Wednesday 17 October 2018

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतर सुरु

भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसमध्ये प्रवेश तर शिवसेनेत प्रवेश करून अवधुत तटकरें राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करणार!



नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजप नेतृत्वावर नाराज होऊन काँग्रेस मुख्यालयात पक्षात प्रवेश केला आहे. देशमुख यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. आशीष देशमुख हे भाजपच्या नेतृत्वावर नाराज होते. गेल्या आठवड्यात त्यांनी आमदार पदाचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर शिवसेनेत प्रवेश करून अवधुत तटकरें हे राष्ट्रवादीला जयमहाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घराण्यात अखेर राजकीय फुट पडण्याचे स्पष्ट झाले असून माजी आमदार अनिल तटकरे दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची मोहीम सुरु झालेली आहे. सत्तांतर व राजकीयदृष्ट्या लाभापोटी राजकारणात नेहमीच या पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षात नेत्यांचा प्रवेश करण्याचा पायंडा पडलेला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करण्याचा सिलसिला अधिक तीव्र होत आहे. स्वार्थापोटी पक्षीय ध्येय धोरणे अशी मंडळी एका रात्रीत सोडतात व दुसरया पक्षाची स्विकारून अंगीकार करतात. त्यांच्या बरोबर जवळच्या कार्यकर्त्यांची मात्र ससेहोलपट होते. त्यांना राजकीयदृष्ट्या महत्व नसते हे नेतेमंडळी सहजपणे गृहीत धरून मार्गक्रमण करीत असतात. पक्ष प्रवेश केल्यानंतर ज्या आशेने सर्व त्याग केला आहे ते उदिष्ट साध्य होत नाही हे लक्ष्यात येई पर्यंत राजकीय कारकीर्द संपुष्टात येते की काय अशी चिंता त्यांना सतावत असते. अशा स्थितीमध्ये जवळच्या कार्यकर्त्यांसह पक्षीय ध्येय धोरणे यांचा त्यांना विसर पडतो. राजकीयदृष्ट्या लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही अनुकूल राजकीय पक्षात प्रवेश केला जातो. विशेषतः निवडणुकपुर्व असे पक्षांतर होत असते. अशाप्रकारचे पक्षांतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरु झालेले आहे. भाजपमध्ये 4 वर्षापूर्वी गेलेल्यांना आता साक्षात्कार होत आहे. त्यामुळे काहींनी पुन्हा परतीची वाट धरली आहे. तर काहीजण आपले राजकीय कारकीर्द पुढील वाटचाल सोयीसाठी इतर पक्षांमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. 


भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसमध्ये प्रवेश


44 वर्षीय आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. मागील एक वर्षापासून भाजप नेतृत्वावर नाराज असलेले आशीष देशमुख यांनी काँग्रेस मुख्यालयात पक्षात प्रवेश केला आहे. देशमुख यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. आशीष देशमुख हे भाजपच्या नेतृत्वावर नाराज होते. गेल्या आठवड्यात त्यांनी आमदार पदाचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हा भाजपसाठी मोठा धक्का होता. गांधी जयंतीला आशीष देशमुख यांनी काँग्रेसचे नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांची वर्धा येथे भेट घेऊन स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दस–याच्या एक दिवस आधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन एक प्रकारे सीमोल्लंघन केले आहे. मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा उमेदवार होण्याची त्यांची आहे. उमेदवारी मिळवण्याचा मार्ग मात्र अवघड आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज होते. देशमुख हे वेगळ्या विदर्भासाठी सातत्याने आग्रही होती. त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. मात्र त्याला थंडा प्रतिसाद दिल्याने ते भडकले होते. ‘प्रत्येक चित्रपटाचा क्लायमॅक्स वेगळा असतो. माझ्या जवळ सर्व पर्याय खुले आहेत. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. या इशाऱ्याकडे भाजपने ढुंकुनही न बघितल्याने देशमुख अधिकच संतापले होते.आशीष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच सांगितले होते, की त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे. त्यामुळे ते विधानसभा लढविण्याऐवजी लोकसभेसाठी अधिक इच्छूक आहेत हे स्पष्ट आहे. आशीष देशमुख यांची नजर नागपूर किंवा वर्धा मतदारसंघावर आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या दोन डिजीटमध्ये गेली आहे. त्यातच आशीष देशमुख यांनीही नागपूरमधून लढण्याची व्यक्त केलेली इच्छा काँग्रेसमधील नेत्यांना मान्य होते का, हे पाहावे लागेल. दुसरीकडे नितीन गडकरी यांची मतदारसंघावर असलेली पकड याचाही त्यांना सामना करावा लागेल. त्यांनी वर्धा मतदारसंघाचाही पर्याय खुला ठेवला आहे. काँग्रेस प्रवेशासाठी त्यांनी वर्ध्यात पक्षाध्यक्षांची घेतलेली भेटही त्याचेच सूचक मानले जात होते.


अवधुत तटकरें यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी! शिवसेनेत प्रवेश निश्चित 


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घराण्यात अखेर राजकीय फुट पडण्याचे स्पष्ट झाले असून माजी आमदार अनिल तटकरे दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार अवधुत तटकरे यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा देवून प्रवेश करावा यासाठी शिवसेनेने आग्रह धरला आहे. दसरा मेळाव्यात हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे. अनिल तटकरे हे सुनील यांचे थोरले बंधु आहेत. विधानपरिषदेवर ते राष्ट्रवादीच्या कडून आमदार देखील होते. त्यांचे पुत्र अवधुत तटकरे हे सध्या राष्ट्रवादीचे विधानसभा सदस्य आहेत. तर, संदिप तटकरे यांनी रोहा नगरपरिषदेत पक्षाची बंड करून शिवसेनेच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष निवडणूक लढविली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्यांचा राजकीय वाद काही नवा नाही. रायगड जिल्ह्यात असाच एक वाद सुरु राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करतील.काही दिवसांपूर्वी अवधूत तटकरेंनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, अशी माहितीही आता समोर आली आहे. अवधूत तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी डोके दुखी ठरणार आहे. अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध चांगले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांचे भांडण सोडवण्यासाठी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फार यश आलं नाही. २०१६ ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सक्षम व अभ्यासपूर्ण संसदीय कारकिर्दीस ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते या पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन मतदारसंघाचे विद्यमान आ. अवधूत तटकरे यांचे नाव जाणूनबुजून वगळण्यात आले होते. त्यामुळे काकाने पुतण्याला सत्कार समारंभाला डावलण्यात आल्याची चर्चा सुरु झाली ती आता पक्षत्याग करण्यापर्यंत पोहोचली आहे. राजकीय महत्वकांक्षेपोटी तटकरे कुटूंबियात वाद सुरू होता. एकाच घरातील कित्येक जणांना आमदारकी द्यावी यावरून पक्षात देखील संभ्रम होता. तरीही तटकरे यांच्यासह अनिल व अवधुत यांना पक्षांने संधी दिली होती. मात्र, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या. तर पुत्र अनिकेत विधानपरिषद सदस्य झाले आहेत. त्यामुळे, भाऊबंदकीतली राजकिय स्पर्धा आता टोकाला गेल्याने अनिल तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आमदार अवधुत तटकरे यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा देवून प्रवेश करावा यासाठी शिवसेनेने आग्रह धरला आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांना राजीनामा दिल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. मात्र, भाजप खासदार नाना पटोले व आमदार आशिष देशमुख यांनी ज्या प्रकारे राजीनामे दिले त्याच धर्तीवर अवधुत तटकरे यांनीही राजीनामा देवून पक्षप्रवेश करावा असे शिवसेना नेत्यांचे मत आहे. 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.