Friday, 1 March 2019

#Amol Kolhe शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यात लढत!

शिरूर लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यात लढत!


छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज मुंबईत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे. तसेच यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉ हर्षल यशवंत पवार, वरपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसेनेचे शिरूरचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांच्याशी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१४ मध्ये कोल्हे यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेनेने त्यांच्या हाती शिवबंधन बांधले होते. त्यांना उपनेतेपदही दिले होते. मात्र, डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीचे प्रबळ इच्छुक व जोरदार लोकसभेची निवडणूक तयारी सुरू केलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना आपली तलवार आता म्यान करावी लागणार आहे. त्यांनी आढळराव यांच्याविरुद्ध फ्लेक्सबाजी सुरू केली होती. तसेच सोशल मिडियातूनही ते हल्लाबोल करीत होते. मात्र, त्यांची संभावना काल खासदार आढळराव यांनी दहा वर्षांनी जागा झालेला कुंभकर्ण अशी करून त्यांची कसलीच भीती नसल्याचे म्हंटले होते. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशाने शिरूरच्या राजकारणाचे समीकरणच बदलणार आहे. युती झाल्याने आणि राष्ट्रवादीला प्रभावी उमेदवार मिळत नसल्याने एकतर्फी वाटत असणारी लढत आता तुल्यबळ होणार आहे.  दरम्यान शिक्षणाने डॉक्टर असलेले डॉ. अमोल कोल्हे हे मराठी सिनेमा, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील नामवंत अभिनेते आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील त्यांची मालिका खूप गाजली. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेतही काम केले. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि अदराच्या स्थानी असलेल्या दोन्ही राजांचे व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर नेमकेपणानं उभारण्याचे यशस्वी काम डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. कमी कालावधीत शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाली होती. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून प्रचलित आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागा पुन्हा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली असून त्यासाठी अन्य पक्षातील मोहरे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

तरुणाईला योग्य दिशेची गरज-अमोल कोल्हे

अनेकांना हा प्रश्न पडला असेल की आज देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे. ही जाणीव शरद पवारांसारख्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करावे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे सुसंस्कृत नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करायला मिळाले. मात्र आता आनंद होत आहे. लहानपणी शरद पवार साहेबांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीमागे मी धावत होतो. परंतु आज त्यांच्याच पक्षाचे काम करायला मिळत आहे. यापुढे पक्षाचे काम अखंडपणे सुरु राहणार आहे असे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात पोहचले आहेत. त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी महाराजांच्या विचाराचं बोट धरून चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेना प्रवेशाच्या वेळी दिली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. अमोल कोल्हे यांच्या खास वकृत्वशैलीमुळे श्रोते त्यांचे भाषण आवर्जून ऐकत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली. त्याची नैतिक जबाबदारीही अमोल कोल्हे यांनी स्वीकारली होती.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत यापूर्वीचे संबधित ब्लॉग खालीप्रमाणे- 

MONDAY, 7 JANUARY 2019


शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा पुळचटपणा!

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना उद्देशूनच दादांचा त्रागा!


पवार साहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची तयारी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दर्शवून मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, मी आमच्यातल्या (पक्षातील) दोघा - तिघांना सांगतोय, लोकसभा लढवा निवडून आणायची जबाबदारी माझी; तर ते "नको राव दादा, मला आमदारच व्हायचंय' असला पुळचटपणा करताहेत असे नुकतेच विधान एका शोरूमच्या उदघाटन प्रसंगी वक्तव्य केले होते. सदरील त्रागा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलच व्यक्त केला असल्याची चर्चा पक्षात रंगली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात स्वतः आंबेगाव विधानसभेचे आमदार व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील निवडणूक लढविण्यास धजावत नाही त्यामुळे राष्ट्रवादी पक्षांतर्गत इतर पदाधिकार्यांना देखील निवडणुकीत जिंकण्याचा आत्मविश्वास येत नाही केवळ या कारणाने कोणीही निवडणूक लढविण्यास धजावत नाही. तसेच एकदा लोकसभेला उमेदवारी दिली तर त्यांना पुन्हा आमदारकीची उमेदवारी डावलली जाते या धोरणाचे भोसरीचे माजी आमदार विलासराव लांडे बळी पडले होते. या उदाहरणामुळे राष्ट्रवादीतील कोणताही पदाधिकारी शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात लढण्यास धजावत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर यांचा समावेश आहे. या सहा विधानसभा मतदारसंघात सध्या केवळ आंबेगावमधून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार दिलीप वळसे पाटील आहेत. जुन्नरला मनसे, खेडला सेना, शिरूरला भाजप, भोसरीला अपक्ष तर हडपसरला भाजपचे आमदार आहेत. पक्षांतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादीची ताकत या मतदारसंघात क्षीण झालेली आहे. पदाधिकारी यांच्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जातात परंतु प्रत्यक्षात त्याचा काहीही परिणाम पदाधिकारी यांच्यावर होत नसल्याचे दिसून आले आहे. एका शोरूमच्या उदघाटन कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते यावेळी निमंत्रण असूनही विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील अनुपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी पक्षाकडून पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांना देखील लढवण्याची तयारी करण्यास सांगितले होते तसेच आमदार दिलीप वळसे पाटील देखील लोकसभेस इच्छुक नाहीत त्यांना विधानसभा निवडणुकीत रस आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तसेच अर्थ व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील यांचा पर्याय सुचवला जात आहे तर जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार देखील संधी दिली तर लढविण्याची तयारी दर्शवत आहेत. पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी देखील सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान शिवसेना व भाजप युती न झाल्यास भाजपकडून भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे, आंबेगाव भाजप अध्यक्ष जयसिंग एरंडे, तसेच भाजप पदाधिकारी विकास रासकर देखील भाजपकडून इच्छुक आहे. यातुलनेत राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या अजिबात नसल्यानेच मी स्वतः लढून जिंकून दाखवतो असा त्रागा केला आहे. 

अजितदादांनी आता शब्द फिरवू नये-आढळराव

मला लिंबू-टिंबूंच्या विरोधात लढण्यापेक्षा अजित पवार यांच्याविरोधात मला नक्कीच आवडेल. त्यामुळे पवार यांनी आता आपले शब्द मागे घेऊ नयेत. मी याच क्षणाची वाट पाहत होतो. अजित पवारांचाही पराभव करण्याची क्षमता येथील मतदारांमध्ये आहे अशी प्रतिक्रिया खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. खासदार आढळराव यांनी देखील हे आव्हान स्वीकारत असल्याचे सांगून मी सुद्धा मराठा असल्याचे सांगत प्रतिआव्हान दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला योग्य उमेदवार मिळत नाही. त्यामुळे पवार कुटुंबियांच्या नावाची येथे चर्चा होतीच. पण या मतदारसंघात शिवसेनेची ताकद पाहून आणि जनतेचा मला असलेला पाठिंबा पाहून 2009 मध्ये शरद पवार यांनीही येथे उभे राहण्याचे टाळले होते. त्यामुळे अजित पवार यांनी आता शब्द मागे घेऊ नयेत. मी त्यांचीच वाट पाहत होतो. मी त्यांच्या विरोधात निवडून आलो नाही तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही, असेही प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.
=====================================================================

SATURDAY, 24 NOVEMBER 2018

शिरूर लोकसभा मतदारसंघ व अंतर्गत विधानसभा सद्यस्थिती

शिरूर या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने आपला प्रभाव निर्माण केला आहे. पुर्नरचनेत नव्याने सामाविष्ट असलेल्या भागातून निर्माण झालेल्या या मतदार संघावर शिवसेनेने आपली पकड विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या माध्यमातून कायम ठेवली आहे. या लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणार्‍या सहा विधानसभा मतदार संघापैकी भाजपकडे 2 तर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, अपक्ष यांच्याकडे प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघ आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला प्रभाव कायम ठेवला असून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क राखला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघापैकी आंबेगाव वगळता इतर मतदारसंघात राष्ट्रवादीला दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाची पसंती मतदारांनी दिली होती. आंतरराष्ट्रीय नियोजित विमानतळ पुरंदर तालुक्यात गेल्यामुळे त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका विरोधकांकडून ठेवला जात असला तरी राज्य सरकारने खेड तालुक्यात विमानतळ न होण्याची तांत्रिक कारणे लेखी स्वरूपात दिली असल्यामुळे हा आरोप निष्फळ ठरला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांचे निर्विवाद वर्चस्व शिवसेनेच्या माध्यमातून कायम राखले जाईल अशी स्थिती आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून या भागातील नेते व विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील निवडणुक लढवित नसल्याने राष्ट्रवादीमध्ये नकारात्मक संदेश जात असल्याने इतर उमेदवारांना यश मिळत नसल्याची स्थिती आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आपला प्रभाव कायम राखलेला आहे. तर जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतील व शिवसेनेतील काही पदाधिकार्‍यांच्या नकारात्मक प्रतिमेमुळे मनसेच्या माध्यमातून विद्यमान आमदार शरद सोनवने यांनी गतवेळी यश मिळवले होते. आगामी निवडणुकीकरीता गेल्यावेळी सारखी राजकीय स्थिती राहिलेली नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रभावाच्या तुलनेने शिवसेनेचा प्रभाव काही स्थानिक पदाधिकार्‍यांच्या घटनांमुळे कमी झालेला आहे. शिवसेनेने तसेच राष्ट्रवादीने नवखा उमेदवार दिला तर संभाव्य लढत चुरशीची होऊन युती व आघाडीच्या शक्यतेवर येईल यश अवलंबून राहिल. खेड, आळंदी, विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याने तसेच उमेदवारी डावलल्याने शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुक लढवून सहानुभूतीच्या जोरावर यश संपादन केलेले विद्यमान आमदार सुरेश गोरे यांचा आगामी निवडणुकीतील प्रभाव कायम राहिल अशी स्थिती आहे. इतर इच्छूक उमेदवारांकडून प्रभावशील कार्य व त्यांची प्रतिमा नसल्याने या मतदारसंघात यश मिळविण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्याची गरज आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांच्या निर्माण झालेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी यश संपादन केले होते. मात्र आगामी निवडणुकीत त्यांना गेल्यावेळी सारखी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसल्याने त्यांना पुन्हा यश मिळणे कठीण आहे. या मतदारसंघात अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला यश दूरापस्त झाले आहे तर भाजप व शिवसेनेकडे प्रभावी नेतृत्व नसले तरी गावकी-भावकीच्या राजकारणातील नवखे नेतृत्व संघटनात्मक बांधणीच्या जोरावर यश मिळविण्याचा प्रयत्न केल्यास निश्‍चित बदल होऊ शकेल अशी स्थिती आहे. राष्ट्रवादीने देखील नव्या चेहर्‍याला संधी दिल्यास येथील राजकारणात अनुकूल बदल होऊ शकेल अशी राजकीय सद्यस्थिती आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपने गेल्यावेळी यश मिळविले असले तरी वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांकडून होत असल्याने विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांची प्रतिमा मलिन होत आहे. विरोधकांना नकारात्मक वातावरण निर्मिती करण्याची संधी मिळत असल्याने त्याचा फटका भाजपला निश्‍चित बसू शकेल. मात्र शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये इच्छूक उमेदवारांमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्याप्रमाणावर आहे. ती थोपवल्यास यशाकडे वाटचाल होऊ शकते. मनसेचे पदाधिकारी या मतदारसंघात यश मिळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना परिपूर्ण यश मिळणे अशक्य असून त्यांच्या निवडणुक लढविण्याचा व मते घेण्याचा लाभ प्रतिस्पर्धी पक्षांनाच मिळत असल्याची स्थिती या मतदारसंघात आहे. भाजपने मतदारसंघ राखण्यासाठी आरोपांचे खंडन करून विकासात्मक कार्याची मतदारांना माहिती पोहचविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीतून दिसून येऊ शकेल अशी स्थिती आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात भाजपने प्रभाव कायम ठेवला असला तरी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला लाभ होत आहे. राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी रोखणे हाच आगामी निवडणुकीतील यशाचा प्रमुख मार्ग असेल या मतदारसंघातील शिरूर व हवेलीतील काही भागांमुळे क्षेत्रनिहाय नेतृत्वावरून अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसत आहे. शिरूर मतदारसंघात भाजपने पुन्हा यश संपादन करण्यासाठी अनुकूल राजकीय स्थिती निर्माण करण्याची गरज आहे.

सदरील चंद्रकांत भुजबळ यांचा लेख लोकमत उत्सव दिवाळी अंक २०१८  मध्ये पान क्र. ५७ ते ६५ वर प्रकाशित झालेला आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook

================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.