कुटुंबातील व्यक्तिंकडेच आहे. आता तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तिसर्या पिढीतील दोन युवक राजकारणात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या या दोघांवरच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पार्थ अजित पवार आणि रोहित राजेंद्र पवार हे दोन युवक आहेत. पार्थ हे अजित पवार यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. तर रोहित हे शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब यांचे नातू आहेत. रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत; तर पार्थ पवार हे उद्योजक आहेत. त्यांचे परदेशात व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण झाले आहे. पार्थ दादा पवार युवा मंच महाराष्ट्रच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांनी त्याचे मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी तुळजापूर येथे गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभाग घेऊन पदयात्रा काढली. या निमिताने राजकारणात सक्रीय झाल्याचेसमोर आले होते. पार्थ पवार अनेक दिवसांपासून शरद पवारांसोबत राजकीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांचे सासरे हडपसर मतदारसंघातून लढविण्याचा आग्रह करीत आहेत. पक्षातील काही पदाधिकारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून लढविण्याचा आग्रह करीत आहेत. अशी चर्चा पक्षात आहे. अजित पवार यांनी मी बारामती मतदारसंघाशिवाय इतर कोणत्याही मतदारसंघात उभा राहणार नाही, अशी घोषणा दोन महिन्यांपूर्वी बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका जाहीर सभेत बोलताना केली होती; त्यामुळे रोहित पवार यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो, असे सूतोवाच अजित पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. 'आताची पिढी मोठी झाली असून, त्यांचे निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत. राजकारणात काम करताना स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जाते. माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, असे मी मध्यंतरी म्हणालो होतो, परंतु जग आता बदलत आहे. मी कोणावर निर्णय लादणार नाही, कुणी आपल्या करियरचा निर्णय घेत असेल तर मी रोखू शकत नाही,'' असे सांगत अजित पवार यांनी पार्थच्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले. मावळ लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले राहुल नार्वेकर लढले होते; परंतु ते तिसर्या क्रमांकावर राहिले होते. या वेळी लोकसभा निवडणूक निकराने लढवायचा निर्धार राष्ट्रवादीने केला असल्याने पार्थ पवार यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय होऊ शकतो. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या शहरावर स्वतः अजितदादा पवार यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले आहे. परंतु, २०१४ पासून अजितदादांच्या पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे. हे सर्व पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे झाले. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवडचा परिसर येतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या परिसराचे अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 पर्यंत शहराचा भाग बारामती लोकसभा मतदार संघात येत होता. त्यानंतर पुर्नरचना झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली आहे. 2009 मध्ये शिवसेनेकडून गजानन बाबर आणि 2014 मध्ये श्रीरंग बारणे निवडून आले आहेत.मावळ हा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांत विभागला गेला आहे. पुण्यातील चिंचवड, मावळ आणि पिंपरी हे तीन विधानसभा मतदारसंघ यात येतात. येथे राष्ट्रवादीची ताकद २०१४ पैकी मोठ्या प्रमाणात होती. तरीही २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत येथे पक्षाला विजय मिळाला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवड, पनवेल या दोन मोठ्या महापालिकांसह लोणावळा, तळेगावदाभाडे या नगरपालिका आणि ग्रामपंचायती भाजपने काबिज केलेल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची राजकीय स्थिती भक्कम आहे. तरीही भाजपची सर्व मदार पिंपरी-चिंचवड शहरावर असणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे निवडणुकीच्या मैदानात असतील अशी चर्चा आहे तर राष्ट्रवादीचे शहारध्यक्ष संजोग वाघेरे यांचे एकमेव नाव मावळच्या मतदारसंघात चर्चेत आहे. या मतदारसंघात भाजपखालोखाल राष्ट्रवादीची ताकद आहे. लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्ररचना झाली. या पुनर्रचनेनुसार २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. पुनर्ररचनेत मावळ लोकसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडपासून ते रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यापर्यंत विस्तारला आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे विधानसभा मतदारसंघ येतात. २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका भाजप व शिवसेनेने एकत्र लढविल्या. या दोन्ही निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. दोन्ही वेळेस या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोर जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. पिंपरी चिंचवड तत्कालीन शहराध्यक्ष योगेश बेहल यांनीच दादांचे निर्णय चुकले असं सांगत दादांना घराचा आहेर दिला होता. आगामी निवडणुकीत स्वतः अजितदादांचे पुत्र मैदानात उतरल्यास राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने पक्षाचेच काम करतीलच असे नाही. दुसरीकडे या मतदारसंघात भाजप प्रथम क्रमांकावर असल्याने अजितदादांचे पुत्र मैदानात आल्यास विजयासाठी झुंजावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
====================
राजकारणातील घराणेशाही व घराणेशाहीतील राजकारण
राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे शरद पवार, खासदार कन्या सुप्रिया सुळे, आमदार पुतण्या अजित पवार या पवार कुटुंबातील व्यक्तिंकडेच आहे. आता तिसरी पिढी सध्या सक्रीय होत आहे. दुसरया पिढीतील राजकीय वारसदारांची स्पर्धा आता तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलेली आहे.
स्वातंत्र्य चळवळीनंतर कॉंग्रेसचा चळवळीशी असलेला संबंध संपुष्टात आला आणि त्यामुळे तळागाळातील जनाधार टिकवणे यासाठी जाती, कुटुंब, सरंजाम, घराणे इ. पारंपारिक सामाजिक रचना यांचा आधार घेणे आले. जे कॉंग्रेसचे झाले तेच कमी-जास्त फरकाने इतर पक्षांचे झाले. आणीबाणी विरोधी, आणि मंडल आंदोलनातून उदयाला आलेले प्रादेशिक, समाजवादी नेते हे देखील घराणेशाहीचे राजकारण करताना दिसत आहेत. आज राहुल गांधी भले ‘युवराज’ म्हणून मिरवत असतील किंवा टीकांचे धनी होत असतील. पण गावोगावी असे युवराज, साहेब, सरकार आपापल्या घराण्याच्या गौरवशाली वारशाचा टिळा लावून मिरवू लागले त्याला पुष्कळ काळ लोटला. त्याला कारण राजकारणातील ‘चळवळ’ हे अधिष्ठान संपुष्टात येणे हे आहे. राष्ट्रीय स्तरावर भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी यांच्या आणि राज्यपातळीवर बाळासाहेब विखे-पाटील यांच्यापासून राजकारणातील घराणेशाहीचा अध्याय सुरू झाला. आज घराणेशाही नसलेला पक्ष शोधूनही सापडणार नाही. या घराणेशाहीचे केवळ राजकीयच नव्हे, तर अनेक सामाजिक-आर्थिक दुष्परिणाम आज देशाला भोगावे लागत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील घराणेशाहीच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा..भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नावाखाली सुरू असला, तरी त्याच्या नाडय़ा मात्र काही मोजक्या घराण्यांच्याच ताब्यात आहेत. त्यात नेहरू-गांधी घराणे अग्रस्थानी आहे. सर्वच पक्षांतील नेत्यांनी घराणेशाहीचा स्वीकार केला. त्यातूनच राजकारणात प्रस्थापित अशा मोजक्या कुटुंबांची सरशी होत राहिली आहे. सत्तास्थानी असलेल्या या कुटुंबांतील केवळ पहिली नावे बदलत गेली; मात्र वारशाच्या रूपाने आडनाव कायम राहिले. विश्वजित कदम, राजीव सातव, प्रतीक पाटील, प्रिया दत्त, मुकुल वासनिक, नीलेश राणे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, राजीव राजळे, विजयसिंह मोहिते-पाटील, मनीष जैन, आनंद परांजपे, संजीव नाईक, संजय महाडिक, पूनम महाजन, हीना गावित इत्यादी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय उमेदवारांना घराण्याची राजकीय पाश्र्वभूमी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले ५४३ पकी १५६ खासदार हे कौटुंबिक राजकीय पाश्र्वभूमीतून आलेले होते. त्यात एकटय़ा काँग्रेसचे २०८ पकी ७८, राष्ट्रीय लोकदलाचे ५ पकी ५, राष्ट्रवादीचे ७ पकी ५, बिजू जनता दलाचे १४ पकी ६, बसपाचे २१ पकी ७, सपाचे २२ पकी ६, माकपचे १६ पकी ४ आणि भाजपचे ११६ पकी २२ खासदार हे राजकीय घराण्याच्या पाश्र्वभूमीचे होते. याच्या प्रमाणाची टक्केवारी काढली तर अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोकदल प्रथम, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा द्वितीय, काँग्रेसचा तृतीय, तर भाजपचा शेवटून पहिला क्रमांक लागतो. मात्र, या घराणेशाहीबद्दल मत-मतांतरेही आहेत. काहींना राजकीय घराणेशाही ही लोकशाहीला मारक वाटते, काहींना ती समाजमनाने स्वीकारलेली अपरिहार्यता वाटते. तर नव्याने नेतृत्व करू इच्छिणाऱ्यांना घराणेशाही हा अडथळा वाटतो. राजकीय कुटुंबांचे राजकारण देशभरात कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरे, पवार, पाटील, चव्हाण, मोहिते अशा मोजक्या कुटुंबांभोवती फिरत असल्याची चर्चा होते. महाराष्ट्राचे सध्याचे एकंदर राजकारण वरील चार-पाच घराण्यांभोवती फिरते आहे. त्या चार-पाच घराण्यांनी इतर जिल्हास्तरावरील घराण्यांना आपल्याशी एकरूप करून घेतले आहे. शरद पवार कुटुंब राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहे. पवार कुटुंबाने स्थापन केलेल्या संस्था त्यांना राजकारणासाठी पूरक ठरल्या. मात्र, त्यापुढे जाऊन राज्याचे नेतृत्व किंवा इतर महत्त्वाच्या भूमिका कुटुंबाभोवतीच राहण्याचा महत्त्वाचा धागा आहे. प्रथम शहरी भागात आणि नंतर मराठवाडय़ात फोफावलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने स्वत:ची आणि पक्षातील घराणेशाही सतत नाकारली. १९९२ साली शिवसेनेच्या संस्थापक सदस्यांपकी एक असलेले माधवराव देशपांडे यांनी उद्धव आणि राज यांच्या शिवसेनेतील राजकीय प्रवेशाला आक्षेप घेतला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’तून अग्रलेख लिहून त्यांच्यावर कडवी टीका केली होती. पुण्यात शरद पवारांची तिसरी पिढी, सांगलीत वसंतदादा पाटील यांची तिसरी पिढी, साताऱ्यात भोसले घराणे , सोलापुरात मोहितेंची तिसरी पिढी, सुशीलकुमार शिदे यांची दुसरी पिढी, नगरमध्ये विखेंची तिसरी पिढी, थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी, कोल्हापुरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी, नाशिकमध्ये भुजबळांची दुसरी पिढी, भाऊसाहेब हिरेंची तिसरी पिढी, जळगावात जैनांची दुसरी, विदर्भात नाईकांची दुसरी पिढी, तर मराठवाडय़ात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची दुसरी पिढी, गोपीनाथ मुंडेंची दुसरी पिढी, कोकणात शेकापच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी, नारायण राणेंची दुसरी पिढी, अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दुसरी पिढी, मुंबई-ठाणे पट्टय़ात गणेश नाईक, प्रकाश परांजपे यांची दुसरी पिढी अशी ही यादी भरपूर आहे. घराणेशाहीच्या प्राबल्यामुळे नवे नेतृत्व घडण्यात एक प्रकारे शिथिलता आली आहे. तालुका पातळीवर नव्या नेत्याची भावी आमदार म्हणून चर्चा होण्याच्या टप्प्यावरच राजकीय घराण्यांकडून त्याचे एकतर खच्चीकरण केले जाते किंवा सत्तास्थानात दुय्यम पद देऊन बोळवण केली जाते. घराणेशाहीच्या प्रभावावर मात करून राजू शेट्टी, बच्चू कडू यांनी केलेली कामे आणि अनुभव समोर ठेवता येतात. पण अशी उदाहरणे दुर्मीळच आहेत. राजकीय घराण्यांबाहेरच्या लोकांना सत्तेची संधी मिळाली तरच राजकारणाचे शुद्धीकरण होईल. घरातील वातावरणामुळे पुढच्या पिढीला त्या-त्या क्षेत्रातील बाळकडू मिळणे स्वाभाविक आहे. प्रोत्साहन आणि संधीही मिळणे साहजिक आहे राजकारणात गुणवत्ता नव्हे, घराणेशाही हीच मुख्य पात्रता ठरते. विशिष्ट घराण्यात जन्म घेतल्याने राजकारणाचे, नेतृत्वगुणाचे, संघटन कौशल्याचे, निर्णयक्षमतेचे बाळकडू आपसूकच मिळत असते, अशी स्तुति करणारांची धारणा आहे. राजकीय सत्ता ही लोकशाही मार्गाने, समाजातील अधिकाधिक लोकांना सामील करून घेत मिळविणे आणि लोकांच्या भल्यासाठीच राबविणे अभिप्रेत आहे. त्याच-त्या घराण्यांतील लोक राजकारणात दिसत असतील, तर सत्तास्थान विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादित आहे आणि त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने सरंजामशाही टिकून राहिली आहे. असेही काहींचे मत आहे.
========================================
उमेदवार निश्चित करताना राजकीय पक्ष लोकशाही पद्धतीचा अवलंब करीत नाही म्हणून याचिका!
पंचायत समिती ते लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार निश्चित करताना कोणतेही राजकीय पक्ष लोकशाही पद्धतीचा अवलंब करीत नाहीत. घराणेशाही आणि परंपरागत पद्धतीनेच उमेदवार देण्यात येतात. तेव्हा लोकशाही मार्गाने उमेदवार निवडण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली होती. गोंदिया येथील मिलिंद कोतवाल यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड.ए. हक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने सदर याचिका जनहिताच्या श्रेणीत मोडणारी आहे अथवा नाही, त्याची शहानिशा करण्याचा आदेश रजिस्टारला दिला होता. कालांतराने याचिका तांत्रिक मुद्द्यांवर फेटाळण्यात आली होती. याचिकाकर्त्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था ते संसदेपर्यंतच्या निवडणुकीत राजकीय पक्षाला वाटेल त्या उमेदवाराला तिकीट देण्यात येते. त्यावेळी तो उमेदवार जनतेच्या अथवा त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पसंतीचा असेलच त्याची हमी देता येत नाही. त्यास्थितीत लोकशाही मूल्यांचे आणि धोरणांचे राजकीय पक्षांद्वारे पालन होत नाही, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. अनेकदा निव्वळ घराणेशाहीने उमेदवार निवडले जातात. त्यामुळे उमेदवार हा जनतेवर थोपवल्या जातो. त्यास्थितीत लोकशाही मार्गाने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीच विविध मतदारसंघातील उमेदवार निवडावा. निवडून आलेल्या उमेदवारालाच राजकीय पक्षाने निवडणूक लढण्याचे तिकीट द्यावे. विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्याकरिता राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ होते. तसेच गैरप्रकारदेखील होतात. ते टाळण्याकरिता पक्षांतर्गत निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेल्या उमेदवारालाच अधिकृत उमेदवारी देण्याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना द्यावा, आदी मुद्दे या याचिकेत नमूद केले होते. (माहिती व संदर्भासाठी)=============================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.