Saturday 5 October 2019

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला

अखेर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज वैध; सर्व आक्षेप फेटाळले


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात डिसेंबर 2018 च्या नोटरीचा शिक्का वापराला आहे, असा आक्षेप घेत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी काँग्रेस, आप, व अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांच्याकडे या विषयावरील बंदद्वार सुनावणी सुरू होती. मात्र, अखेर मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी, मुख्यमंत्र्यांचे निवडणूक प्रतिनिधी संदीप जोशी यांनी फडणवीस यांच्या बाजुने प्रतिक्रिया देण्यात आली. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख, जय जवान जय किसानचे उमेदवार प्रशांत पवार व आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांनी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर तसा आक्षेप नोंदविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रावर वापरलेला संबंधित नोटरीचा शिक्का कालबाह्य झाला आहे. त्यामुळे तो ग्राह्य धरता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे निवडणूक विभागाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत नोटीस बोर्डावर जाहीर केलेली नव्हती. ती ऑनलाईनही उपलब्ध नव्हती. या संदर्भातही निवडणूक अधिकारी व सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शुक्रवारी आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांच्या अर्जासोबत सादर केलेली कागदपत्र सील करण्यात आली. ती पंचांसमक्ष उघडावी, अशी मागणीही आशीष देशमुख व पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. आम आदमी पार्टी, बीएसपी, काँग्रेस व अपक्ष उमेदवार व त्यांचेही प्रतिनिधी सुनावणीत सहभागी झाले होते. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे वकिल उदय डबले व रितेश कालरा यांनी दिली. निवडणूक अधिकाऱ्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे, असा संदीप जोशी यांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावरचे सगळे आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी डॉ. आशिष देशमुख, प्रशांत पवार आणि इतर उमेदवार यांनी याबाबत हरकत उपस्थित केली. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्रामध्ये दाखल केलेल्या नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र हे नोटरी समक्ष सादर केले आहे. त्याची मुदत 28 डिसेंबर 2018 रोजी संपली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच प्रतिज्ञापत्राच्या सीलवर 28 डिसेंबर 2018 ही तारीख आहे. तर नोटरीच्या आडव्या शिक्क्यावर 3 ऑक्टोबर 2010 ही तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे शपथपत्र अवैध असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवून ते स्वीकारु नये अशी मागणी करण्यात आली. याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक प्रतिनिधी संदीप जोशी यांनी उपरोक्त नमूद पुरुषोत्तम मोरेश्वर सोनटक्के यांच्या व्यवसाय प्रमाण पत्राची प्रत आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी हरकत उपस्थित झाल्यावर केली आहे. सदर व्यवसाय प्रमाणपत्राला 29 डिसेंबर 2018 पासून पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे हे दिसून आले. नामनिर्देशन पत्रासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं आहे. तसेच संबंधित नोटरीचीही मुदतवाढ करण्यात आली आहे. याबाबत खात्री झाल्याने हरकतदार आणि हरकतीत तथ्य नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील उमेदवारी अर्ज वैध

राज्यात आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेत अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंज शिंदे यांच्याकडे या विषयावरील सुनावणी सुरु होती. या सुनावणी नंतर अखेर निवडणुक अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज मंजूर केला आहे. शिर्डी विधानसभेच्या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांनी अर्जामध्ये स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे 3 असे एकुण 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र  राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी केला होता. त्यामुळे संबंधित प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर आज निवडणुक अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला होता. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आले त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्येच संपला असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यामुळे निवडणुक अधिकाऱ्यांने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाजूने निर्णय दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपाला देखील दिलासा मिळला आहे. 

यापूर्वीचे वृत्त-

निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष; अर्जावरील आक्षेप पहा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आलेले आहेत. यावर युक्तिवाद सुरु असून निर्णय प्रलंबित आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र नोटरी केले होते ते कालबाह्य ठरलेल्या म्हणजेच मुदत संपलेल्या नोटरीधारकाने नोटरी केले असल्याची हरकत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घेतल्याने गोंधळाचे वातावरण काही काळ निर्माण झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र नोटरी यांनी शिक्के/मुद्रा उमटवलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे 28/12/2018 अशी मुदत संपण्याचा दिनांक असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक अधिकारी यांचा निर्णयावर पुढील घडामोड अवलंबून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावर घेतलेल्या आक्षेपामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधान आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या प्रतिपत्रावर जुन्या तारखेचाच शिक्का असल्याचा देशमुख आणि पवार यांचा आक्षेप आहे. डॉ. आशिष देशमुख आणि प्रशांत पवार यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यावर तहसील कार्यालयात सुनावणी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याही प्रतिज्ञापत्रावर जुनीच तारीख असल्याचे दिसून येत होते.  
केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर संबंधीत नोटरींचा तपशील
S. No.
269
Reg No.
2510
Name Of Advocate
SH. VIVEK P.SONTAKAY
Address Of Advocate
CHITNAVISPURA, NEW ZENDA CHOWK SAKKARDARA ROAD,MAHAL, NAGPUR-440002
Area of Practice
DISTT. NAGPUR,MAHARASHTRA
Date of Appointment
29/12/2003
Certificate Vaild upto
28/12/2018
District
Nagpur

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचा आक्षेप

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणारे भाजप नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने संधी न दिल्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना विजयही मिळाला. त्यानंतर स्वतः राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आता शिर्डीतून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सुरेश जगन्नाथ थोरात रिंगणात आहेत. राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी आक्षेप नोंदवला आहे. 
बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ सुरेश थोरात यांनी घेतला आक्षेप-
सुरेश थोरात हे बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी काँग्रेस कडून शिर्डी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी आक्षेप नोंदवला आहे. सुरेश जगन्नात थोरात हे संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील रहिवाशी आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप काय आहे?
विखे यांनी ज्या व्यक्तीसमोर प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्रावर शिक्का मारलेला आहे. परंतु, त्याची मुदत कधी संपते, याचा उल्लेख नोटरी करणाऱ्या व्यक्तीची पाच वर्षांसाठी नेमणूक असते. मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे बंधनकारक असते. याशिवाय प्रतिज्ञापत्रात आपण उमेदवारास व्यक्तीश: ओळखतो, असे नोटरी करणाऱ्या व्यक्तीकडून देण्यात आलेले नाही. तसेच, ओळख म्हणून इतर व्यक्तींची स्वाक्षरी घेण्यात आलेले नाही, यासह अन्यही आक्षेप विखे यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आले आहेत.

औरंगाबाद पश्चिममधील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी छाननीत बाद झाला. गुन्ह्यांचा कॉलम रिकामा सोडल्याने हा अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांचा एक अर्ज अपक्ष म्हणून तर दुसरा काँग्रेस उमेदवार म्हणून होता, मात्र हे दोन्ही अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. रमेश गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक गटाचे आहेत. काँग्रेस नेत्यांना दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी आधी अपक्ष म्हणून आणि नंतर काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्यांनी गुन्ह्यात लागू नाही हा कॉलम तसाच सोडून दिला, मात्र त्यामध्ये नमूद  करणे आवश्यक असल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्जच बाद ठरवला आहे.

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ मनसेचे उमेदवार अतुल वांदीले यांचा अर्ज बाद 

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासाठी 18 उमेदवारांच्या अर्जाच्या छाननीत मनसेचे उमेदवार अतुल वांदीले यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊन 17 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 18 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यापैकी मनसेचे उमेदवार अतुल वांदीले यांनी उमेदवारी अर्जा सोबत नोटरी केलेले शपथ पत्र सादर केले नाही. त्यामुळे संबंधित बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे निदर्शनास आणून शनिवारी अर्जाचे छाननी पूर्वी सादर करण्याची सूचना दिली होती. परंतु अर्जाचे छाननी पर्यंत अतुल वांदीले यांनी नोटरी केलेले शपथ पत्र सादर केले नाही. त्यामुळे वांदीले यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांनी दिली. आता उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या 17 उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे, अपक्ष एडवोकेट सुधीर कोठारी, बसपचे विलास नानाजी टेम्भरे, संभाजी ब्रिगेड चे प्रशांत देशमुख, वंचित आघाडीचे  डॉ उमेश सोमाजी वावरे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दमडु वारलू मडावी, लोकजागर पार्टीचे मनीष पांडुरंग नांदे, अपक्ष मंदा रमेश ठवरे, श्याम इडपवार, मनीष भीमराव कांबळे, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. 

कर्जत-जामखेड मतदारसंघात डमी रोहित पवार यांचा अर्ज बाद

अहमदनगर नगर जिल्ह्यातील सर्वात चर्चे असलेला मतदारसंघ कर्जत-जामखेडमधील रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी, तालुका पाटोदा) या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाला आहे. या मतदारसंघातील आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे. मात्र, दोघांचीही नावे सारखीच असल्यामुळे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या चर्चेने खळबळ उडवली होती. नगर जिल्ह्यातील चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघ. या मतदारसंघात एकूण 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी, तालुका पाटोदा), शेख युनुस दगडू, रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. शेख युनूस दगडू व रोहित राजेंद्र पवार यांनी अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले आहेत. रावसाहेब मारुती खोत हे अनामत रक्कम अपुरी असलेने अपात्र ठरले. तर आशाबाई रामदास शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीचा पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज होता. मुख्य उमेदवार राम शिंदे यांचा अर्ज मंजूर झाल्याने व अपक्ष उमेदवारीसाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार व राम शिंदे यांच्या नावाने डमी उमेदवारही रिंगणात उतरले होते. त्यातील रोहित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे.

माजलगाव विधानसभा वंचितचे उमेदवार जीवन राठोड यांच्यासह १४ उमेदवारी अर्ज बाद

माजलगाव विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी छाननीमध्ये ६४ दाखल अर्जांपैकी ८ उमेदवारांचे १४ अर्ज बाद झाले. यामध्ये वंचित आघाडीचे जीवन राठोड यांच्या अर्जाची समावेश आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात ६४ जणांनी आपले ९१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे रमेश आडसकर, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे प्रकाश सोळंके, वंचित बहुजन आघाडीचे जीवन राठोड, धम्मानंद साळवे या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश होता. शनिवारी तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर ,सहायक अधिकारी प्रतिभा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जीवन राठोड यांचा अर्ज मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा असल्यावरून बाद करण्यात आला. तर मोहन बाजीराव जगताप,जयसिंह सोळंके, ऋषिकेश देशमुख, किरण चव्हाण, शेषराव मुंडे( बहुजन समाज पार्टी), सईद गफ्फार स.अख्तर, इनामदार शफीयोद्दीन अशा आठ उमेदवारांचे १४ अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत.

काँग्रेस नेत्याच्या उमेदवारी अर्जावर आशिष शेलार यांची हरकत

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रसतर्फे अर्ज दाखल केलेल्या नगरसेवक आसिफ झकेरिया यांच्या उमेदवारी अर्जाबाबत भाजपचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हरकत घेतली आहे. याबाबत दोघांना बाजू मांडण्यासाठी दुपारी वेळ देण्यात आली असून या हरकतीबाबत सायंकाळी निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम मध्ये कॉंग्रेसचा या मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार रफत फरहत हुसैन यांनी पक्षाचा एबी फॉर्म मुदतीत जोडला नाही व प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. तर, बहुजन समाज पक्षाचे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या गणेश विश्वनाथ खैरे यांचा अर्ज त्रुटीमुळे फेटाळण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघातील एमआयएमचे आव्हानलढती पूर्वीच संपुष्टात आले आहे. दरम्यान, उमेदवार रिंगणात राहणार की नाही याचा निर्णय सायंकाळी होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रात अमृता फडणवीस यांची संपत्तीदेखील नमूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात आपली स्थावर मालमत्ता ३.७८ कोटी रूपये नमूद केली आहे. मागील निवडणुकीच्या वेळी हीच स्थावर मालमत्ता १.८१ कोटी रूपये होती असे म्हटले जात आहे. प्रामुख्याने जमिनींच्या बाजारमूल्यात मागील पाच वर्षांत झालेल्या वाढीमुळे स्थावर मालमत्तेत वाढ झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर, अमृता फडणवीस यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य २०१४ च्या ४२.६० लाख रुपयांवरून आता २०१९मध्ये ९९.३ लाख रूपये इतके झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांकडे २०१४ मध्ये ५० हजार रूपये रोख रक्कम असल्याचे नमूद करण्यात आले होते. तर, २०१९ मध्ये १७५०० रुपये रोख रक्कम प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे. बँकेतील ठेवी २०१४ मध्ये १, १९, ६३० रुपयांच्या असल्याचे नमूद करण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रात बँकेतील ठेवी ८,२९,६६५ रूपये इतक्या झाल्या आहेत. आमदारांच्या वेतनात झालेल्या वाढीमुळे हा परिणाम दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांच्याकडे २०१४मध्ये रोख रक्कम २० हजार रूपये होती. आता १२५०० रुपयांची रोख रक्कम असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. बँकेतील ठेवी १,००,८८१ रुपये इतक्या होत्या. त्या आता ३, ३७, ०२५ रुपये इतक्या आहेत. त्यांच्याही वेतनात मागील पाच वर्षांत झालेल्या वाढीमुळे ही रक्कम वाढली असल्याचे म्हटले जात आहे. अमृता यांच्या २०१४ मधील १.६६ कोटी रुपयांच्या शेअर्सचे मूल्य २०१९ मध्ये २.३३ कोटी रुपये इतके झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविरोधात ४ खाजगी तक्रारी असून एकही गुन्हा (एफआयआर) दाखल झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या चार खाजगी तक्रारींपैकी तीन तक्रारी सतीश उके यांनी केल्या असून, एक तक्रार मोहनीश जबलपुरे यांची आहे. सतीश उके यांनी केलेल्या तक्रारीपैकी एक प्रकरण हे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायदंडाधिकार्‍यांकडे ‘रेफर बॅक’ झालेले आहे. हे प्रकरण लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ (अ) अन्वये आहे. दुसरे प्रकरण हे सुद्धा कलम लोकप्रतिनिधी कायद्याच्या १२५ (अ) अन्वये असून ती तक्रार उच्च न्यायालयापुढे आहे. यात भादंविच्या १९५, १८१, १८२, १९९, २०० या कलमांचा तक्रारीत उल्लेख असला तरी यात आरोपनिश्चिती झालेली नाही. मोहनीश जबलपुरे यांनी पोलिसांचे खाते अ‍ॅक्सिस बँकेत उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार केली, ती या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयापुढे असून मुख्यमंत्र्यांना यात न्यायालयाने नोटीस बजावलेली नाही.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.