Monday 14 October 2019

लोकशाहीचा नव्हे राजकीय घराणेशाही व परिवारवादाचा उत्सव!

लोकशाहीचा नव्हे राजकीय घराणेशाही व परिवारवादाचा उत्सव!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने लोकशाहीचा उत्सव साजरा करूया असे आर्जव केले जात आहे मात्र लोकशाहीचा नव्हे राजकीय घराणेशाही व परिवारवादाचा उत्सव असल्याचे प्रमुख पक्षांच्या उमेदवारी वाटपावरून स्पष्ट होत आहे. राज्यात प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारीचे निकष राजकीय घराणेशाही आहे त्यांना प्राधान्य दिले आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 3237 एकूण उमेदवारांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी बहुतांश राजकीय घराण्यातील परिवारातील सदस्याला प्राधान्य दिलेले आहे. अशा उमेदवारांचे प्रमाण 25 टक्क्यांहून अधिक असून सत्तेत मंत्रिमंडळात राजकीय घराणेशाहीचे हेच प्रमाण 50 टक्केहून जास्त असते. प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून निवडणुकीत लाभ घेत असतात. राज्यात निवडणूक 5 वर्ष सत्ता राबविण्यासाठी मतदान घेतले जाणार आहे. राज्यातील प्रमुख प्रश्न व आगामी काळातील विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा, आश्वासने आदी. प्रमुख बाबींचा निवडणूक प्रचारात खर तर समावेश होणे अपेक्षित असते मात्र 15 दिवसांच्या प्रचारात मतदारांना मूर्ख बनविण्याचे काम काही प्रमुख राजकीय पक्षांकडून केले जात आहे. पैलवान, हातवारे, तेल लाऊन फोटो दाखवा, कुस्ती अशा गंमतीदार भाषणे सामान्य मतदारांना सुनावली जात आहेत. लोकशाहीचा नव्हे राजकीय घराणेशाही व नेत्यांच्या बेतालपणाचा उत्सव असल्याची प्रचीती मतदारांना येत आहे. राज्यातील प्रमुख चार पक्षांनी मिळून उमेदवारी वाटप केलेल्या राजकीय वारसदारांची यादी खालीलप्रमाणे पाहूयात.

[?]   काँग्रेस-

 वर्षा गायकवाड, धारावी- माजी खासदार आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांची कन्या. 
 शिरीष नाईक, नवापूर- माजी मंत्री सुरूपसिंग हिरा नाईक यांचे पुत्र. 
 कुणाल पाटील, धुळे (ग्रामीण)- कॉंग्रेसचे नेते रोहिदास पाटील यांचे चिरंजीव
 शिरीष चौधरी, रावेर- माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे चिरंजीव. 
 हर्षवर्धन सकपाळ, बुलडाणा- सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेले वसंतराव सकपाळ यांचे चिरंजीव.
 अमित झनक, रिसोड- माजी आमदार सुभाष झनक यांचे चिरंजीव.
 सुलभा खोडके, अमरावती- पती संजय खोडके छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक होते. 
 अमर काळे, आर्वी- माजी उपसभापती शरद काळे यांचे चिरंजीव.
 रणजित कांबळे, देवळी- कॉंग्रेसच्या दिवंगत ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांचे भाचे. प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्धा मतदारसंघातून निवडणूक लढवली.
 सुरेश भोयर, कामठी- माजी आमदार यादवराव भोयर यांचे चिरंजीव.
 जयदीप कवाडे, भंडारा- दलित नेते आणि विधान परिषदेचे माजी आ. जोगेंद्र कवाडेंचे चिरंजीव.
 प्रतिभा धानोरकर, वरोरा- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि चंद्रपूरमधून निवडून आलेले राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी.
 ऋतुराज पाटील, दक्षिण कोल्हापूर- शिक्षणसम्राट डी. वाय. पाटील यांचे नातू आणि कॉंग्रेसचे आ. सतेज पाटील यांचे पुतणे.
 राजू आवळे, हातकणंगले- माजी मंत्री जयंतराव आवळे यांचे चिरंजीव. 
 अमित देशमुख, लातूर (शहर)- कॉंग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे थोरले चिरंजीव.
 धीरज देशमुख, लातूर (ग्रामीण)- कॉंग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव. 
 प्रणिती शिंदे, सोलापूर शहर मध्य- माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या.
 विश्‍वजीत कदम, पलुस कडेगाव- कॉंग्रेसचे नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव.
 सुरेश थोरात, शिर्डी- कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलतभाऊ.
 आसिफ झकेरिया, वांद्रे पश्‍चिम- माजी मंत्री सलीम झकेरिया यांचे चिरंजीव.

[?]   राष्ट्रवादी-

 रोहित पवार, कर्जत जामखेड- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू. 
 पंकज भुजबळ, नांदगाव- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव. 
 प्रकाश सोळंके, माजलगाव- माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे चिरंजीव.
 संदीप क्षीरसागर, बीड- केशरकाकू क्षीरसागर यांचे नातू आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे.
 धर्मरावबाबा अत्राम, अहेरी- राजे अमरीश यांचे काका. 
 विजयसिंह पंडित, गेवराई- कॉंग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव. 
 अदिती तटकरे, श्रीवर्धन- राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची मुलगी. भाऊ अनिकेत विधान परिषदेत आमदार आहेत. 
 चेतन तुपे, हडपसर- माजी खासदार दिवंगत विठ्ठलराव तुपे यांचे चिरंजीव.
 राजेश पाटील, चंदगड- माजी आ. नरसिंग पाटील यांचे चिरंजीव. 
 जगदीश वळवी, चोपडा- भाजपमधून निवडणूक लढवत असलेले विजयकुमार गावितांचे मेहुणे. 
 संग्राम जगताप, अहमदनगर शहर- वडील अरुण जगताप विधान परिषदेचे आमदार. भाजपचे राहुरी येथील आमदार शिवाजी कर्डीले यांचे संग्राम हे जावई आहेत. भाजपने कर्डिले यांना पुन्हा राहुरीतून उमेदवारीही दिली आहे. 
 नितीन पवार, कळवण- माजी मंत्री दिवंगत ए. टी. पवार यांचे चिरंजीव. लोकसभा निवडणुकीत ए. टी. पवार यांची स्नुषा डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने त्यांना भाजपने तिकीट दिले आणि त्या दिंडोरीमधून जिंकून खासदार झाल्या.
 अतुल बेनके, जुन्नर- राष्ट्रवादीचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे चिरंजीव.

[?]   भाजप-

 पंकजा मुंडे, परळी- गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या.
 जयदत्त क्षीरसागर, बीड- माजी खासदार दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांचे चिरंजीव.
 रोहिणी खडसे- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुलगी. एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे विद्यमान खासदार. 
 बाळासाहेब विखे-पाटील, शिर्डी- अहदमनगर जिल्ह्यात गेली 40 वर्षे राजकारणात असलेले कुटुंब. वडील विखे-पाटील कॉंग्रेसचे मंत्री. मुलगा विद्यमान खासदार. 
 समीर मेघे, हिंगणा- कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेल्या दत्ता मेघेंचे पुत्र. 
 आकाश फुंडकर, खामगाव- भाजपचे माजी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र. 
 संतोष दानवे, भोकरदन- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे पुत्र. 
 डॉ. हेमंत सावरा, विक्रमगड- काही महिन्यांपूर्वीच निष्क्रिय ठरवत आदिवासी विकास मंत्रिपदावरून हटवले होते त्या विष्णू सावरा यांचे पुत्र. 
 डॉ. अतुल भोसले, दक्षिण कराड- यांचे आजोबा जयंतराव (आप्पा) भोसले हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते. वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष. डॉ. अतुल हे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचे जावई. 
 सुनील राणे, बोरिवली- माजी मंत्री दत्ता राणे यांचे पुत्र. 
 प्रशांत ठाकूर, पनवेल- कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव. 
 सिद्धार्थ शिरोळे, शिवाजीनगर, पुणे- लोकसभा निवडणुकीत पुण्यात भाजपने ज्या खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी नाकारली होती, त्यांचे पुत्र.
 वैभव पिचड, अकोले- राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र.
 अमरीश राजे अत्राम, अहेरी- माजी आमदार सत्यवान महाराज यांचे चिरंजीव. राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज हे आजोबा.
 डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबार- भाजपच्या नंदुरबारमधील खासदार  डॉ. हिना गावित यांचे पिता. ते स्वतः आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. 
 संभाजी पाटील-निलंगेकर, निलंगा- माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या स्नुषा रूपाताई यांचे पुत्र. मदन भोसले, वाई- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे पुत्र.
 नीतेश राणे, कणकवली- शिवसेना, कॉंग्रेस असे करत आता भाजपमध्ये शिरकाव केलेले माजी मुख्यमंत्री आणि खा. नारायण राणे यांचे पुत्र. 
 ऍड. राहुल नार्वेकर, कुलाबा- राहुल नार्वेकर यांचे वडील मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. भाऊ मकरंद मुंबई महापालिकेत नगरसेवक आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नार्वेकर जावई आहेत. 
 अमल महाडिक, कोल्हापूर दक्षिण- राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश. माजी आमदार महादेव महाडिक यांचे पुत्र. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे भाऊ.
 राणा जगजितसिंह पाटील, तुळजापूर- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे मेहुणे.
 मेश अडसकर, माजलगाव- वडील बाबूराव अडसकर कॉंग्रेसचे माजी आमदार आहेत.
 प्रताप अडसड, धामणगाव- भाजपचे नेते अरुण अडसड यांचे चिरंजीव. 
 सत्यजित देशमुख, शिराळा- कॉंग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव. 
 डॉ. राहुल अहेर, चांदवड- माजी मंत्री राहिलेल्या दौलतराव अहेर यांचे चिरंजीव. 
 सुनील कांबळे, पुणे कॅण्टॉन्मेंट- माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू. 
 गणेश नाईक, ऐरोली- नवी मुंबईतील संपूर्ण नाईक कुटुंब राजकारणात. विधानसभेच्या दोन जागा न मिळाल्याने मुलगा संदीप नाईक यांनी त्यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेत वडिलांना पुढे केले.
 मोनिका राजळे, शेवगाव- मागच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश. सासरे आप्पासाहेब राजळे कॉंग्रेसच्या निष्ठावंतांपैकी. शिवसेनेचे माजी मंत्री अशोक पाटील-डोणगावकर वडील. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भाचे-सून. 
 नमिता मुंदडा, केज- राष्ट्रवादीकडून तीन वेळा आणि भाजपमधून दोन वेळा आमदार झालेल्या माजी मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांची स्नुषा. 
  देवयानी फरांदे, नाशिक मध्य- विधान परिषदेचे प्रदीर्घकाळ सभापती राहिलेल्या प्रा. ना. स. फरांदे यांची स्नुषा. 

[?]   शिवसेना-

 एकनाथ शिंदे, कोपरी पाचपाखाडी- चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण  डोंबिवली मतदारसंघाचे खासदार आहेत. 
 शंभुराजे देसाई, पाटण- लोकनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू.
 रश्‍मी बागल, करमाळा- राष्ट्रवादीतून शिवसेनेत पक्षांतर. वडील दिगंबर बागल आणि आई श्‍यामल बागल हे दोघेही माजी आमदार होते. रश्‍मी बागल साखर संघाचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या स्नुषा.
 संग्रामसिंह कुपेकर, चंदगड- माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे राजकीय वारसदार.
 योगेश घोलप, देवळाली- माजी मंत्री बबनराव घोलप यांचे चिरंजीव.
 श्रीनिवास वनगा, पालघर- भाजपचे दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव.
 निर्मला गावित, इगतपुरी- कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश. कॉंग्रेसचे नेते माणिकराव गावित यांची कन्या. भाजपने त्यांच्या भावाला नवापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
 सुनील राऊत, विक्रोळी- शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांचे बंधू. 
 यामिनी जाधव, भायखळा- मुंबई महापालिकेतील नेते यशवंतराव जाधव यांची पत्नी.
 योगेश कदम, दापोली- शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव.
 गौरव नायकवडी, इस्लामपूर- क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू. 
 राजाभाऊ वाजे, सिन्नर- त्यांचे आजोबा राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्या निवडणुकीत आमदार झाले. त्यानंतर त्यांची आजी रुक्‍मिणीबाई  वाजे सिन्नर तालुक्‍याच्या पहिल्या महिला आमदार होत्या.
  प्रीती बंड, बडनेरा- माजी आमदार संजय बंड यांची पत्नी.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.